जपानी सुलेखन ‘शुजी’चे प्रात्यक्षिक; टिळक स्मारक मंदिरात चित्रप्रदर्शनास प्रतिसाद   

पुणे : अखिल भारतीय लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक स्मृती चित्रप्रदर्शनात जपानी भाषा तज्ज्ञ आईको माकी यांच्या सुलेखन प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कागदावर शाईच्या माध्यमातून त्यांनी जपानी कॅलिग्राफीची प्रात्यक्षिके सादर केली. जपानी भाषेतील कॅलिग्राफी ही ‘शोडो’ म्हणून ओळखली जाणारी प्राचीन आणि देखणी कला असून तिच्या अद्वितीय परंपरेचे दर्शन माकी यांनी घडविले. जपानी लिपीतील रेषांची नजाकत, संतुलन आणि भावनांची अभिव्यक्ती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांतून उलगडली.
 
टिळक स्मारक मंदिर आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित हे प्रदर्शन टिळक स्मारक मंदिरात भरविण्यात आले आहे. यावेळी आईको माकी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागाच्या समन्वयक स्वाती धर्माधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
 
जपानी पारंपरिक संस्कृतीतील महत्त्वाची कला असलेल्या ‘शुजी’ विषयी माहिती देताना माकी यांनी सांगितले की, शतकानुशतके जपली गेलेली ही कला केवळ सुंदर अक्षरे लिहिण्यापुरती मर्यादित नसून ब्रशचा प्रवाह आणि शाईच्या गडद छटांमधून कलाकाराच्या अंतर्मनाची अभिव्यक्ती घडवते. संयम, एकाग्रता आणि सौंदर्यदृष्टी यांचा संगम असलेली ही कला रसिकांना जपानी संस्कृतीच्या सूक्ष्म जाणिवेशी परिचित करून देते.
 
अखिल भारतीय लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक यांचे ३८ वे स्मृती चित्रप्रदर्शन १० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. चित्रकलेचा विकास, प्रसार आणि जनजागृतीसाठी ९ फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी ५ वाजता नामांकित चित्रकारांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. प्रदर्शन सकाळी १०.३० ते रात्री ८ या वेळेत खुले आहे.देशभरातील चित्रकारांकडून पाचशेहून अधिक चित्रे प्राप्त झाली असून त्यापैकी २०० चित्रांची निवड प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. कलाप्रेमींनी प्रदर्शनाला भेट देऊन कलाकृतींचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles