E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
’दानशूर’ शब्दाची उंची वाढविणारे मुकादम तात्या
Wrutuja pandharpure
25 Jan 2026
प्रा.जे.पी. देसाई
येत्या दि. 29 जानेवारी रोजी रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष बंडो गोपाळा कदम तथा दानशूर मुकादम तात्या यांची 125 वी जयंती. यानिमित्त त्यांच्या दातृत्व अणि कर्तृत्त्वाचा आढावा...
पाटण तालुक्यातील तळमाऊले नजिकचे गुढे ही मुकादम तात्यांची जन्मभूमी. प्रसंगाने हे कुटुंब कुसुर येथे स्थलांतरित झाले आणि पुढे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी झाली. उदरनिर्वाहासाठी बंडो गोपाळा कदम मुंबईला गेले. हातगाडी ओढली, हमाली केली, लाकूड बंदरात लाकडे वाहिली. चातुर्याने ते मुकादम झाले, खूप पैसा मिळाला, गावाकडे जमीनजुमला घेतला; पण, अमाप पैसा आणि भोवताली कामगार यामुळे ते व्यसनात बुडाले. पुढे राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या विचारातून व्यसनमुक्त झाले. मानवी जीवनातील हा एक चमत्कार! 25 मे 1945 रोजी कुसुर येथे झालेल्या प्रवचनात गाडगेबाबांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यास मदत करण्यास मुकादम तात्यांना सांगितले. मुकादमांनी मदतीचे वचन दिले आणि आयुष्यभर ते वचन पूर्ण करण्यात तात्या गढून गेले. 1945 मध्ये कुसुर येथे त्यांनी गाडगेबाबांच्या नावाने हायस्कूल सुरू केले. पुढे पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालय सुरू केले. यासाठी सुमारे आठ एकर जागा आणि शेती विषयासाठी सुमारे सहा एकर काळीभोर जमीन आणि पाण्याने भरलेली विहीर मुकादम तात्यांनी रयत शिक्षण संस्थेस दान केली. सुरूवातीला शाळेस इमारत नसल्यामुळे मुलांना बसण्यासाठी स्वतःचे बाडे दिले. इमारत बांधावी लागणार होतीच. या इमारतीच्या खर्चासाठी त्यांनी म्होत्रे येथे असलेली दहा एकर जमीन व विहीर विकली. 25 नोव्हेंबर 1947 रोजी या इमारतीची कोनशिला जयप्रकाश नारायण यांच्या हस्ते बसविली गेली. याचवेळी मुकादमांनी त्यांच्या वाड्याबाहेर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पूर्णाकृती पुतळा बसविला. मुकादम तात्यांच्या कर्मभूमीचे क्षेत्र महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून देशपातळीवर पोहचले होते.
रयत शिक्षण संस्थेच्या कराड येथील ’सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज’च्या उभारणीत मुकादम तात्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सैदापूरच्या माळावरील ’मॉडर्न इंडस्ट्रीज’ या बंद पडलेल्या कारखान्याची सुमारे 18 एकर जागा रयत शिक्षण संस्थेसाठी विकत घ्यावी, या विचारापासून तेथे महाविद्यालय उभारण्याच्या प्रक्रियेत मुकादम तात्यांच्या दातृत्वाचे योगदान ऐतिहासिक आहे. हे महाविद्यालय 1954 मध्ये सुरू झाले, यासाठी एक लाख रूपयांची पहिली देणगी तात्यांनी जाहीर केली आणि ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली. त्या काळात एक रूपया गाडीच्या चाकाएवढा मोठा वाटत होता! या कॉलेजच्या उभारणीत लोकनेते केशवराव पवार आदींंचे योगदानही महत्त्वाचे ठरले. सुरुवातीच्या काळात या महाविद्यालयाला ’गाडगेबाबांचा मठ’ असे कुत्सित भावनेने काही लोक हिणवत असत. आज हे महाविद्यालय केवळ रयत शिक्षण संस्थेतीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठीत महाविद्यालय झाले आहे. मुकादम तात्यांनी खेड्यापाड्यातील गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी कराड शहरात राहण्याच्या व्यवस्थेसाठी भाड्याने इमारत घेऊन कर्मवीर आण्णांच्या नावाने वसतिगृह सुरू केले. पुढे महाविद्यालयाच्या आवारात हे वसतिगृह साकारले गेले. तात्यांनी याच प्रांगणात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधून दिले आणि या वसतिगृहाला ’सौ. सुमतिबाई पाटील’ यांचे नाव देण्याचा आग्रह धरला. संस्थेने तो आनंदाने मान्य केला. सुमतिबाई पाटील या तात्यांच्या कोणही नात्यागोत्यातील नव्हत्या, कर्मवीर आण्णांचे मानसपुत्र बॅ. पी.जी.पाटील यांच्या त्या पत्नी. त्यांना एक बौद्धिक व सामाजिक बांधिलकीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व लाभले होते. त्या याच गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या होत्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षही होत्या.
मुकादम तात्यांनी ढेबेवाडी येथे हायस्कूल काढले. त्यास कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव दिले, पाटण तालुक्यातील कुसुरूंड येथे हायस्कूल काढून कै. बाळासाहेब देसाई यांचे नाव दिले, चाफळ येथेही हायस्कूल सुरू केले.कराड शहरात एस.टी. स्टॅन्डनजिक जो कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा आहे त्याची संकल्पना, पाठपुरावा आणि सहकार्य तात्यांचे आहे. या पुतळ्याचे अनावरण 1973 मध्ये देशाचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून आयुष्यभर रयत शिक्षण संस्थेसाठी कार्य केलेल्या मुकादम तात्यांचे अखेरचे दिवस त्यांच्या इच्छेनुसार कराड येथील गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात गेले. तेथे एका बाजूला तात्यांनी छोटासा बंगला बांधला, त्यालाही ’कर्मवीर पुण्याई’ हे नाव दिले. तात्यांचे
15 ऑगस्ट 1975 रोजी निधन झाले. तात्यांच्या इच्छेनुसार महाविद्यालयाच्या मातीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यांच्या समवेत तात्यांचा पुतळा संस्थेने उभारला आहे. तात्यांचे दातृत्व आणि कार्य लक्षात घेऊन कर्मवीर आण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी 1948 ते 51 या काळात तात्यांना विराजमान केले होते. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारत देशातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था असलेल्या तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि देशाच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील महान व्यक्तींनी भेटी घेऊन गुणगौरव व कौतुक केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फक्त इयत्ता 4 थी पर्यंतचे शिक्षण झालेली व्यक्ती विराजमान होते, हा त्या व्यक्तीच्या सामाजिक कार्याचा बहुमान ठरतो!
Related
Articles
ट्रेडिंगच्या आमिषातून 1 कोटी 94 लाखांची फसवणूक
08 Feb 2026
लातूरमध्ये महायुतीची सत्ता कायम
10 Feb 2026
चिखलीत 107 वर्षांच्या आजींनीही केले मतदान
08 Feb 2026
माजी लष्करप्रमुख बाजवा यांना सैनिकांकडून मारहाण?
14 Feb 2026
शरद पवारांना खोकल्याचा त्रास, बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल
09 Feb 2026
मंगेशकर रूग्णालयाच्या विश्वस्तांविरूध्द फौजदारी कारवाईला स्थगिती
09 Feb 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सोने-चांदी घसरणार?
2
प्रशासन पोखरणारे ‘उंदीर’
3
स्थिती ‘जैसे थे’राखण्याचा प्रयत्न
4
डिजिटल युगातील घातक आव्हान
5
नाते जन्माचे
6
‘आयपीओ’चे मृगजळ