इराणच्या अणु केंद्रावर हल्ला   

दुबई : अमेरिका आणि इस्रायलने इराणवरील हल्ल्याची व्याप्ती वाढवली आहे. इराणच्या नातान्झ अणु केंद्रावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे किरणोत्सर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अणू देखरेख संस्थेतील इराणचे राजदूत रेझा नजफी यांनी अणु केंद्रावरील हल्ल्याचा आरोप केला. तसेच, इराणवरील हल्ला बेकायदेशीर आणि क्रूर असल्याचे सांगत निषेध केला.
 
इस्रायल आणि अमेरिकेने पुन्हा एकदा इराणच्या शांततापूर्ण आणि सुरक्षित अणू केंद्रांवर हल्ला केला असल्याचेही ते म्हणाले. यावेळी कोणता प्रकल्प बाधित झाला, अशी विचारणा करण्यात येताच त्यांनी नातान्झू अणु केंद्रावर हल्ला झाला असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्थेचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी सध्याची स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. अणु केंद्रातून किरणोत्सर्ग झाल्यास त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. मोठ्या शहरांएवढा किंवा त्याहूनही मोठा परिसर रिकामा करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.दरम्यान, इराणच्या अणू नियामक प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप तिथून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Related Articles