राजस्तानात कारखान्यात स्फोट   

सात कामगारांचा होरपळून मृत्यू

जयपूर : राजस्तानच्या खैरथल-तिजारा जिल्ह्यातील भिवाडी शहरात सोमवारी एका कारखान्यातील स्फोटात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, दोन जण आतमध्ये अडकले आहेत.खुशखेडा-करोली औद्योगिक क्षेत्रात काल सकाळी ही घटना घडली. कपड्याच्या कारखान्यात अनधिकृतपणे फटाके बनवले जात होते, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी सुमित्रा पारीक यांनी सांगितले.
 
कपडे बनविण्यासाठी हा कारखाना भाड्याने देण्यात आला होता. मात्र, कारखान्यात अनधिकृतपणे फटाके बनवले जात होते, असेही ते म्हणाले.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी आर्तिका शुक्ला यांनी दिले आहेत.
 
प्राथमिक अहवालानुसार, कारखान्यात २० हून अधिक कामगार होते. आगीनंतर अनेक कामगार बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र, नऊ कामगार बाहेर पडू शकले नाहीत. आतापर्यंत सात जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. अद्याप दोघे आतमध्ये अडकले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जिल्हा प्रशासन तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. 
 

Related Articles