उत्साह आणि आंनदाचा रंगसोहळा   

मधुरा कुलकर्णी 

माणसाच्या आयुष्यातलं रंगांचं महत्व काय वर्णावं? तनामनाला सुखावणार्‍या या सणाच्या निमित्ताने निसर्गाचं नवसर्जनशील रुप पहायला मिळतंच, पण एका वेगळ्या हंगामात प्रवेश करताना मनात निर्माण होणारे कुतुहलमिश्रीत उत्साहभावदेखील तरंग उमटवून जातात. होळीच्या निमित्ताने त्याज्य वृत्तींचा त्याग करायचा, तर धुळवड किंवा रंगपंचमीनिमित्त नव्या रंगात न्हाऊन निघायचं, हा एक अनोखा रंगसोहळाच म्हणायला हवा.
 
आणखी एक रंगांचा सण समोर उभा आहे. माणसाच्या आयुष्यातलं रंगांचं महत्व काय वर्णावं? तनामनाला सुखावणार्‍या या सणाच्या निमित्ताने निसर्गाचं नवसर्जनशील रुप पहायला मिळतंच, पण एका वेगळ्या हंगामात प्रवेश करताना मनात निर्माण होणारे कुतुहलमिश्रीत उत्साहभावदेखील  तरंग उमटवून जातात. होळीच्या निमित्ताने त्याज्य वृत्तींचा त्याग करायचा, तर धुळवड किंवा रंगपंचमीनिमित्त नव्या रंगात न्हाऊन निघायचं, हा एक अनोखा रंगसोहळाच म्हणायला हवा. 
 
रंगोत्सवानिमित्त धुळवड, रंगपंचमी यासारखे सण म्हणजे उत्साह आणि आनंदानं भारलेले उत्सव. वर्षभर बर्‍याच सणांचं साजरीकरण होत असतं. त्यातील काही कर्मकांडात अडकवणारे असतात. काही पूजाविधींमध्ये गुरफटवणारे असतात, काही दमवून टाकणारे असतात तर काही भरपूर खर्च घडवून आणणारे असतात. पण धूळवड असो वा रंगपंचमी, या सणांचा धाक कधीच वाटत नाही. त्यांच्या पूर्वतयारीचा ताण येत नाही.
 
माणसा-माणसाच्या मनात लपलेला अल्लडपणा, अवखळपणा हलवून जागा करणारे हे सण! प्रत्येकाच्याच मनात एक खट्याळ मूल लपलेलं असतं. पण पोक्तपणाचं ओझं, जबाबदार्‍यांचं भान, दहा तोंडानं बोलणार्‍या आणि परीक्षण करणार्‍या तोंडांचं भय यामुळे व्यवहार्य मेंदूच्या संदेशानं हे मूल अळीमिळी गूप चिळी साधून बसलेलं असतं. समाजाचा धाक प्रौढ शरीरातल्या या बालमनाला शहाणपणाच्या चौकटीत बंदिस्त ठेवत असतो. पण या सणांच्या निमित्तानं एका हिसक्यासरशी दावं तोडून चौखूर उधळणार्‍या जनावराप्रमाणे हे जखडलेलं खट्याळ मन उधळतं आणि रंगांच्या साम्राज्यात हरवून जातं. लांब तोंड करुन वैचारिकतेच्या जंजाळात अडकलेल्या चेहर्‍यांच्या भाऊगर्दीत एखादा हसतमुख, मिश्कील प्रवृत्तीचा माणूस यावा आणि आपल्या खुसखुशीत शैलीनं क्षणात वातावरणाचा नूर पालटवून टाकावा, अगदी तसेच भासतात हे सण! अंगाला रंगाची चिमूट चिकटण्याचा अवकाश... गांभीर्याचे सगळे मुखवटे झरझर गळून पडतात आणि ‘खरे रंग’ बाहेर येतात.
 
रंगपंचमी
 
व्यक्त होणं हा माणसाचा स्वभाव आहे. रंगांच्या माध्यमातून ते अधिक चांगल्या पध्दतीनं साधतं. रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव... मग हा रंग भक्तीचा असतो, कुठे प्रणयाचा असतो, कुठे उत्साह आणि आनंदाचा असतो तर कुठे श्रध्देचा असतो. मथुरा, वृंदावनातील रंगपंचमी प्रत्येक पुरुषाला कृष्ण आणि प्रत्येक स्त्रीला राधेचं रुप देऊन जाते. कारण इथे महिनाभर रंगणार्‍या सणाच्या पर्वात प्रत्येकावर राधा- कृष्णाच्या नात्याचा रंग चढत असतो. प्रीती, भक्ती, प्रणय, माया, ममता या सर्व रंगांमध्ये भाविक न्हाऊन निघतात. गोप-गोपिकांसवे खेळाचा मनसोक्त आनंद लुटणारा, नटखटपणामुळे आयुष्यात चैतन्य भरणारा कान्हा अंशाअंशानं प्रत्येकाच्या मनात सामावतो आणि या रंगाच्या मेळाव्यावर तोच चैतन्याचा रंग चढतो. आपल्याकडेही अशाच मंगल भावनेनं अंगावर रंगांच्या कमानी चढवल्या जातात. हिरवा, निळा, पिवळा, लाल, केशरी, नारिगी... किती रंग... किती वेगळे त्यांचे स्वभाव... किती वेगळी त्यांची वैशिष्ट्यं... पण एकत्र येतात तेव्हा बेमालुमपणे परस्परात मिसळतात आणि काही वेगळ्याच रंगांना जन्म देऊन जातात.
 
रंगांच्या या दुनियेत धाक, संयम, सबुरी, शहाणपणा या शब्दांना काहीही जागा नाही. मनाला येईल त्या रंगानं मूठ भरायची आणि समोरच्याचं सर्वांग त्या रंगात माखून टाकायचं. इथे हा मोठा, तो लहान, हा ज्येष्ठ तो कनिष्ठ, असा भेदभाव नाही. सगळेच रंगात न्हाऊन निघतात तेव्हा हा भेदाभेद कुठच्या कुठे गळून पडतो. एका अर्थी माणसानेच निर्माण केलेली ही वलयं एकसारखी होतात आणि वर्तुळ विस्तारतं. या वर्तुळाला कोणताही कोपरा नाही, जाचणारा कोणताही कोन नाही. म्हणूनच प्रत्येकाला सामावून घेणारा हा सण  महत्त्वाचा ठरतो. या दिवसात सृष्टीत चैतन्याचे पदरव जाणवू लागलेले असतात. पानगळीच्या या शेवटच्या टप्प्यात झाडाच्या शेंड्यांवर हिरवी पावलं उमटू लागलेली असतात. वसंताच्या आगमनानं फुलझाडांवर फुलांचे घोस लगडू लागलेले असतात. हे काहीसं शुष्क आणि कोरडं वातावरण सुसह्य व्हावं यासाठी सृष्टी भडक रंगांची बरसात करत असते. सुगंधाच्या लाटा उष्णतेला गंधमान करत असतात. निसर्गाच्या या बदलाशी एकरुप होण्याचा संकेत देणारा आणि ॠतूबदलाची सिध्दता करणारा सण म्हणजे रंगपंचमी. होळीच्या भडक्यासारखा वाढणार्‍या उष्णतेचा प्रकोप रंगांच्या सानिध्यात हलका करायचा ही शिकवण देणारा हा सण.
 
शोधू पहाता या सणांचे विविध पदर समोर येतात. हा गुंता सोडवणं म्हणजेच आयुष्याचे नवनवीन कंगोरे शोधणं आणि अर्थ जाणून घेणं. ही रंगपंचमी, धुळवड आपल्याला अनेक प्रतीकं सुचवून जाते. प्रत्येक रंगाचं एक वैशिष्ट्य असतं तसंच प्रत्येक व्यक्तीचं एक वैशिष्ट्य असतं. हे व्यक्तीविशेष जपणं म्हणजेच स्वत्व जपणं अशी भावना जागृत होते. या कोशात व्यक्ती आत्मकेंद्री होण्याचा धोकाच अधिक असतो. आपलाच रंग किती नवखा, किती अनोखा असा दंभ कुरवाळत आत्ममग्न  होऊ पहाणार्‍या मनाचा कोशभेद करुन व्यक्तीला समाजाभिमुख करणारा हा सण आहे. सृष्टीतल्या सगळ्या रंगांचा परिचय करुन घ्या, सगळ्या रंगांचे स्वभाव ओळखा आणि आवश्यक तिथे त्याचा उपयोग करुन घ्या ही शिकवण देणारा  हा सण. हिरवा रंग सर्जनाचा, भगवा रंग त्यागाचा, पांढरा रंग वैराग्याचा हे खरं असलं तरी कधी तरी हे सगळे रंग, या सगळ्या जाणिवा, या सगळ्या भावना समरस व्हायला हव्या हे सांगणारा हा सण आहे. शेवटी विविध रंगांचा समतोल साधणं म्हणजे जगणं. इथे भडक रंगांना संतुलित करण्यासाठी हलके रंग हवेतच. भावना आणि व्यवहार यांचा तोल सांभाळत होणार्‍या  प्रवासाला ‘संसार’ असं म्हटलं जातं तेव्हा विविध रंगांचा तोल सांभाळणं ओघानंच येतं.  कुठल्याच रंगानं दुसर्‍यावर अतिक्रमण करु नये. त्याचं अस्तित्व, ओळख झाकोळून टाकू नये. वृत्तींमध्ये हा समतोल असेल तर मती साथ देते आणि कृती संतुलित राहते. रंगपंचमीसारखा सण हेच तत्वज्ञान सांगणारा. आयुष्याच्या काही वर्षांच्या उण्यापुर्‍या प्रवासात माणसानं सर्व रंग न्याहाळायला हवेत. त्याचा आस्वाद घ्यायला हवा. त्यांचा हलकासा स्पर्शही नवी दृष्टी देण्यास कारक ठरु शकतो.
 
जे व्यक्तीचं तेच समाजाचं... साचलेपणा दूर करण्यासाठी नवलाई गरजेची असते. सततच्या वापरामुळे रंग फिके होतात. परिणाम बोथट होतात. जळमटं लोंबू लागतात. अयोग्य आणि अमंगल पुटं चढून मुळचा रंग हरवू लागतो. काही अनावश्यक रंग मुळच्या गर्भरेशमी रंगावर आक्रमण करु पाहतात. या सर्वाची जाण ठेऊन पिचकारीतून उडणार्‍या फवार्‍याप्रमाणे विवेकी विचारांच्या फवार्‍यानं ही जळमटं दूर करायला सांगणारा असा हा सण. समाज एकसंध रहावा यासाठी वैचारिक भेसळ, प्रदूषण दूर करुन नव्या झर्‍यांना वाट मोकळी करुन द्यावी लागते. दुष्काळासारख्या परिस्थितीला तोंड द्यायचं तर विहीर उपसून साठलेली घाण काढावी लागते, खोली वाढवावी लागते. तरच गर्भामध्ये ओलावा पाझरतो आणि झरे मोकळे होऊन विहीर भरु लागते. समाजाचं तसंच आहे. काळाच्या ओघात अनेक विषयांची राळ उठते आणि गाळ साठत जातो. हा गाळ विचारशक्ती कुंठीत करतो, एका जड आवरणाआड समाजातील विवेक दडवू पहातो. 
 
नकारात्मकतेच्या रंगाआड दडवू पाहतो. ही परिस्थिती कायम राहिली तर भरकटलेपण जाणवणं स्वाभाविक आहे. पण हे टाळायचं तर होळीत जळणार्‍या पाल्यापाचोळ्यासारखे हे अमंगल, अप्रस्तुत विचारही जाळून टाकायला हवेत आणि नवविचार आत्मसात करण्यासाठी अवकाश निर्माण करायला हवं. रंगांचा हा उत्साह अशा अवकाशनिर्मितीची संधी देतो. समाजातील प्रत्येक घटकाला एकरुप देण्याची संधी देतो. ही संधी साधायला हवी. सणाची धुंदी अनुभवताना ही संधी दवडता कामा नये.  

Related Articles