E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
'ती'ची कर्तबगारी महिला दिन विशेष
रविवार केसरी
काँग्रेसचे धाडस की आत्मघात?
Wrutuja pandharpure
22 Feb 2026
राज्यरंग , राही भिडे
‘इंडिया आघाडी’मध्ये राहूनही सतत काँग्रेसविरोधात भूमिका घेणार्या ममता बॅनर्जी यांच्या राजकारणात काँग्रेसला अजिबात स्थान नाही. पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेसचा एकही आमदार नाही. या पार्श्वभूमीवर आता विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा काँग्रेसने घेतलेला निर्णय धाडसी पाऊल आहे की आत्मघात असा प्रश्न पडला आहे.
देशात गेल्या लोकसभेच्या निवडणुकीआधी ‘इंडिया’ आघाडी अस्तित्वात आली. या आघाडीत मुळात विसंवाद होता. देशभर डावे आणि काँग्रेस एकत्र आणि केरळमध्ये परस्परविरोधी, तृणमूल काँग्रेस ‘इंडिया’ चा घटक पक्ष असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र काँग्रेसच्या विरोधात असे चित्र दिसले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर या आघाडीतील मित्रपक्ष भाजपवर कमी आणि परस्परांवर जास्त टीका करतात. ‘आप’ आणि अन्य पक्षांनी एकापाठोपाठ काँग्रेसशी फारकत घेतली. काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसचे मित्र असले, तरी ते काँग्रेसला आपल्यामागून यायला भाग पाडतात. बिहारमध्ये तर काँग्रेसची वाताहत झाली. तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेस मित्रपक्ष असले, तरी द्रमुक काँग्रेसला सरकारमध्ये सहभागी करून घ्यायला तयार नाही.
सध्या काँग्रेसच्या ताब्यात कर्नाटक तेलंगण आणि हिमाचल प्रदेश ही राज्ये आहेत. काश्मीरमध्ये ‘नॅशनल कॉन्फरन्स’बरोबर आघाडी करून निवडणूक लढवली; परंतु तिथेही ‘नॅशनल कॉन्फरन्स’ने काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेतलेले नाही. महाराष्ट्राच्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढली; परंतु अतिशय माफक यश मिळाले. चंद्रपूरमध्ये भाजपने काँग्रेसच्या दोन गटांमधील वादाचा अचूक फायदा उठवला. फक्त लातूर महापालिकेचीच सत्ता काँग्रेसला मिळाली. 12 जिल्हा परिषदांपैकी एकाही जिल्हा परिषदेची सत्ता काँग्रेसला मिळवता आली नाही. मित्रपक्षांशी युती न केल्याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी काँग्रेसला सोबत घ्यायला तयार नाहीत. डावे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची प्रकृती तेथ्थे तोळामासा झाली आहे. अशा परिस्थितीत दोघांनी युती केली असती, तर काही जागा तरी पदरात पाडून घेता आल्या असत्या; परंतु डावे आणि काँग्रेस या दोघांमध्येही सध्या विस्तव जात नाही. गमवायला काही नसले, तरी काही मिळवण्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले ठेवायला हवे होते; परंतु निवडणुकीच्या तीन महिने अगोदरच काँग्रेसने डाव्यांशी असलेली आघाडी तोडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. हा निर्णय केवळ निवडणूक रणनीती नाही, तर काँग्रेसच्या अस्तित्वाशी, स्वाभिमानाशी आणि भवितव्याशी निगडित आहे.
हा निर्णय पक्षाला पुनरुज्जीवनाची संधी देईल की आणखी राजकीय उपेक्षेकडे ढकलेल? गेल्या दशकात पश्चिम बंगालची राजकीय लढत द्विध्रुवीय बनली आहे. एका बाजूला ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस आणि दुसर्या बाजूला झपाट्याने वाढलेला भारतीय जनता पक्ष. या दोन शक्तींच्या संघर्षात काँग्रेस आणि डावे दोघेही हळूहळू कोमात गेले. 2016 मध्ये काँग्रेस-डावे आघाडीला काही प्रमाणात यश मिळाले; मात्र 2021 मध्ये परिस्थिती पूर्ण बदलली. मतांची टक्केवारी घसरली, जागा शून्यावर आल्या आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खचला. या पार्श्वभूमीवर स्वबळाचा निर्णय समजून घेतला पाहिजे.
आघाडीत राहूनही काँग्रेसची घसरण थांबली नाही. उलट, स्वतंत्र ओळख धूसर झाली. त्यामुळे स्वतंत्र लढतीचा निर्णय हा स्वाभिमानाचा प्रयत्न म्हणूनही पाहिला जातो; मात्र वास्तव कठोर आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातच रंगते आहे. ममता यांचे मजबूत संघटन, कल्याणकारी योजना आणि प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा त्यांना बळ देतो. दुसरीकडे, भाजपने मागील काही वर्षांमध्ये मोठी मजल मारली आहे. राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रभाव, पैशाचा वापर,आक्रमक प्रचार आणि संघटनात्मक विस्तार यामुळे भाजप आता प्रमुख प्रतिस्पर्धी बनला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला आपले राजकीय अवकाश कुठे मिळणार, हा प्रश्नच आहे.स्वबळावर लढण्याचे समर्थक करणारे म्हणतात की गमावण्यासारखे काही उरलेले नाही. शून्यावर आलेल्या पक्षासाठी जोखीम पत्करणेच योग्य. 294 जागांवर उमेदवार उभे केल्याने संघटना पुन्हा सक्रिय होईल. स्थानिक नेतृत्वाला संधी मिळेल. कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल. दीर्घकालीन पुनर्बांधणीसाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. काँग्रेसने संयमी आणि सातत्यपूर्ण धोरण स्वीकारले, तर भविष्यात फायदा होऊ शकतो. परंतु असा युक्तिवाद करणार्यांच्या हे लक्षात येत नाही, की भाजपने देशाची सत्ता आल्यानंतर देशभरातील कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये उतरवले. संघाचे संघटन सोबतीला होते. पैसा, संसाधने यांचा पुरेपूर वापर केला. त्या बाबतीत काँग्रेसचा विचार करता ना संघटन, ना कार्यकर्ते, ना विचारधारा, ना संसाधने अशी स्थिती दिसते. भाजप आक्रमक हिंदुत्त्वाच्या जोरावर पश्चिम बंगालमध्ये पाय पसरतो आहे, तर तृणमूल काँग्रेसही हिंदुत्त्व आणि मुस्लिम मतांच्या जोरावर भाजपचा सामना करीत आहे. काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेची प्रतिमा पुसून टाकली आहे. सौम्य हिंदुत्त्व ही कामाला आले नाही. पाठीशी एकही मतपेढी नाही. अशा परिस्थितीत स्वबळावर लढून ती तृणमूल काँग्रेस आणि भाजपला कसा पर्याय देणार, हा प्रश्न राहतो. मतदार ‘जिंकणार्या’ पक्षाकडे झुकतो. काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमकुवत आहे. बूथस्तरावर मजबूत जाळे नाही. राज्यात प्रभावी, जनमानसाला भावणारे नेतृत्व नाही. अशा स्थितीत स्वबळाची लढत मतांचे विभाजन करून भाजप किंवा तृणमूलपैकी एखाद्यालाच अप्रत्यक्ष लाभ देईल, अशी भीती व्यक्त केली जाते. याशिवाय, स्वबळाचा निर्णय केवळ संघटनात्मक नव्हे, तर मानसिक लढाही आहे. कार्यकर्त्यांना जिंकण्याची आशा हवी असते. निकाल पुन्हा निराशाजनक आला, तर उरलेली शक्तीही खचण्याचा धोका आहे. राजकीय पक्षांसाठी पराभवापेक्षा निराशा अधिक घातक असते.
काँग्रेससमोरील आणखी एक प्रश्न म्हणजे मतदारांची धारणा.आज पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसकडे सत्तेचा थेट पर्याय म्हणून पाहिले जात नाही. मतदाराला तृणमूल काँग्रेसविरोधी मतदान करायचे असेल, तर तो भाजपकडे झुकतो. भाजपविरोधी मतदान करायचे असल्यास तृणमूल काँग्रेसकडे जातो. या समीकरणात काँग्रेसला ‘तिसरा कोन’ निर्माण करावा लागेल. तो केवळ घोषणांनी साध्य होणार नाही. त्यासाठी सामाजिक प्रश्नांवर सातत्यपूर्ण आणि आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर विचारधारेची लढाई लढत आहे. सामाजिक न्याय, घ्घटनेचे संरक्षण आणि लोकशाही मूल्ये यांचा मुद्दा पुढे आणला जात आहे; पण पश्चिम बंगालमध्ये स्थानिक वास्तव वेगळे आहे. येथे प्रादेशिक अस्मिता, कल्याणकारी राजकारण आणि ध्रुवीकरण हे घटक निर्णायक ठरतात. काँग्रेसने आपली रणनीती या वास्तवाशी जुळवून घेतली नाही, तर स्वबळाची लढत केवळ प्रतीकात्मक ठरेल. दुसरीकडे, राजकारणात जोखीम घेतल्याशिवाय परिवर्तन घडत नाही. स्वबळावर लढणे म्हणजे पराभव मान्य करणे नव्हे; उलट, संघर्ष स्वीकारणे होय. दीर्घकालीन दृष्टीने पाहता, काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये पुनरुज्जीवन हवे असेल, तर संघटना बांधणी, युवा नेतृत्व आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस कार्यक्रम यावर भर द्यावा लागेल.काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय हा एक मोठा जुगार आहे. यशस्वी झाला तर पक्षाला नवसंजीवनी मिळू शकते. अपयशी ठरला, तर राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहू शकते; पण सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसकडे पर्याय मर्यादित आहेत. आघाडीत राहून ओळख हरवण्यापेक्षा स्वतंत्र लढतीतून नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा कदाचित अधिक सन्मानाचा मार्ग ठरेल.
Related
Articles
जागतिक क्रूडच्या लाटेवर भारतीय तेल-गॅस शेअर्स
09 Mar 2026
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उद्योगपती ए. महेशकुमार रेड्डी, ओबी हॉस्पॅलिटिजचे ओबेरॉय यांना टिळक विद्यापीठातर्फे डी.लिट.
11 Mar 2026
इराणच्या कारखान्यावरील हल्ल्यामुळे बहरीनमधून खनिज तेलाचा निर्यात बंद
09 Mar 2026
कुनोत पाच चित्त्यांचा जन्म
10 Mar 2026
धनगर आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक
15 Mar 2026
जुन्नरमधील टोमॅटो उत्पादक संकटात
15 Mar 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमिरातीवर इराणचा हल्ला
2
क्युबाचे सरकार कोसळणार
3
निम्या राज्यात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता
4
सीतेला पटली हनुमानाची ओळख
5
गॅस वाटपाच्या निकषात बदल
6
लेबाननवरील हल्ल्याला हिजबुल्लाकडून कडवा प्रतिकार