E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
बोलींचा बोलु कौतुके
Samruddhi Dhayagude
01 Feb 2026
येते मनात काही : प्रतिभा कणेकर
बऱ्याच दिवसांनी नेहा घरी आली. म्हटलं, कशी आहेस? कॉलेज काय म्हणतंय? तर म्हणाली, बाई, थिसिसच्या गडबडीत होते बरीच. आनंदाची बातमी द्यायला आलेय. मला डॉक्टरेट मिळाली.
अरे वा! अभिनंदन! काय विषय होता तुझा?
कुपारी बोलीचा चिकित्सक अभ्यास. वसईच्या उत्तरेकडच्या बारा गावांत बोलली जाते बाई ती. कादोडीसुद्धा म्हणतात तिला. मूळची सामवेदी समाजाची. पोर्तुगीज आले, त्या समाजात धर्मांतरे झाली, सांस्कृतिक सरमिसळ झाली, आता सामवेदी ख्रिस्ती म्हणून ओळखतात तिला. नेहा भरभरून बोलू लागली.
अलीकडे अभ्यासकांचे मराठीच्या बोलींकडे लक्ष जायला लागले आहे अन आपापल्या बोलींविषयीच्या बोलकांच्या अस्मिता जाग्या व्हायला लागल्या आहेत. विवेकचा स्वत:च्या आगरी बोलीचा अभ्यास चालूच असतो पण पीएच. डी. साठी तो मांगेली बोलीचा अभ्यास करतोय, सविताची बोली मल्हार कोळी. ती वारली लोककथांचा अभ्यास करत आहे. दर्शनाने वाडवळी बोलींतील साहित्याचा अभ्यास केला. तो करत असताना तिला त्याच परिसरातल्या ‘फुदगी’ नावाच्या बोलीचा शोध लागला. प्रसादने ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोर्या’ अन ‘इत्तर गोष्टी’ उदगिरी बोलीत लिहिल्या. कुणीतरी त्याला विचारले, तू त्या बोलीत का लिहितोस? तो उत्तरला, ‘मी नाही लिहिलं तर कोण लिहिणार?’ हे ऐकायला मला खूप आवडतंय.
माझे माहेर मालेगावचे. तिथे अहिराणीच्या प्रभावाने आम्हा भावंडांच्या बोलण्यातही ‘नाई ना भो!’, ‘करून राह्यलेय ना.’, ‘कस काय चालू शे?’, ‘काय म्हनी राह्यनं तू?’ असे काही वाक्प्रचार येत. बोलण्यात त्या बोलीचे हेल येत. कोल्हापूरला आजोळी गेलो की मामा त्यावरुन चिडवायचा. मग आम्हीही आईला कोल्हापुरी बोलीतले दहा-पाच शब्द विचारून घेतले. मामाला म्हटले, ‘खरं, तू लई शाणपणा कर्तोयस पण तुमची भाषा तरी कशी आहे बघ, काय तर म्हणे ‘मोळा’, ‘उभारलाय’, ‘अष्ट्यात्तर’, ‘खावा-जावा’. तुमची तशी तं आमची बी अशीच असतीय भाषा’. इगतपुरीला माझे दुसरे आजोळ. तिथे करवंदं, जांभळं, बिट्टेआंबे दारावर विकायला ज्या बायका येत, त्या ठाकूर की कातकरी असत ते मला आठवत नाही पण त्यांना ‘मामी’ म्हणून हाक मारायचे, बाई म्ह्णून हाक मारली की त्या रागावतात, असे आजीने आम्हाला सांगितलेले आठवतेय. त्यांची कातकरी बोली मात्र फक्त आजीलाच कळायची.
खरंच. महाराष्ट्रातल्या विविध प्रदेशातील बोलींचे हे असंख्य झरे आहेत. आमच्या पालघरच्या कॉलेजात येणारी मुलं मराठीच्या पेपरमध्ये त्यांचे काही वेगळेच शब्द वापरायची. हळूहळू कळत गेले की, त्यांच्या घरी बोलायच्या बोली वेगळ्या आहेत. वारली, मल्हार कोळी, कोकणा, आगरी, कुणबी, भंडारी, वंजारी, पाचकळशी, चौकळशी, मच्छीमार, मांगेली, ठाकरी! मुलांना आधी उगाचच न्यूनगंड होता, आमची गावठी भाषा आहे म्हणून. मग मी त्यांनाच बरोबर घेऊन त्यांच्या बोलींचा अभ्यास सुरू केला अन मुलं खूपच आनंदली. माझ्याही लक्षात आलं की, पालघर परिसर ही विविध बोलींची सुंदर गोधडी आहे.
बोलींचे बोट धरून सुरू झालेल्या माझ्या प्रवासाने मला या बोलक समाजाच्या विश्वात कुठे कुठे भटकवून आणले म्हणून सांगू? प्रत्येक बोली बोलणार्या समाजाला त्यांचा एक इतिहास होता. त्यांचे सण-उत्सव साजरे करण्याच्या त्यांच्या रीती होत्या. पालघर तालुक्यात वास्तव्याची त्यांची विशिष्ट क्षेत्रे होती, तिथे त्यांच्या बोलींचे ‘घन’ रूप दिसत होते. दोन बोलक समाज वास्तव्याला जवळ जवळ आले की तिथे बोलींची मजेदार सरमिसळ होत होती. इंग्रजांचा काळ अनुभवलेली म्हातारी माणसे ‘इष्टाकन्या’ (स्टॉकिंग्ज), ‘शीक’ (सिक), ‘टायम’ (टाईम) असे शब्द सर्रास वापरत होती आणि आता प्रमाण मराठी अन इंग्रजीला बोलीरूपामध्ये वेगवेगळ्या तर्हेने सामावून घेऊन इथले लोक, ‘एश्टी पॅक झाली’, ‘कवरा डिस्को शर्ट घातला बग’ (डिस्को म्हणजे डोळ्यात भरणारा), ‘त्याची मम्मी ऑफ जाली’ असे सहज बोलत होते.
ते ज्या प्रदेशात राहतात, ज्या निसर्गात वावरतात तिथल्या गोष्टींना ते बोलींमध्ये शब्द देणारच ना! तुमच्या आमच्या भाषेत साप, नाग, अजगर एवढेच शब्द असतील पण डोंगर, जंगले, शेतात वावरणार्या या लोकांनी इतक्या विविध प्रकारचे साप पाहिलेत की कॉलेजच्या आवारात साप दिसला की, त्यांचे निरीक्षण सुरु व्हायचे. ‘हा तर हरनटोल दिसतोय. त्यांना माहीत होतं, आंधलवट, धनवाड, हरणटोल, दिवड, पानशीला, नांदेटं, आरं म्हणजे अजगर हे सगळे बिनविषारी साप असतात. विषारी साप आहेत कांबल्या, मनेल, फोडशा, मुंडल्या, तेल्या, सूड, पाचपावल्या, वाला, रुखय. त्या प्रत्येकाचे वर्णनही ती करत.
पक्षीही किती विविध! बुडिंग्ला, पुलशी, पोटार्या, टाशा, पुशेटी, कोकेत्री, भुंडवली, लिटमा, टेतॅक, लिकिर, तलमोर, कालघुई आणि अजून कितीतरी! मोराला ते ‘सोगार’ म्हणतात, कोकिळेला ‘कुहू कोंबडी’, भारद्वाजाला ‘कुंभार कावळा’, फुलपाखराला ‘पाकोटा’ आणि चतुराला ‘डांडोशी’. समुद्रातल्या मोजून पन्नास माशांची नावे त्यांना माहीत आहेत अन तेवढीच खाडी अन नदीतल्या माशांची. सत्तर-पंचाहत्तर वनस्पती नावासह मुलांनी मला दाखवल्या, त्यांच्या आया-आज्यांनी त्यातल्या कित्येक झाडापाल्यांचे औषधी गुणधर्म सांगितले आणि त्यातल्या कवलू, बाफली, करडू, तेरा, टेटवाच्या शेंगा, वाघोटा, सतावरी, वलीचे कंद, आलीम, लोना, खापरा, जरस या वनस्पती म्हणजे त्यांच्या भाज्या आहेत, हे तिथल्या परिसरातल्या बायकांनी सांगितले तेव्हा मी त्या भाज्या करण्याच्या पद्धती विचारून घेतल्या.
सध्या रानभाज्यांचे महोत्सव होऊ लागलेत तेव्हा एकीकडे मला वाईट वाटते, ते अशासाठी की, ज्यावर जंगलपट्टीतल्या लोकांच्या सहज उपजीविका होत होत्या त्या भाज्या आता ओरबाडल्या जाताहेत. जंगलातलं हे देणं माणसाच्या गरजेसाठी पुरेसं असतं खरं पण अधिक लोभासाठी कसं पुरणार? निसर्गाविषयी दाखवलेल्या अनास्थेतून म्हणा की ओरबाडण्याच्या मानवी प्रवृत्तीतून म्हणा, काही झाडे, फळे, भाज्या माझ्या देखत देखत दुर्मिळ होत संपल्यात देखील.
मालेगावात माझ्या लहानपणी केशरी-हिरव्या रंगाच्या मिक्स अशा ‘आमुन्या-कामुन्या’ मिळायच्या. ज्वारीच्या दाण्यांइतक्या इवल्या इवल्या, आंबट-गोड. हल्ली किती जणांकडे मी चौकशी केली... अं हं. नव्या पिढीला हा शब्द सुद्धा माहीत नाही आता. वसईला चाळीस वर्षांपूर्वी ‘माचवेल’ किंवा ‘खारी भाजी’ मिळायची, आता ती कुठेच दिसत नाही. कुणाला विचारलं की, ‘माचवेल? आजच ऐकला हा शब्द’ असं म्हणतात. पालघरचे लोक सांगायचे, ‘आमी अलीमची, हुंबाची फलं, बोबडी, चिडवलीची फुलं, हटरुनं, कांडोलाच्या बिया, करंदाचे बोखे, भांगाची फुलं, सुरूमला असा रानमेवा मोप खायाचो. आता तो तेवरा दिसत पन नाय आन मुलाना आता ओलखू पन येत नाय त्यांच्या नावानी’
बदल अपरिहार्य असला तरी, होता होईतो तो सहज होत जावा. तुकडा पडल्यासारखा नको ना! आदिवासी, ग्रामीण समाज मुख्य प्रवाहात जरूर आले पाहिजेत. पण आपापल्या संस्कृतींचा आदर राखत ग्रामीण समाजाने शहरी संस्कृतीशी जोडून घ्यावे आणि आपल्या राजकीय-सामाजिक ध्येयधोरणांनी शहरी मानके त्यांच्यावर लादून सर्वच समाजाचे सपाटीकरण करू नये. नाहीतर त्यांची संस्कृती लोप पावत जाईल तशी त्यांची शब्दसंपत्तीही!
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
08 Feb 2026
व्हॉट्सऍप कट्टा
12 Feb 2026
एसटी प्रवासात सवलतींसाठी आता ‘स्मार्ट कार्ड’ सक्तीचे
13 Feb 2026
पशुसंवर्धन विभागाची जागा पिंपरी महापालिकेस हस्तांतरित करा
12 Feb 2026
पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे
10 Feb 2026
तेलंगणमधील नगरपालिकांचे आज निकाल
13 Feb 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सोने-चांदी घसरणार?
2
प्रशासन पोखरणारे ‘उंदीर’
3
स्थिती ‘जैसे थे’राखण्याचा प्रयत्न
4
डिजिटल युगातील घातक आव्हान
5
नाते जन्माचे
6
‘आयपीओ’चे मृगजळ