पंढरपूर कॉरिडॉर विरोधात बंद आणि मोर्चा   

सोलापूर, (प्रतिनिधी) : पंढरपूर मंदिर परिसरात कॉरिडोरच्या विरोधात पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्यावतीने सोमवारी बंद पाळण्यात आला. तसेच, मोर्चा काढण्यात आला. महाद्वारातील नामदेव पायरी येथे संत श्री नामदेव महाराजांच्या पायरीचे वारकरी संप्रदायातील माऊली महाराज शिरवळकर, वडगावकर महाराज, देहूकर महाराज आदींच्या हस्ते पूजा करून या मोर्चाला सुरुवात झाली. 
 
आजपर्यंत बाधित भागातील नागरिकांनी कॉरिडर विरोधात अनेक चळवळी केल्या. त्यामध्ये हा मोर्चा सर्वांत मोठा ठरला आहे. दोन हजारांहून अधिक नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. यात महिलांची संख्या मोठी होती. एकच जिद्द कॉरिडोर रद्द, जुलमी कॉरिडॉर रद्द करा, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. 
 
कॉरिडॉर विरोधात पहिल्यांदाच एवढा मोठा बंद आणि मोर्चा काढण्यात आला. राज्याच्या अंदाजपत्रकात कॉरिडरसाठी तरतूद होणार, अशी चर्चा असताना कॉरिडोरला पंढरपुरातून मोठा विरोध दिसून येत आहे.  या मोर्चात नगरशेठ नानासाहेब कवठेकर, नगरसेवक ओंकार जोशी, रा. पां. कटेकर यांसह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले  होते. 

Related Articles