E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
'ती'ची कर्तबगारी महिला दिन विशेष
संपादकीय
राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी (अग्रलेख)
Wrutuja pandharpure
21 Feb 2026
राजकारणातून निवृत्तीचा विचार शरद पवार अधूनमधून बोलून दाखवतात. नवीन पिढीला आता संधी दिली पाहिजे, मी कुठेतरी थांबले पाहिजे, असेही ते म्हणतात. आजच्या राजकीय परिस्थितीत ते आपल्या या विचारावर ठाम राहतील का? कदाचित ते आपली भूमिका बदलतील सुद्धा!
निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त झालेल्या 37 जागांच्या निवडणुकीचे संकेत दिले आहेत. पुढील महिन्यात ही निवडणूक होत असून, तिची अधिसूचना येत्या 26 रोजी जाहीर होईल. महाराष्ट्रातील सात जागा असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन, भाजपचे दोन, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी एक आणि रिपब्लिकन पक्षाचे एक असे सातजण येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. निवृत्त होत असलेल्यांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही समावेश असल्याने ते पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवणार का याविषयी उत्सुकता आहेत. स्वतः पवार यांनी ते इच्छुक असल्याबद्दल जाहीररीत्या काहीच खुलासा केला नसला तरी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पवार राज्यसभेसाठी पुन्हा उत्सुक असल्याचे म्हटले आहे. राऊत हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते कधी झाले असा यावरून प्रश्न पडतो. निवडणुकीत विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला प्रथम पसंतीच्या 37 मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीचे पक्षीय बलाबल 46 एवढेच आहे. महाविकास आघाडीने सर्वानुमते उमेदवार दिल्यास तो विजयी होईल; पण महाविकास आघाडीतच फाटाफूट झाल्यास त्याचा फायदा भाजप उचलू शकतो. शरद पवारांच्या नावाला सर्वानुमते पाठिंबा मिळाल्यास त्यांची निवड ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मागील निवडणुकीप्रमाणे भाजप धक्कातंत्र वापरून आपला 7 वा उमेदवार निवडून आणणार का हे पाहणेही रंजक ठरणार आहे. महायुतीतील पक्षीय बलाबल पाहता, त्यांचे सहा जण राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. भाजपच्या कोट्यातून रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांची वर्णी पुन्हा लागू शकते. महाविकास आघाडीतील ठाकरे गटानेही उमेदवार देण्याचा विचार बोलून दाखवला आहे. काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नाही; पण राज्यसभेसाठी त्यांचेही अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीत उमेदवाराबाबत एकमत होणार का, हा खरा प्रश्न आहे.
सातवी जागा कोणाला?
महायुतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यासारखेच आहे. भाजपकडून विनोद तावडे, विनय सहस्रबुद्धे, सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे, तर शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाला पसंती मिळेल अशी शक्यता आहे. खरी स्पर्धा आहे ती महाविकास आघाडीत. शरद पवार यांच्या वयाचा आणि शारीरिक क्षमतेचा विचार करता ते खरोखरीच निवडणूक लढवणार का, की संजय राऊत यांनी विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी पवारांचे नाव आतापासूनच पुढे केले अशी चर्चा आहे. शरद पवार अनुत्सुक असतील, तर काँग्रेसही त्या जागेवर आपला दावा सांगू शकेल. ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत, त्या पुन्हा निवडणुकीत लढणार असतील, तर मित्र पक्षांच्या पाठिंब्याशिवाय त्यांची निवड अशक्य आहे. महाविकास आघाडीने एकमताने उमेदवार न दिल्यास सहाव्या आणि सातव्या जागेसाठी चुरशीचा सामना होऊ शकतो. महायुतीकडे 235 पेक्षा अधिक संख्याबळ असल्याने त्यांच्या सातपैकी सहा जागा सहजपणे निवडून येऊ शकतात; मात्र महाविकास आघाडीला आणखी एखादी जागा निवडून आणायची झाल्यास अपक्षांची मताची आवश्यकता लागेल. मविआमध्ये फाटाफूट, क्रॉस व्होटिंग किंवा मतदानाला काहींना गैरहजर ठेवून सातवी जागा भाजप पदरात पाडून घेऊ शकेल. देवेंद्र फडणवीस अशा रणनीतीसाठी वाकबगार आहेतच! स्वतः शरद पवार निवडणुकीस उभे नसतील, तर महाविकास आघाडीत उमेदवारावरून एकमत न झाल्यास भाजप या संधीचा फायदा उचलू शकतो. शरद पवार आता प्रत्यक्ष राजकारण न करता थांबणार का आणि नवीन उमेदवाराला संधी देणार का हेही पाहावे लागेल. शरद पवार या एकमेव नावावरच महाविकास आघाडीत एकमत होऊ शकते. पवार रिंगणात असतील, तर भाजपसाठी फोडाफोडीचे तंत्र नैतिक आणि राजकीयदृष्ट्या अवघड ठरेल. पवार यांचा प्रभाव अजूनही कायम असल्याने मविआला त्यांच्या उमेदवारीचाच प्राधान्याने विचार करावा लागेल.
Related
Articles
सर्वोच्च न्यायालयाने जनहित अर्ज फेटाळला
10 Mar 2026
अनिल अंबानी यांच्या मुंबई, हैदराबादमधील कंपन्यांवर छापे
06 Mar 2026
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची दारे खुली
10 Mar 2026
इराणमध्ये १ हजार २३० बळी
06 Mar 2026
जागतिक क्रूडच्या लाटेवर भारतीय तेल-गॅस शेअर्स
09 Mar 2026
पुण्याबाहेरही विस्तारणार मेट्रोचे जाळे...
07 Mar 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारताच्या इतिहासातील विस्मृतीत गेलेल्या रणरागिणी
2
पहलगाम हल्ल्यातील चीनी कनेक्शन उघड
3
अर्जुन तेंडुलकर-सानिया यांच्या विवाह सोहळ्याला माजी क्रिकेटपटूंची उपस्थिती
4
युद्ध आणि चटके (अग्रलेख)
5
अखेर बिनविरोध निवड (अग्रलेख)
6
शेअर बाजाराची मोठी घसरण