तरुणांनी प्रत्येक क्षेत्रांत देश बलाढ्य बनवावा : डोवाल   

नवी दिल्‍ली : देशाचा इतिहास आक्रमण, हल्ल्यांनी भरला आहे. देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या म्हणजे सर्व काही झाले असे समजू नका, आर्थिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांत देशाला बलाढ्य बनविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्‍लागार अजित डोवाल यांनी केले.  
 
विकसित भारत यंग लिडर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग यांच्यासरख्या स्वातंत्र्य सैनिकांनी मोठे योगदान दिले. मोठा त्याग केला. त्यामुळे देशाचे स्वातंत्र्य मिळाले. माझा जन्म पारतंत्र्यात झाला. पण, स्वतंत्र भारतात जन्माला आल्याचे भाग्य तरुण पिढीला लाभले आहे. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्रासाठी लढा दिला होता. अनेक खटले आणि लवादांना त्यांना सामोरे जावे लागले होते. भगतसिग आणि सुभाषचंद्र बोस  यांच्यासह अनेकांनी देशासाठी हौतात्म पत्करले. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. 
 
इतिहासात देशावर अनेकदा आक्रमणे झाली. तेव्हाच्या पिढ्यांनी  मोठ्या त्याग केला होता. त्या ऐतिहासिक घटनांचा सूड घ्या, याचा अर्थ शब्दश: नसून देश म्हणून मोठी ताकद उभारा, असा आहे, असे सांगताना ते म्हणाले, सीमा सुरक्षित झाली म्हणजे आपण महान होत नसतो. आर्थिक, सामाजिक विकासासह सर्व क्षेत्रांत बलाढ्य होण्याची गरज आहे. तरुण पिढी देशाचे भावी नेतृत्व आहे. नेपोलियन प्रमाणे कणखर नेतृत्वाची गरज व्यक्‍त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला तसे नेतृत्व लाभले आहे. नेपोलियन एकदा म्हणाला होता की, ’मेंढीच्या नेतृत्वाखालील एक हजार सिंहांना मी घाबरत नाही; पण सिंहाच्या नेतृत्वाखालील एक हजार मेंढ्यांना मी घाबरतो’. त्यामुळे नेतृत्व किती महत्त्वाचे आहे हेच यातून दिसून येते. समाज प्रगतीपथावर आहे. आपण आपल्या नागरिकांवर हल्‍ले कधीच करत नाही. पण, सुरक्षेचा विचार येतो तेव्हा सर्वजण जागृत होत नाही इतिहासापासून आपण शिकणार केव्हा? असा प्रश्‍न त्यांनी विचारला. तरुणांनी इतिहासापासून बोध घेतला नाही तर  देश संकटात सापडेल, असा इशारा त्यांनी दिला.

Related Articles