धवलक्रांती दृष्टावली ! (अग्रलेख)   

अहिल्यानगर जिल्ह्यात फोफावलेली धवलक्रांती मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत बदलली. या व्यवसायाला दृष्टच लागली; परंतु आजही नागरिकांच्या आरोग्याला पूरक ठरेल असे निर्भेळ दूध देण्याचा काही खासगी संस्थांमार्फत प्रयत्न आहे. 
 
साखर उद्योगानंतर सहकाराच्या बालेकिल्ल्यात नावारुपाला आलेला दुग्धव्यवसाय गेल्या 15-20 वर्षांत चांगलाच फोफावला होता. साखरेप्रमाणेच दुधाच्या उत्पादनात अहिल्यानगर जिल्ह्याने उभ्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला. सहकार तत्त्वावर स्थापित झालेल्या दूध संघांच्या माध्यमातून या उद्योगाला नवसंजीवनी मिळाली. हा व्यवसाय शेतीला पूरक म्हणून शेतकर्‍यांनी आत्मसात केला. सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांनी व्यवसायाच्या वाढीसाठी केलेले अर्थसहाय्य आणि पशुसंवर्धनात झालेली क्रांती या व्यवसायाच्या वृध्दीचे मूळ कारण ठरले. वाढत्या व्यवसायाची दखल शासकीय पातळीवर घेतली गेली आणि या जिल्ह्यात ‘धवलक्रांती’बरोबरच ‘दुधाचा महापूर’ शासनदरबारी अस्तित्वात आला. या माध्यमातून शेतकर्‍याला, शेतीउद्योगाला पूरक म्हणून अर्थसहाय्य मिळाले. गेल्या दशकाचा विचार करता मागे वळून पाहताना या जिल्ह्यात झालेली धवलक्रांती विचारात घेऊन शासनाने येथे दूध भुकटीच्या प्रकल्पाचाही विचार सुरू केला. राजकीय साठमारीत या प्रकल्पाचे तीनतेरा वाजले म्हणजे सुरू होण्यापूृर्वीच तो वादाच्या भोवर्‍यात सापडला. प्रगतीच्या उंबरठ्यावर असलेला हा व्यवसाय मात्र गेल्या 8-10 वर्षांत भेसळीची लागण झाल्याने दृष्टावला. दूध संघ डबघाईला आले आणि या परिस्थितीचा लाभ काही खासगी संघांनी उचलला आणि त्यातून भेसळीचा जन्म झाला. अन्न व औषध प्रशासनाने वारंवार छापे टाकून भेसळीचे प्रकार उघडकीस आणले. छाप्यानंतर या प्रकाराला आळा बसेल अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केली; परंतु ती फोल ठरली. भेसळीविरुध्द कारवाई एवढ्यापुरतीच मर्यादित ही बाब राहिली आणि प्रत्यक्षात भेसळ करणार्‍यांविरुध्द फारशी कोणत्याही प्रकारची कडक कारवाई न झाल्याने या व्यवसायाचे गांभीर्यच नष्ट झाले. 
 
कारवाईचे काय?
 
दुधाला आरोग्यशास्त्रात पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. त्या पूर्णान्नातच रासायनिक पदार्थांचा वापर करून भेसळ होत असेल तर आरोग्याची वृध्दी कशी होणार? जी लहान बालके या पूर्णान्नावरच अवलंबून असतात, त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होणार, याचा साधा विचारही भेसळीला प्रोत्साहन देणार्‍यांच्या मनात येऊ नये, ही बाब खरोखर चिंतेची आहे. जिल्ह्याची दुधाची मागणी आणि उत्पादन याचा मेळ बसेनासा झाला. प्रत्यक्षात जनावरांपासून मिळणारे दूध विचारात घेता मागणी आणि उत्पादन यातील तफावत याचा विचार केला तर या शंका मनाला चाटून जाऊ लागल्या. त्यातच आरोग्याचाही गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आणि दशकाच्या पूर्वी जिल्ह्यात फोफावलेला धवलक्रांतीचा कार्यक्रम चांगलाच दृष्टावला.साखर उद्योगाबरोबरच सहकाराच्या माध्यमातून फोफावलेला दुग्धव्यवसाय भेसळीच्या कारणाने दृष्टावला आणि या व्यवसायाची पुरती वाताहात झाली. मात्र, भेसळीचे कृत्य करणार्‍यांना शासनाच्या कायद्याची किंवा यंत्रणेकडून होणार्‍या कारवाईची भीतीच राहिली नाही. भेसळयुक्त दुधाच्या बाबतीत आजवर अनेक छापे घातले गेले. प्रसंगी गुन्हेही दाखल झाले; परंतु संबंधितांवर कायद्याप्रमाणे कडक कारवाई झाल्याचे उदाहरण या जिल्ह्यात दिसून येत नाही. कारण सहकाराचा आशीर्वाद असलेला हा व्यवसाय राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या अनेक धुरंधरांच्या नेतृत्वाखाली कार्यरत ठरल्याने व या व्यवसायावर शासनकर्त्यांची मेहेरनजर असल्यामुळे भेसळीच्याबाबतीत कारवाईची कटुता कोणीही स्वीकारली नाही. जुजबी होणार्‍या कारवाईवर निर्भेळ दूध देण्याचा शासनाचा प्रयत्न फारसा यशस्वी झाल्याचे चित्र आज जिल्ह्यात दिसत नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात फोफावलेली धवलक्रांती मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत बदलली. या व्यवसायाला दृष्टच लागली; परंतु आजही नागरिकांच्या आरोग्याला पूरक ठरेल असे निर्भेळ दूध देण्याचा काही खासगी संस्थांमार्फत प्रयत्न आहे. या प्रयत्नाला शासनाने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. आरोग्यवृध्दीच्या नावाखाली शासनाकडून मदतीचा हात मिळाल्यास निर्भेळ दुधाचा पुरवठा होऊन जिल्ह्यात सुरू झालेली धवलक्रांतीची योजना यशस्वी होईल.

Related Articles