मानाची होळी पेटवून मढीच्या यात्रेला प्रारंभ   

पाथर्डी, (वार्ताहर) : भटक्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मढीमध्ये कानिफनाथाच्या जयघोषात आणि आदेश... आदेश...च्या निनादात  दत्तमंदिराशेजारी साखर बारवेजवळ गोपाळ समाजाच्या मानकर्‍यांच्या हस्ते मानाची होळी सोमवारी विधिवत पेटविण्यात आली. या सोहळ्याने मढी यात्रेला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.
 
गोपाळ समाजाचे माणिकराव लोणारे (येवला), नामदेवराव माळी (चिखली), रघुनाथ काळापहाड (धारवाडी), हरीभाऊ गव्हाणे ऊर्फ हंबीरराव (बेलगाव) आणि भागीनाथ माळी (चिखली) हे पाच मानकरी मानाच्या होळीप्रसंगी उपस्थित होते. यावेळी ज्ञानदेव गव्हाणे (मावलेवाडी) यांनी मानाच्या गोवर्‍या वाहून नेण्याची परंपरागत जबाबदारी पार पाडली.कानिफनाथ गडावरून देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळाकडून मानाच्या गोवर्‍या स्वीकृत करून गोपाळ समाजाचे मानकरी गडाच्या पायथ्याशी दत्तमंदिराशेजारी असलेल्या साखर बारवेजवळ आले. पोलिस निरीक्षक विलास पुजारी, नायब तहसीलदार किशोर सानप, मंडल अधिकारी प्रमोद कटारवरे यांनी मानाच्या गोवर्‍यांबाबतची कागदपत्रे तपासून खात्री केली. त्यानंतर पारंपरिक विधीनुसार होळी पेटविण्यात आली.
 
गोपाळ समाजाला होळी पेटविण्याचा मान नाथांनी दिल्याची ऐतिहासिक परंपरा आहे. ही परंपरा जपत यंदाही होळी शांततेत व उत्साहात पार पडली. यापूर्वी, कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला टेकविण्यात आली होती. काठी व होळी या दोन्ही मानाच्या विधीनंतर मढी यात्रेला औपचारिक सुरुवात झाली. या वेळी मढीचे ग्रामस्थ, नाथभक्त तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, सरचिटणीस माधुरी मरकड, चिटणीस अनिल साठे, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, कार्याध्यक्ष महादेव कोकाटे, विश्‍वस्त उत्तम मरकड, मदन मरकड, उषा मरकड, रवींद्र आरोळे, माजी सरपंच भगवान मरकड, डॉ. विलास मढीकर, डॉ. रमाकांत मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड आदी उपस्थित होते.
 
यावेळी गोपाळ समाजातील विविध संघटना एकत्र येऊन समाजमेळावा पार पडला. समाजातील प्रसाद लोणारे यांना जिल्हा पोलिस प्रमुखपदी बढती मिळाल्याबद्दल, तसेच निलेश पवार (शिरूर) यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Related Articles