इराणमध्ये साडेपाचशेहून अधिक जणांचा बळी   

दुबई : अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत 555 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती इराण रेड क्रिसेंट सोसायटीच्या हवाल्याने देण्यात आली आहे. अमेरिका आणि इस्रायलने आतापर्यंत 131 शहरांवर हवाई हल्ले केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सलग तिसर्‍या दिवशी सोमवारी उभय देशांतील लष्करी संघर्ष कायम होता. इराणकडून अमेरिका आणि इराणच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.
 
अमेरिका आणि इराणच्या संयुक्त हवाई हल्ल्यात शनिवारी इराणचे धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनी, लष्कर प्रमुख जनरल अब्दुल रहिम मोसावी, संरक्षण मंत्री जनरल अझिझ सानीराहेद, निमलष्करी दल रेव्ह्यूलेशनरी गार्डचे प्रमुख आणि सुरक्षा सल्लागार अली शामखानी यांचा मृत्यू झाला.याआधी, इराणमधील सरकारी वृत्तवाहिनीने 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले होते. आता हा आकडा 550 वर पोहोचला आहे. इराणमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे असून बचाव पथके तैनात केली आहेत. एक लाखांहून अधिक जण यात गुंतले आहेत. 
 
इराणकडून परवा इस्रायलसह सात देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यात आला होता. परवा इराणने दुबईला मोठ्या प्रमाणात लक्ष्य बनविले होते. काल कुवैतवर जोरदार हल्ले करण्यात आले. कुवैत सिटीतील अमेरिकन दूतावास, बहरीनच्या मनामामधील अमेरिकेच्या नौसेनाच्या 5 व्या फ्लीट मुख्यालयासह जॉर्डनमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर इराणने क्षेपणास्त्रे डागली.दुसरीकडे, अमेरिका आणि इस्रायलने इराकची राजधानी बगदादच्या दक्षिणेकडील अल-सख्र परिसरातील इराण समर्थक कताइब हिज्बुल्लाहच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य बनविले.
 
दिल्लीतील दूतावास परिसरात सुरक्षेत वाढ
 
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ल्यानंतर तणाव वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर नवी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या दूतावासाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. या परिसरात 24 तास जवान तैनात करण्यात आले आहे.
 
सौदी अरेबियातील तेल शुद्धीकरण केंद्रांवर हल्ले
 
अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा भडका सौदी अरेबियातील अरामको रिफायनरीपर्यंत पोहोचले आहे. सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी असलेल्या अरामकोवर ड्रोन हल्ला करण्यात आला. अरामको जगातील सर्वांत मोठे तेल शुद्धीकरण केंद्र आहे.  ड्रोन हल्ल्याने आग लागली असून ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून अरामकोचे रास तनुरा तेल शुद्धीकरण केंद्र तूर्तास बंद करण्यात आले आहे. 
 
हिजबुल्ला उतरला युद्धात
 
दुबई : इराणच्या समर्थनात आता हिजबुल्ला दहशतवादी संघटना मैदानात उतरली आहे. इराण आणि हिजबुल्ला यांनी इस्रायल आणि अरब राष्ट्रांवर काल क्षेपणास्त्रे डागली. कुवैतमधील अमेरिकन दूतावासादेखील त्यांनी लक्ष्य बनविले. 
 
इराणमध्ये हवाई हल्ले
 
इराणवर रविवारी रात्रभर इस्रायल आणि अमेरिकेने हवाई हल्ले केले. दुसरीकडे, दुबईवर इस्रायलने जोरदार हल्ले केले. त्यामुळे रात्रभर स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. बहरीनमध्येदेखील हल्ले कायम होते. त्यामळे रात्रभर सायरन वाजत होत. कुवैतमधील अहमदी तेल शुद्ध केंद्रावर हल्ला झाला. त्यात दोन कामगार जखमी झाले. त्याआधी, कुवैतच्या सैनिकांनी ड्रोन हल्ला उधळून लावला होता.
 
आता अमेरिकेशी वाटाघाटी नाही
 
आम्ही अमेरिकेशी कोणत्याही प्रकारची वाटाघाटी करणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आणि शिया धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. मागील तीन दिवसांपासून उभय देशात जोरदार हवाई हल्ले सुरू आहेत.खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता वाटाघाटीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. आम्ही वाटाघाटीस तयार आहोत. इराणने शस्त्रे खाली ठेवावेत आणि चर्चेस पुढे यावे, असे ट्रम्प यांनी आवाहन केले होते. आता अमेरिकेशी वाटाघाटी होणार नाही, असे इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी स्पष्ट केले आहे. 

Related Articles