माहिती युद्धाचे आव्हान पेलण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणार   

सीडीएस जनरल अनिल चौहान यांची माहिती

पुणे : राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीची होत असताना चुकीची माहिती आणि दिशाभूल करणार्‍या प्रसाराला आळा घालण्यासाठी स्वतंत्र व सक्षम यंत्रणा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी दिली.
 
‘पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हल शुक्रवारपासून सुरु झाले. ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांनी जनरल अनिल चौहान यांची विशेष मुलाखत घेतली.  त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या संरक्षण धोरणातील बदल, माहिती युद्धाचे वाढते आव्हान आणि भविष्यातील सुरक्षाविषयक गरजांवर सविस्तर भाष्य यावेळी त्यांनी केले. 
 
जनरल चौहान म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ‘इन्फर्मेशन वॉरफेअर’ हे राष्ट्रीय सुरक्षेसमोरील मोठे आव्हान ठरत आहे. संकटाच्या काळात योग्य निर्णय घेण्यासाठी सर्व यंत्रणांमधील माहितीची देवाणघेवाण पारदर्शक, वेगवान आणि प्रभावी असणे अत्यावश्यक आहे. अंतर्गत व बाह्य सुरक्षा स्वतंत्र न ठेवता त्यांचा समन्वय साधण्यासाठी ‘होल ऑफ गव्हर्नमेंट’ ही संकल्पना राबवली जात असून, त्याअंतर्गत संरक्षण दलांसह केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, सायबर तज्ज्ञ, संशोधन संस्था तसेच शैक्षणिक व वैज्ञानिक समुदायाला एकत्र आणले जात आहे.
 
एकात्मिक ‘थिएटर कमांड’ उभारणी ही सध्या सर्वोच्च प्राधान्याची बाब असून, या दिशेने प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे जनरल चौहान यांनी सांगितले. उरी, बालाकोट, गलवान आणि डोकलाम येथील परिस्थिती एकमेकांपेक्षा वेगळ्या असल्या तरी प्रत्येक वेळी लष्कराने परिस्थितीनुसार अभिनव प्रतिसाद दिला. मात्र, प्रत्येक संकटासाठी स्वतंत्र धोरण आखण्याऐवजी सर्व प्रकारच्या आकस्मिक परिस्थितींमध्ये उपयुक्त ठरेल अशी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) विकसित केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेवर भर
 
देशांतर्गत संरक्षण उद्योगाला संदेश देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जय’ (जेएआय) संकल्पनेचा उल्लेख केला. संयुक्तता ही केवळ तिन्ही सैन्यदलांपुरती मर्यादित न राहता संरक्षण सेवा, खासगी उद्योग, संशोधन संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्येही बळकट असली पाहिजे, असे ते म्हणाले. बदलत्या जागतिक परिस्थितीत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला पर्याय नाही. दर्जेदार आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक स्वदेशी क्षमता विकसित करणे गरजेचे असून, भविष्यातील युद्धतंत्रज्ञान लक्षात घेता संशोधन, नवकल्पना आणि तरुण पिढीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे जनरल चौहान यांनी अधोरेखित केले.

Related Articles