अवलिया ग्रंथसंग्राहक!   

चर्चेतील चेहरे : राहुल गोखले 

एखादी व्यक्ती कसला ध्यास घेईल आणि त्यात स्वतःस झोकून देईल हे सांगता येत नाही. कर्नाटकातील एम अंके गौडा हे असेच एक अवलिया व्यक्तिमत्व. पद्म सन्मानांच्या यादीतील अंके गौडा यांच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याचे कारण त्यांच्या लक्षवेधी कार्याची माहिती यापूर्वी प्रकाशात आली असली तरी त्यांच्या झपाटलेपणाची महती एका मर्यादित वर्तुळापुरती ठाऊक होती. त्यांना पद्मश्री सन्मान जाहीर झाल्याने त्यांच्या नावाची देशभर चर्चा होत आहे. अंके गौडा यांची कहाणी विलक्षण आहे. आता वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केलेले अंके गौडा यांनी आपल्या वैयक्तिक ग्रंथालयात वीस लाखांहून अधिक पुस्तके-ग्रंथ जमवले आहेत; पण त्यांची दानत अशी की हे शब्दवैभव त्यांनी सर्वांसाठी खुले ठेवलेले आहे. मुक्त प्रवेश ग्रंथालय असे त्याचे स्वरूप आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कामालाच पद्म सन्मानाच्या रूपाने पावती मिळाली आहे असे म्हटले पाहिजे.
 
एवढा प्रचंड ग्रंथसंग्रह अंके गौडा यांनी केला आहे हे अचंबित करणारे आहेच; पण त्यामुळे कोणाचा असा गैरसमज होऊ शकतो की ते अतिशय श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यामुळे पुस्तकांवर एवढा खर्च करणे त्यांना शक्य आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. मुबलक पैसा हे अंके गौडा यांचे भांडवल नाही; तर ध्यास व जिद्द हे त्यांचे खरे भांडवल आहे. कर्नाटकाच्या मांड्या जिह्यलतील हरळहल्ली गावात जन्मलेले अंके गौडा यांना पुस्तकांचे महत्व उमगण्यास काही घटना कारणीभूत ठरल्या. वास्तविक अंके गौडा हे शेतकरी कुटुंबातील. मात्र जमिनीबरोबरच स्वतःच्याच नव्हे तर समाजातील सर्वांच्याच मेंदूची मशागत करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्याला कारणीभूत ठरला तो त्यांचा स्वतःचा अनुभव. 
 
लहानपणी त्यांना सहज पुस्तके उपलब्ध होत नसत आणि तरुणपणी ते पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांना तोच अनुभव आला. तेंव्हा आपल्यासारखाच अनुभव इतरांना येऊ नये या विचारातून त्यांनी पुस्तकांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. पन्नास वर्षांपूर्वी पुस्तके २५ पैशांना-तत्कालीनचार आण्यात-देखील मिळत असत. स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रात्मक पुस्तकांपासून गौडा यांनी पुस्तके विकत घेण्यास सुरुवात केली. हे सगळे खर्चिक होते; अंके गौडा यांची आर्थिक स्थितीही हा छंद जोपासण्यास पोषक नव्हती; पण पुस्तके सहज उपलब्ध होत नाहीत हा स्वानुभव जसा त्यांच्या या छंदास चालना देणारा ठरला; तद्वत के अनंतरामु या एका प्राध्यापकांचे ’आयुष्यात चांगला छंद जोपासा’ हे शब्दही प्रेरक ठरले. त्यातूनच अंके गौडा यांचा हा छंद साकार झाला आणि आता त्याचे ’पुस्तकविश्व’ झाले आहे. 
 
सुरुवातीस अंके गौडा हे बस वाहक म्हणजे ’कंडक्टर’ होते. नंतर कन्नड साहित्यातील पदवीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी ती नोकरी सोडली व एका साखर कारखान्यात ते नोकरीस लागले. चरितार्थासाठी ते नोकरी करीत असले तरी पगारापैकी मोठा हिस्सा ते पुस्तक खरेदीवरच खर्च करीत असत. लहान लहान पुस्तके ते विकत घेऊ लागले आणि आपल्या घरात त्याचा संग्रह करू लागले. म्हणता म्हणता ती संख्या वाढत गेली. खरेदी केलेली पुस्तके एखाद्या पोत्यात भरायची आणि ते पोते डोक्यावर वागवत घरी आणायचे हे अंके गौडा यांच्या बाबतीतील नेहेमीचेच चित्र झाले. जेव्हा अंके गौडा यांचे कार्यालयीन सहकारी जमिनीत पैसे गुंतवत होते किंवा स्वतःसाठी वाहन खरेदीवर पैसा खर्च करीत होते तेंव्हा अंके गौडा मात्र पुस्तके खरेदी करण्यासाठी पदरमोड करीत होते. साहजिकच आपल्या गरजा कमीतकमी ठेवणे त्यांना क्रमप्राप्त होते. त्यांच्या या काटकसरीला त्यांच्या पत्नीचे व पुत्राचे सहकार्य लाभले हेही उल्लेखनीय. अंके गौडा यांचे घर हळूहळू पुस्तकांनी भरू लागले आणि त्यास ‘पुस्तका माने’ म्हणजे पुस्तकांचे घर असे म्हटले जाऊ लागले. या संग्रहात अनेक दुर्मिळ पुस्तकेही जमा होऊ लागली. काहीदा फाटलेली, जीर्ण झालेली पुस्तके गौडा यांना मोफत मिळत असत तीही या संग्रहात जमा झाली; तर काहीदा लोकांच्या देणगीतून अंके गौडा पुस्तके विकत घेत असत. हा सिलसिला गेली पन्नास वर्षे कायम राहिला आहे आणि आता त्यांच्या संग्रहात असणार्‍या पुस्तकांची संख्या वीस लाखांपर्यंत पोचली आहे असे म्हणतात. घरात ही एवढी ग्रंथसंपदा मावणे शक्य नाही. पण अंके गौडा यांनी पुस्तकांना उघडे पडू दिले नाही. ते व त्यांचे कुटुंबीय जमिनीवर झोपत असत; पण पुस्तकांना मात्र अतिशय मनाची वागणूक ते देत असत. हे सर्व थक्क करणारे आहेच; पण घरची स्थिती सामान्य असूनही हा आगळावेगळा छंद इतक्या निष्ठेने जोपासणे हे जास्त वाखाणण्याजोगे आहे यात शंका नाही.
 
अंके गौडा यांच्या संग्रहात असणार्‍या पुस्तकांचे प्रकार पाहिले तरी कोणीही स्तिमित होईल. कन्नड, हिंदी, इंग्रजी, तामिळ यांसह अनेक भाषांतील पुस्तके त्यात आहेतच; पण चीनमधून आलेली शेकडो पुस्तके देखील संग्रहात आहेत. परकीय भाषांतील काही पुस्तके आहेत. या संग्रहात पाच हजार शब्दकोश आहेत; ३५ हजार आंतरराष्ट्रीय मासिके आहेत. महात्मा गांधी या विषयाला वाहिलेली अडीच हजार पुस्तके अंके गौडा यांच्या संग्रहात आहेत. भगवद्गीता, महाभारत, जैन धर्म. बौद्ध धर्म अशांना वाहिलेले शेकडो धार्मिक ग्रंथ त्यांच्या संग्रहात आहेत. अगदी बायबलविषयक पुस्तकेही त्यात आहेत. अंके गौडा यांनी ग्रंथसंग्रह करताना कोणताही पंक्तिप्रपंच केलेला नाही हे विशेष. याचे कारण अभ्यासकांना कोणता ग्रंथ वा कोणते पुस्तक कधी लागेल हे सांगता येत नसते. शिवाय हा सगळा ग्रंथ संग्रह हा वाचकांसाठीच आहे हीच अंके गौडा यांची प्रथमपासून धारणा असल्याने त्यांनी जेथून मिळेल तेथून व जी मिळतील ती पुस्तके-ग्रंथ जमा केले आहेत. त्यांची ती भूक हेवा वाटावी अशी आहे व ती न संपणारी आहे.
 
त्यासाठी त्यांनी म्हैसूर येथे खरेदी केलेली जमीन सहा लाख रुपयांत विकून टाकली; तर आपल्या निवृत्तिवेतनातून मिळणारी ऐंशी टक्के रक्कम ते पुस्तक खरेदीसाठी वापरतात. शिवाय या ग्रंथ संग्रहालयात सर्वांना मुक्त प्रवेश आहे. त्यासाठी ना प्रवेश शुल्क आहे; ना अनामत रक्कम आहे. एका अर्थाने अंके गौडा यांनी ज्ञानाची ही पाणपोई सुरु केली आहे आणि महिनाकाठी सुमारे हजार नव्या पुस्तकांची भर ते त्यात घालत असतात. हा व्याप इतका वाढला की अंके गौडा यांना केवळ ग्रंथ व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणून जागेची गरज भासू लागली. त्यांची ही अडचण उद्योजक हरी खोडे यांनी ओळखली व सुमारे ८० लाख रुपये खर्च करून एक वास्तू अंके गौडा यांना बांधून दिली. अंके गौडा  यांचा ग्रंथ संग्रह आता तेथे जास्त नीटनेटक्या स्वरूपात आहे. त्या संग्रहास आजवर अगदी न्यायाधीशांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी भेट दिली आहे; याचे कारण संदर्भग्रंथ तेथे सहज मिळतात; अनेकदा दुर्मिळ ग्रंथ देखील वाचायला मिळतात. कर्नाटकात सदानंद गौडा यांच्या नेतृत्वात सरकार असताना अंके गौडा यांना २५ लाखांचा निधी देण्यात आला होता. अनेक राजकारणी अंके गौडा यांच्या ग्रंथ संग्रहास भेट देत असतात. हा सगळा अवाढव्य ग्रंथ संग्रह जतन करायचा हे वाटते तितके सोपे काम नाही. पण अंके गौडा ते निगुतीने करतात. ‘अंके गौडा ज्ञान प्रतिष्ठान’ नावाची स्वयंसेवी संस्थाही त्यासाठी त्यांनी स्थापन केली आहे. या संस्थेतर्फे आता अंके गौडा केवळ ग्रंथ खरेदी करत नाहीत; तर दुर्मिळ झालेल्या ग्रंथांचे डिजिटायझेशन देखील करण्यात येते जेणेकरून ग्रंथ कोणत्याही  माध्यमातून उपलब्ध राहावेत.
 
अंके गौडा आपल्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील ग्रंथ संग्रहात व्यग्र असतात. जगभरात असा वैयक्तिक ग्रंथसंग्रह इतक्या मोठ्या प्रमाणावर असणारे अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच असतील. गिनीज जागतिक विक्रमाच्या यादीत या बाबतीत अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील जॉन बेनहॅम यांचा अव्वल क्रमांक लागतो; मात्र त्यांच्या वैयक्तिक संग्रहात असणार्‍या पुस्तकांची संख्या पंधरा लाख आहे असे सांगण्यात येते. तेंव्हा अंके गौडा यांच्या नावावर तो विक्रम आता जमा होण्यास हरकत नाही. अर्थात त्यासाठी गिनीजच्या नियमांची पूर्तता व्हायला हवी; अंके गौडा यांच्या संग्रहातील पुस्तकांची नेटकी मोजदाद व्हायला हवी; कोणत्या पुस्तकांच्या प्रती एकापेक्षा अधिक नाहीत ना याची खातरजमा व्हायला हवी. अंके गौडा यांच्या या ग्रंथ संग्रहाची नोंद जागतिक पातळीवर घेतली जावी म्हणून कर्नाटक सरकारनेही पुढाकार घ्यायला हवा. हे एकट्या अंके गौडा यांच्या आवाक्यातील काम नाही.
 
बस वाहक किंवा साखर कारखान्यत कर्मचारी म्हणून काम केलेल्या एखाद्या व्यक्तीकडून इतके अद्भुत काम होऊ शकेल अशी सामान्यतः कोणी कल्पनाही करणार नाही. पण तशी कामगिरी करून अंके गौडा यांनी आपण सामान्यांतील असामान्य आहोत हे कृतीतून सिद्ध केले आहे. शिवाय ती कृती अबोल आहे. ना त्याचा गाजावाजा त्यांनी केला; ना कोणाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा केली. अंके गौडा यांना यापूर्वी राज्योत्सव पारितोषिकाने गौरविण्यात आले होतेच; अन्यही काही पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. पद्मश्री सन्मानाने अंके गौडा यांच्या या प्रेरक कामगिरीवर एका अर्थाने राष्ट्रीय कौतुकाची मोहोर उमटली आहे तसेच एका अर्थाने त्यांचा हा जीवनगौरवच झाला आहे असेच म्हटले पाहिजे. अर्थात अंके गौडा हे काम गेले अर्ध शतक निरपेक्षपणे करीत आले आहेत. ‘ज्याच्याकडे पुस्तकांचा संग्रह आणि बाग आहे त्याला अन्य काहीही नको असते’ असे रोमन मुत्सद्दी सिसेरोचे वचन आहे. एम अंके गौडा यांना ते चपखल लागू पडते.
 

Related Articles