पुणे व परिसरातील तपमानात वाढ   

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर व परिसरातील कमाल आणि किमान तपमानात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी ऊन आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. शुक्रवारी शहरात 33 अंश कमाल, तर 17.5 अंश किमान तपमानाची नोंद झाली. उद्या (रविवार) पासून पुन्हा तपमानात 1 ते 2 अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. 
 
तपमानात वाढ झाल्यामुळे सकाळपासूनच ऊन पडत आहे. अकरा वाजल्यापासून ऊन वाढण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणार्‍या नागरिकांना रूमाल, टोपी, छत्री, गॉगलचा वापर करावा लागत आहे. दुपारी त्यात भर पडत असल्यामुळे लोक घराबाहेर तसेच कार्यालयाबाहेर पडताना विचार करत आहेत. परिणामी दुपारी विविध प्रकारच्या बाजारपेठांसह रस्त्यांवर माणसांची संख्या घटत आहे. तसेच विविध रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येतही घट होत आहे. ऊन आणि उकाडा वाढल्यामुळे कार्यालयात तसेच कामाच्या ठिकाणी नागरिकांना फॅन, कुलर, एसीचा वापर करावा लागत असल्याचे चित्र शहर आणि परिसरात पाहण्यास मिळत आहे. 
 
दिवसाप्रमाणे रात्रीच्या तपमानातही वाढ झाल्यामुळे रात्री उष्ण व दमट वातावरण होत आहे. दिवसांप्रमाणेच रात्रीही नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी फॅन, कुलर, एसीचा वापर करावा लागत आहे. पहाटे मात्र काही प्रमाणात हवेत गारवा पसरत आहे. मात्र सूर्य उगवल्यानंतर हवेतील गारवा कमी होत आहे. येत्या दोन दिवसांत तपमानात आणखी वाढ होणार असल्यामुळे ऊन आणि उकाड्यातही वाढ होणार आहे. 
 
मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज 
 
राज्यात एकीकडे तपमान वाढत असतानाच दुसरीकडे मात्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात येत्या सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण आणि मराठवाड्यात मात्र हवामान कोरडे असणार आहे. बुधवारी मात्र पुन्हा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कोरडे हवामान असणार आहे. राज्यात काल यवतमाळ येथे नीचांकी 13.6 अंश किमान तपमानाची नोंद झाली. 

Related Articles