कॅनडा भारताला करणार युरेनियमचा पुरवठा   

व्यापारी करार 50 अब्ज डॉलर्सचा 
 
नवी दिल्‍ली : भारत आणि कॅनडामध्ये 50 अब्ज डॉलर्सचा व्यापारी करार झाला आहे. तसेच युरेनियम खनिज आणि दुर्मिळ खनिजांचा पुरवठा  करण्याच्या करारावर देखील शिक्‍कामोर्तब करण्यात आले. या माध्यमातून दोन्ही देशांत आर्थिक भागीदारीला चालना मिळेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी व्यक्‍त केला. 
 
दोन्ही देशांनी व्यापार 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. संरक्षण, दुर्मिळ खनिजे, तंत्रज्ञान, छोटे आणि मध्य अणुप्रकल्प, शिक्षण, अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रात एकत्रित कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.  कॅनडा भारताच्या नागरी अणु ऊर्जा क्षेत्रातींल कार्यक्रमासाठी 2.6 अब्ज डॉलर्सच्या युरेनियमचा पुरवठा करणार आहेत. त्याबाबतचा करार दोन्ही देशांनी केला आहे. 
 
दहशतवाद, अतिरेकी कारवया आणि कट्टरपंथी विचारांच्या विरोधात कार्य करण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले. दहशतवाद दिवसेंदिवस जगासाठी धोकादायक बनत चालल्याचे मत मोदी आणि कार्नी यांनी व्यक्‍त केले. कोणतेही संघर्ष चर्चा आणि वाटाघाटीतून सोडविले जावेत, असा त्यांचा सूर होता. मध्य पूर्व आणि पश्‍चिम आशियातील युद्धावर दोन्ही पंतप्रधांनांनी तीव्र चिंता व्यक्‍त केली. भारतासोबत व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात भरीव कार्य करण्याची ग्वाही कार्नी यांनी व्यक्‍त केली.

Related Articles