इराणमधील आंदोलन चिरडण्यास सुरुवात   

खामेनी यांच्या इशार्‍यानंतर कारवाई

तेहरान : इराणमधील सरकारच्या विरोधातील आंदोलन चिरडून टाकण्यात येईल, असा इशारा सर्वोच्च धामिंक नेते आयात उल्‍ला अली खामेनी यांनी शनिवारी दिल्यानंतर प्रशासनाने आंदोलन चिरडून टाकण्यास  सुरुवत केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी रस्त्यावर उतरु नका, असे आवाहन खामेनी यांनी आंदोलकांना केले होते.
 
इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून खामेनी आणि सरकारविरोधात तीव्र आंदोलने सुरू आहेत. ते थांबण्याची चिन्हे नसल्याने आता कठोरपणे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्याबाबतचा इशारा खामेनी यांनी प्रशासनाला दिला होता. अगोदर इंटरनेट आणि दूरसंचार सेवा खंडित केली आहे. आता आंदोलन पूर्णपणे चिरडून टाकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे.   तेहरान येथील खामेनी यांच्या घरासमोर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आले होते.       
 
त्या वेळी खामेनी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. इराणी नागरिकांच्या रक्‍ताने खामेनी सरकारचे हात माखले आहेत, असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. आंदोलकांना ठार केल्यास इराणविरोधात कारवाईस सज्ज आहे, असा इशाराही दिला होता. त्याचा समाचार खामेनी यांनी घेतला आहे. ट्रम्प यांच्यासाठी रस्त्यावर उतरु नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. अमेरिकेने इराणमध्ये लुडबूड करु नये, ट्रम्प यांनी त्यांच्या देशाचा कारभार पाहावा, अशी टीका खामेनी केली. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी अमेरिकेचा मृत्यू अशा घोषणा दिल्या. दरम्यान, सरकार समर्थक माध्यमांनी तर आदोलकांचे वर्णन दहशतवादी असे केले आहे. इराणच्या न्याय व्यवस्थेचे प्रमुख घोलमहोसेन मोहसेनी-एजेई यांंनी सांगितले की, आंदोलकांना कठोर शिक्षा दिली जाईल. तेव्हा कायदा वगैरे काही पाहिले जाणार नाही. 
 
जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्सकडून आंदोलकांवरील हल्ल्याचा निषेध
 
जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि  फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी निदर्शकांवरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध करणारे एक संयुक्‍त निवेदन प्रकाशित केले. नागरिकांना भयमुक्‍त वातावरणात आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तशी परवानगी सरकारने दिली पाहिजे, असे आवाहन केले. इराणचे  शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते शिरीन एबाडी यांनी सांगितले की, पाश्‍चिमात्य देशांनी इराण सरकारच्या कट्टरपंथी विचारसरणीचा सामूहिक निषेध करावा. कारण सरकार अत्यंत क्रूरपणे आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न करत आहे. शांततेत आंदोलन करणार्‍यांना गोळ्या झाडून ठार मारले जात आहे. हा प्रकार कोणत्या नैतिकतेत बसतो ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.  
 
आंदोलक देवाचे शत्रू असल्याने मृत्यूदंड देणार महाअधिवक्त्यांचा इशारा
 
जे कोणी आंदोलनात भाग घेतील त्यांना  देवाचे शत्रू मानले जणार अहे. त्यांना मृत्युदंडच दिला जाईल, असा इशारा इराणचे महाअधिवक्‍ता महमद मोवाहेदी आझाद यांनी काल दिला आहे. दूरचित्रवाणीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. दोन आठवडे अंदोलन सुरूच राहिले आहे. त्यामुळे ते मोडून काढण्याात येणार असल्याचे ते म्हणाले.
 
अमेरिकेचा कारवाईचा इशारा
 
अमेरिकेने व्हेनेझुएलावर कारवाई केल्यानंतर कोणत्या देशांवर ते कारवाई करणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेकांच्या मते ते इराणवर कारवाईचा बेत आखत आहेत. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्‍ले करण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराण मोठ्या संकटात आहे. खामेनी यांच्या सरकारविरोधात केवळ एका शहरात आंदोलन होत नसून ते 100 पेक्षा अधिक शहरांत सुरू आहे. खामेनी सरकारने अांदोलकांवर गोळ्या झाडण्यास सुरु केली असेल तर आम्हीही तुमच्यावर गोळ्या झाडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

Related Articles