पुण्यात शिवेसेनेला हलक्यात घेऊ नका : शिंदे   

पुणे : पुण्यात शिवसेना एकटी लढत आहे. पण, शिवेसेनेला कोणी हलक्यात घेऊ नये. विजय आमचाच होईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी कात्रज येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.यावेळी शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे, उद्योग मंत्री उदय सामंत, तानाजी सावंत, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
 
या सभेत शिवसेना पक्षाच्या ‘शब्द शिवसेनेचा’ या वचन नाम्याचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले.शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचेे वाघ डरपोक राजकारणाला घाबरत नाहीत. आमची शिवसेना कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडणारी नाही. पुणे महानगरपालिका अमृत महोत्सव साजरा करत असून शहराला विकासाचे अमृत द्यायचे आहे. शहरातील विकासाच्या उणिवा शिवसेनाच भरून काढेल. गावी जात असताना चांदणी चौकात आल्यावर नागरिकांनी वाहतुकीच्या समस्या मांडल्या, तो प्रश्न मी कायमस्वरूपी सोडवला! आमचा आराखडा सर्वसामान्यांचा विकास आहे. पुणे शहर वाहतूककोंडी मुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढू. जे-जे नगर विकास आणि गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारीत आहे, अशा सर्व गोष्टी तातडीने मार्गी लावू. 
 
आचारसंहिता जाहीर होण्याआधी प्रभाग ३८ साठी दहा कोटी, जांभुळवाडी तलाव सुशोभीकरणासाठी ५८ कोटी तसेच त्या भागातील गावांसाठी १५९ कोटींची ड्रेनेज लाईन मंजूर केली आहे, सत्तेत येण्याआधीच २५२ कोटी निधी जर आपल्याला मिळत असेल तर सत्तेत आल्यावर किती पैसे मिळतील, असे त्यांनी सांगितले. विरोधकांना कात्रजचा घाट दाखवणार, असे सामंत म्हणाले.वाहतूक, पाणी, महिला सुरक्षा आणि सामाजिक योजनांना शिवसेनेचे प्राधान्य आहे, असे डॉ. नीलम गोर्‍हे यांनी नमूद केले.
 
लाडक्या बहिणींची संख्या विधानसभेपासून वाढतच चालली आहे. ज्यांच्या पाठीशी महिला त्यांचा नंबर मतपेटीत पहिला, असे सांगून शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. मी गरीब घरातून आलो आहे, मला सर्वांच्या समस्या समजतात म्हणून, मी ही योजना आणली. अनेकांनी याला विरोध केला. परंतु, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. 

Related Articles