थंडीमुळे सुक्यामेव्याची मागणी वाढली   

जीएसटी घटल्यामुळे दर आवाक्यात

पुणे : थंडीत वाढ झाल्याने विविध प्रकारच्या सुकामेव्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असणार्‍या बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, बेदाणे, अंजीर, खारीक, मनुके आदींची मागणी आहे. मागील काही दिवसांपासून दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी नवीन गोयल यांनी दिली. 
 
सुकामेव्याची बाजारात होणारी आवक चांगली आहे. त्यामुळे येत्या काळात मोठी दरवाढ होणार नाही. यंदा देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर पीक उत्पादन समाधानकारक झाल्याने सुकामेव्याच्या बाजारात दिलासादायक चित्र आहे. त्यातच काही वस्तूंवरील जीएसटी कपात लागू झाल्यामुळे ड्रायफ्रूटचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. परिणामी, सर्वसामान्य ग्राहकांसाठी खरेदी अधिक सुलभ झाली आहे. बाजारात स्वदेशी सुकामेव्याचा मुबलक पुरवठा उपलब्ध आहे.
 
बाजारात बदाम, खोबरे, जर्दाळू, अक्रोड, मनुका, पिस्ता, काजू, डिंक, खोबरे, जर्दाळूच्या मागणीत वाढ झाली आहे. सुकामेव्यामुळे शरीराची कॅलरीची गरज पूर्ण होते. डिंकलाडू बनविण्यासाठी दरवर्षी थंडीच्या दिवसात खोबरे आणि डिंकाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. थंडीत खोबरे, डिंक, मेथी आदींपासून तयार केलेल्या डिंक लाडूंना मागणी जास्त असते. हे पदार्थ बनविण्यासाठी ड्रायफ्रूट वापरले जात असल्याने काजू, बदाम, पिस्ते, खारीक, खोबरे आदींना मागणी आहे. डिंक २८०, खोबरे २५० ते ३२० रुपये किलो असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. बाजारात इराण, अमेरिका, अफगाणिस्तान, कॅलेफॉर्निया, ऑस्ट्रेलिया, इराक, ओमान आदी देशातून विविध प्रकारच्या सुका मेव्याची आवक होते, तर सांगली भागातून मनुके, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटकातून खोबरे, कोकणातून काजूची आवक होते. 
 
लाडूच्या पदार्थांनाही मागणी 
 
बहुतांशी नागरिक आरोग्याची काळजी घेत असल्यामुळे हिवाळ्यात विविध पौष्टिक पदार्थ तयार करण्याकडे कल असतो. थंडी सुरू झाल्याने सुकामेव्याची मागणी वाढलेली आहे. घरगुती डिंकाच्या लाडू करणार्‍यासाठी खोबरे, खारिक, डिंक यांची मागणी प्रचंड वाढली आहे. पदार्थ बनविण्यासाठी सुकामेव्याचा वापर वाढतो. म्हणून थंडीच्या मोसमात दरवर्षी सुकामेव्याला मागणी वाढते. 
 
बहुतांशी नागरिक आरोग्याची काळजी घेत असल्यामुळे हिवाळ्यात विविध पौष्टिक पदार्थ तयार करण्याकडे कल असतो. थंडी सुरू झाल्याने सुकामेव्याची मागणी वाढलेली आहे. घरगुती डिंकाच्या लाडू करणार्‍यासाठी खोबरे, खारिक, डिंक यांची मागणी प्रचंड वाढली आहे. पदार्थ बनविण्यासाठी सुकामेव्याचा वापर वाढतो. म्हणून थंडीच्या मोसमात दरवर्षी सुकामेव्याला मागणी वाढते. 
 
- नवीन गोयल, सुकामेवा व्यापारी, मार्केटयार्ड
 
घाऊक बाजारातील दर 
 
पदार्थ दर 
बदाम ८०० ते ८५०
जर्दाळू ४०० ते ६००
खजूर १०० ते १३०
अंजीर १००० ते १५००
खारीक १५० ते ३००
पिस्ता             १२०० ते १६००
काजू ८५० ते १२००
बेदाणा ४५० ते ६००
काळे मनुके  ४५० ते ६००
अक्रोड १५०० ते २०००

Related Articles