E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
शिक्षणाचा वास्तव जीवनाशी संबंध आहे का?
Samruddhi Dhayagude
04 Feb 2026
शिक्षण बोध : संदीप वाकचौरे
शिक्षण म्हणजे नेमके काय? या प्रश्नाचे उत्तर सर्वांचे सारखे येणार नाही आणि अगदी विचार करून द्यायचे म्हटले तरी ते शक्य होणार नाही. जगातील सर्वच शिक्षणतज्ज्ञांनी देखील शिक्षणाच्या ज्या व्याख्या केल्या आहेत, त्या देखील समान नाहीत. व्याख्या समान नाहीत, हे खरे असले तरी शिक्षणातून हव्या असलेल्या गोष्टी समान आहेत. शिक्षणाची प्रक्रिया देखील समान हवी आहे. एकूणच आपल्याला माणूस घडवायचा आहे हे अंतिम उद्दिष्ट आहे. एखादा व्यक्ती जेव्हा म्हणतो की, माझे शिक्षण झाले आहे, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय समजला जातो? त्या प्रश्नांच्या अनुषंगाने कोणालाही प्रश्न विचारला, तर कोणी विद्यापीठाने दिलेला पदवीचा कागद दाखवतो. कोणीतरी मार्कशीट दाखवतो. शिक्षण झाले त्याचा हा पुरावा असतो. ते पाहिले की, त्यांचे शिक्षण झाले असे मानले जाते; पण हे कागद म्हणजे खरेच शिक्षण झाले असे म्हणता येईल का? पण फार झाले तर तो माणूस विद्यापीठाने दिलेल्या पदवीने फक्त साक्षर झाला आहे असे म्हणता येईल. त्या कागदाच्या पुराव्याने हा माणूस खरेच सुशिक्षित झाला आहे असे म्हणता येणार नाही.
वर्तमानात शिक्षित माणसे आणि अशिक्षित माणूस यातही फारसा फरक पडलेला दिसत नाही. वर्तमानात शिक्षित होणे म्हणजे केवळ माहितीने पुढे जाणे आहे. आज शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थी फक्त पुस्तकात देण्यात आलेली माहिती वाचत आहेत, ती माहिती पाठ करत आहेत. शिक्षणाचा संबंध फक्त पुस्तकातील माहितीशी जोडला गेला आहे. माहितीने संपन्न असलेला माणूस शिक्षित आहे असे म्हणता येणार नाही. फार तर पदवीधर असलेली ही व्यक्ती अक्षर साक्षर झाली आहे असे म्हणता येईल. अनेकदा वर्तमानात शिक्षण घेणे म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती वाचने, पाठ करणे, परीक्षेत आलेल्या प्रश्नांसाठी उत्तरे लिहिणे. उत्तरे लिहिणे म्हणजे केवळ माहिती ओकणे आहे.
परीक्षेत माहिती ओकल्यावर त्या लिहिलेल्या माहितीवर अंकांचा शिक्का बसणार. त्याला मार्क म्हटले जाते आहे. विविध विषयांचे ते मार्क एकत्रित लिहिलेल्या कागदाला मार्कशीट म्हटले जाणार, त्या मार्कशीटमध्ये नोंदवलेल्या मार्कांच्या जोरावर शिक्षण झाले असे म्हटले जाते. तसे म्हटले जात असले तरी दुर्दैवाने ते काही खरे शिक्षण नाही. त्यामुळे कोणाला तरी पाठ्यपुस्तकातील शब्दांनी फुललेले पाठ, कविता किंवा इतर विषयांसाठी असलेल्या पुस्तकातील माहिती शिकणे म्हणजे शिक्षण वाटते. आपण वर्तमानातील शिक्षणाच्या प्रक्रियेत फक्त शब्द शिकतो; मात्र माहितीच्या पलीकडे असलेला त्या शब्दांना असलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न शिक्षण करत नाही. त्यामुळे शिक्षण होऊनही जीवनात परिवर्तनाची वाट सापडत नाही.
अशा शिक्षणाने कोणाच्याही जीवनात परिवर्तन होत नाही, याचे कारण ज्या शिक्षणाचा संबंध माहितीशी आणि केवळ पाठांतराशी जोडला गेला आहे. त्यामुळे शिक्षणाच्या प्रक्रियेत पाठांतराने मार्क मिळतील; पण जीवनाचा उद्धार करेल असे गुण मात्र त्या पाठांतर आधारित शिक्षणातून मिळत नाही. त्यामुळे जीवन उद्धारासाठी शिक्षण असे पूर्वी म्हटले जायचे. आज मात्र तसा विचार पुढे येत नाही. याचे कारण शिक्षणात मार्क महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे शिक्षणाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रभाव टाकताना दिसत नाही. शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंध कमी उरला आणि केवळ रोजगाराशी शिक्षणाचे नाते पुरले आहे. हाताला काम देईल तेवढेच शिक्षण असा विचार वाढत चालला आहे. आपल्या जगण्याला समृद्ध करेल असा विचार फार कमी होत चालला आहे. केवळ पैसा मिळाल्याने जीवन समृद्ध होत नाही. पैशाने फार तर आर्थिक परिस्थिती सुधारेल; मात्र त्यातून जीवनाला दिशा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे शिक्षणाचा मूलभूत अर्थ शोधण्याचा प्रयत्न संत साहित्यातही आपणास अनुभवास दिसतो.
वर्तमानातील शिक्षणात आपण माहितीने युक्त शब्द शिकतो. त्याचवेळी पुस्तकात दडलेल्या त्या शब्दांचा अर्थ शिकणे घडत नाही. शब्दांना अर्थ असतो. तो अर्थ सांगण्याच्या नादात आपण पर्यायी शब्द देतो. आपण ज्या शब्दांना अर्थ म्हणतो ते केवळ पर्यायी शब्द आहेत. ते शब्द म्हणजे त्यांचा अर्थ नाही. त्या पर्यायी शब्दांनी शब्दांचा अर्थ उलगडत नाही, तर आपण दिलेले पर्यायी शब्द म्हणजे आणखी एक नवा शब्द इतकाच काय तो अर्थ. त्या प्रयत्नामध्ये शब्दाला पर्यायी शब्द दिला जातो, तसे केल्याने शब्दांनाही अर्थ प्राप्त होत नाही. मुळात कोणत्याही शब्दांचा अर्थ त्या शब्दांमध्ये अथवा माहितीत दडलेला नसतो. शब्द म्हणजे अक्षरांची जुळवाजुळव आहे. मुळात शब्दांचा अर्थ शब्दकोशात शोधायचा नसतो आणि शोधण्याचा प्रयत्न केला, तर तो तेथे सापडत देखील नाही. त्यामुळे शब्दांचा अर्थ प्रत्यक्षात जीवन व्यवहारात शोधायचा असतो.
आपण जेव्हा जीवनात विविध व्यवहार करतो, तेव्हा प्रत्यक्षातील जीवन व्यवहारातच शब्दांचे अर्थ शिकत असतो. जीवनात संघर्ष असला तरी, तो संघर्षदेखील आपल्याला बरेच काही शिकवणारा असतो. आपण जेव्हा एखाद्या संकटावेळी संघर्ष करतो, तेव्हा त्या संघर्ष या शब्दाचा नेमका अर्थ सापडलेला असतो. आपण जर संघर्ष न करता केवळ संघर्षाला पर्यायी शब्द दिला, तर त्यातून फार काही शिकणे घडण्याची शक्यता नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ जीवनाच्या रणांगणावर शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. जीवनाच्या प्रत्येक दृष्टीने आपण त्याकडे जसे पाहतो आणि त्या दृष्टीने अनुभव घेत जातो, त्याप्रमाणे त्या-त्या शब्दांचे अर्थ आपल्याला उलगडत जातात.
माहितीचे उपयोजन
जेथे शिकलेल्या माहितीचे उपयोजन प्रत्यक्ष जीवन व्यवहारात करता येत नाही. किंबहुना केले जात नाही, तेथे आपल्याला शिक्षणात दडलेल्या शब्दांचे अर्थ सापडण्याची शक्यता नाही. आपणाला खरोखर शिक्षणाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असेल, शिकलेल्या शब्दांना, माहितीला अर्थ प्राप्त करण्यासाठी ज्ञानाची वाट चालावी लागेल. ज्ञान निर्मितीची प्रक्रिया म्हणजे अर्थापर्यंत पोहचणे आहे. जेव्हा अर्थ न शिकता केवळ माहितीचे पाठांतर करणे घडते, तेथे शिक्षण कुचकामी आहे. शिक्षणाचा अर्थ म्हणजे शब्दांचा फुलोरा नाही. +शब्दांचे, माहितीचे पाठांतर म्हणजे शिक्षण नाही, तर त्या शब्दात दडलेला अर्थ शोधणे आणि त्या वाटेने जगणे म्हणजे शिक्षण. संत तुकोबाराय म्हणाले होते की,अर्थेविना पाठांतर कासया करावे / व्यर्थची मरावे घोकोनिया.
आज आपल्या शिक्षणाचा विचार केला, तर शिक्षणातून खरेच अर्थ उमजून घेण्याची प्रक्रिया घडते का? याचा शोध घेण्याची गरज आहे. शिक्षणाचा विचार केला जातो तेव्हा अर्थाशिवाय असणारे शिक्षण कोणत्याही परिस्थिती ना व्यक्तीचे, ना समाजाचे वा ना राष्ट्राचा उद्धार करू शकणार नाही. समर्थ रामदास दासबोधात म्हणतात की, पाठ म्हणतां आवरेना / पुसतां कांहीच कळेना/
अनुभव पाहाता अनुमाना/मधें पडें
समाजात एखाद्या व्यक्तीचे पाठांतर इतके असते की, तो त्याने पाठ केलेले काही म्हणू लागला की, तो कोणालाही आवरतच नाही; मात्र त्याने जे काही पाठ केले आहे, त्याचा अर्थ त्याला विचारला तर त्याला सांगता येत नाही. कारण त्याने केवळ पाठ केलेले आहे. पाठांतर केल्यामुळे त्या व्यक्तीचे कदाचित कौतुक होईलही; पण त्यांचे पाठांतर म्हणजे काय तर शब्दांचे बुडबुडे असतात. अशा पाठांतराने त्याचे शिक्षण झाले आहे असे नाही किंवा त्यामुळे त्याच्या जीवनावर फारसा परिणाम साधला जात नाही. किंबहुना फार काही हाती लागत नाही. त्या माणसाला देखील आपण या शब्दांचे पाठांतर करून काय मिळवले असे विचारले, तर त्याच्याकडे देखील त्याचे उत्तर नसते. नदीला पूर आल्यास, अथवा समुद्रातून आपल्याला ऐलतीरावरून पैलतीरावर जायचे असेल, तर ती कागदाची होडी कोणत्याच कामाला कोणालाही कामी येत नाही. त्याप्रमाणे शब्दांचे पाठांतर केले, तर आपल्याला जगण्याला शक्ती मिळत नाही. त्याचबरोबर त्या माहितीने जीवनात आनंद, समृद्धता, सुख, समाधान निर्माण होत नाही. त्या माहितीने कोणाचेही भले होत नाही. त्यामुळे समर्थ देखील अशा स्वरूपाच्या माहितीला कुचकामी असेच म्हणत आहेत. जेव्हा पाठांतर असते, तेव्हा त्या व्यक्तीला कोणताच अनुभव असत नाही. अनुभवाशिवाय तो केवळ अनुमाने करत असतो. अशा अनुमानाचे काय करायचे. कारण ती अनुमाने म्हणजे केवळ तर्क आहे. सुतावरून स्वर्ग गाठणे आहे. त्यामुळे त्या स्वर्गाची वाट म्हणजे केवळ शब्दांचे फुलोरे आहेत. मुळात जशी साखर आणि गोड हे शब्द आपण उच्चारले, तर त्या शब्दांच्या संदर्भाने चवीचा कोणताच अनुभव घेता येत नाही. आपण गोड हा अनुभव घेतला, तरच आपल्याला त्या शब्दाचा अर्थ उलगडून सांगता येईल.
कृतियुक्त शिक्षण
अलीकडच्या काळात शिक्षणात ज्ञानरचनावादाचा मोठा बोलबाला आहे. कृतियुक्त शिक्षणाचा विचार अधिक प्रभावीपणाने केला जात आहे. वर्तमानात कृतियुक्त शिक्षण हाच उत्तम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा योग्य पर्याय आहे असे जग सांगत आहे. कृतियुक्त शिक्षणाचा मार्ग अवलंबणारे देश आज प्रगतीच्या स्थानावर आहेत. कृतियुक्त शिक्षणाचा अर्थ आहे अनुभवाचे शिक्षण. समर्थांनी त्या काळात अनुभवाचे मोल विषद केले आहे. एखाद्या गोष्टींचा अनुभव जेव्हा घेतला जातो, तेव्हा त्या अनुभवाच्या माध्यमातून आपण बरेच शिकत असतो. त्याचबरोबर अनुभवाने शिकणे होत असताना त्यातून ज्ञानाची प्रक्रिया घडत असते. त्यावेळी होणार्या निरीक्षणातून बरेच काही शिकणे होते. त्याचबरोबर विचाराची प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होत असते. असे शिकणे जेव्हा घडते तेव्हा शब्दांचे अर्थ आपोआप उलगडत जातात.
अनुभवाची वाट चालणारे शिक्षण असेल, तर पाठांतर करण्याची गरज पडत नाही. अनुभवाने मिळणारे शिक्षण हे नेहमीच आनंददायी असते. पाठांतराच्या दिशेने जाणारे शिक्षण नेहमीच तणाव निर्माण करणारे असते. अशा शिक्षणामुळे विद्यार्थी आनंदापासून दुरावतात. खरेतर शिक्षण ही आनंदाची अनुभूती असते. त्या आनंदाच्या वाटा चालायच्या असतील, तर शिक्षण पाठांतर मुक्त असायला हवे, असे शिक्षणतज्ज्ञ सांगू लागले आहेत. आता तरी आपण त्या दिशेचा विचार काहीसा करू लागलो आहोत; मात्र तो विचार अद्यापही शंभर टक्के शिक्षणात रूजलेला नाही, हेही लक्षात घेण्याची गरज आहे.
आपल्याकडे शंभर वर्षांपूर्वी नामदार गोखले यांनी मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराची मागणी केली होती, तो कायदा २०१० ला केंद्र सरकारने मंजूर केला. त्या कायद्याच्या कलम २९ मध्ये देखील त्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाची तरतूद केली आहे. कायद्याने देखील पाठांतरावर बंदी आणली आहे. पाठांतर हा शिक्षणाच्या प्रक्रियेतील सर्वांत मोठा अडथळा आहे. समर्थांनी तेव्हाही पाठांतर नकोच अशीच भूमिका घेतली होती. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे आता वर्तमानात जगभरात समर्थन होऊ लागले आहे. त्यामुळे शिक्षण हाच विचार अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. कायद्याने घेतलेली भूमिका अधिक समजावून घेण्याची गरज आहे. आता जो विचार कायद्यात अथवा शिक्षणतज्ज्ञांच्या मुखी येतो आहे, तो विचार समर्थांनी आपल्या दासबोधात कितीतरी वर्ष अगोदर सांगितला आहे. त्यामुळे संतांच्या ग्रंथांमध्ये दडलेला विचार आपण समजावून घेत शिक्षणाची प्रक्रिया पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. पाठांतर मुक्त शिक्षणाचा विचार करणे आणि अनुभवाच्या शिक्षणाची वाट चालणे म्हणजे उद्याचे भविष्य अधिक उज्ज्वल करणे आहे.
Related
Articles
राहुल यांना बोलू द्यावे; शशी थरुर यांची मागणी
09 Feb 2026
आधार किंवा अपार आयडीशिवाय आता एमएचटी सीईटी अर्ज भरता येणार
14 Feb 2026
सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणाला मान्यता
11 Feb 2026
गोदावरी किनार्यावर कासवे मृतावस्थेत
14 Feb 2026
शिरुर तालुक्यात वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर
09 Feb 2026
बहिष्कारावरून आयसीसी आणि पीसीबीमध्ये चर्चा
09 Feb 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सोने-चांदी घसरणार?
2
प्रशासन पोखरणारे ‘उंदीर’
3
स्थिती ‘जैसे थे’राखण्याचा प्रयत्न
4
डिजिटल युगातील घातक आव्हान
5
नाते जन्माचे
6
‘आयपीओ’चे मृगजळ