E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
समाजप्रिय निसर्गशास्त्रज्ञ (अग्रलेख)
Wrutuja pandharpure
10 Jan 2026
आपला विकासाला विरोध नाही; पण तो शाश्वत आणि पर्यावरणाला विचारात घेऊन झाला पाहिजे असे त्यांचे मत होते. पश्चिम घाट-जैवविविधता अहवाल हा त्यांच्या कार्याचा मैलाचा दगड ठरला. मात्र सरकारी गैरसोयीमुळे हा अहवाल दुर्लक्षितच राहिला.
पर्यावरण जनजागृती आणि पर्यावरण रक्षणाचा आग्रह धरणारे निसर्गशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन चटका लावून जाणारे आहे. निसर्ग आणि लोकजीवनाशी समरस झालेला हा शास्त्रज्ञ. पशू-पक्षी, वनस्पती, पाणी, नैसर्गिक संसाधने याविषयी त्यांनी केलेले संशोधन मौलिक स्वरूपाचे आहे. शेतकर्यांच्या जीवनात वृक्षांचे किती महत्त्व आहे ते त्यांचे वडील धनंजयराव गाडगीळ यांच्याकडून ते शिकले. शेतीत नावीन्यपूर्ण शास्त्रीय समजाचा वापर करून देशाला अन्न सुरक्षा मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. निसर्गाच्या शाश्वत उपयोगाबरोबर लोकांचे जीवनमान कसे उंचवता येईल याबाबत गाडगीळ यांची जाण आणि त्यांचे प्रयत्न यांचे वर्णन करणारी त्यांच्या जीवनयात्रेची कहाणी म्हणजे त्यांचे ‘सह्याचला आणि मी - एक प्रेम कहाणी’ हे पुस्तक. केसरी-मराठा संस्थेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणार्या साहित्य सम्राट न. चिं. केळकर ग्रंथ पुरस्कारासाठी त्यांच्या या आगळ्या वेगळ्या चरित्रात्मक ग्रंथाची निवड तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. लहानपणापासूनच निसर्ग आणि पक्षी निरीक्षणाची त्यांनी आवड जोपासली होती. त्याचे अनुभव त्यांनी केळकर पारितोषिक स्वीकारताना कथन केले होते. फर्ग्युसन महाविद्यालयात जीवशास्त्र विषयातील पदवी संपादन केल्यावर मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये सागरी जीवविज्ञानातील पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादन केली होती. माशांच्या वर्तनासंबंधात संशोधन करून त्यांनी पीएच डी मिळवली हाती. हार्वर्ड विद्यापीठातून पुण्यात परत आल्यानंतर महाराष्ट्र विद्यावर्धिनी संस्थेत डॉ. व्ही. डी. वर्तक यांच्या समवेत सह्याद्रीपर्वत रांगामध्ये भ्रमंती करून देवरायांचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास केला. त्यातून देवराया केवळ धार्मिक नसून त्यांना पर्यावरणीय मूल्यदेखील आहे ही वैचारिक मांडणी त्यांनी केली. स्थानिक समाजामध्ये आदिवासींमध्ये राहून त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. पश्चिम घाटात उभारलेल्या काही प्रकल्पामुळे स्थानिक व्यवसायावर गदा आली आहे. स्थानिकांना अंधारात ठेवून प्रकल्प उभारले जात आहेत. धनदांडग्यासमोर स्थानिकांचा निभाव लागत नसल्याने अनेक ठिकाणी रोजगाराचे स्वरूप बदलत आहे. मासेमारी करणार्या मच्छिमारांना शिवणकामाचा व्यवसाय करावा लागतो हे सामाजिक वास्तव त्यांनी आपल्या निरीक्षणातून मांडले.
अग्रगण्य वैज्ञानिक
पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या अभ्यासासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने त्यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नेमली होती. स्थानिक नागरिकांशी चर्चा करून डोंगर रांगामधील उत्खनन, खाणी, डोंगर कापून झालेली बांधकामे, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची होत असलेली हानी हे सारे त्यांनी पश्चिम घाटाच्या जैवविविधा अहवालातून पुढे आणले. आज विकास संकल्पनेचा व्यापार निसर्ग विनाशाची किंमत देऊन होत असताना गाडगीळ यांचे विचार महत्त्वाचे ठरतात. हवामान बदलाचे संकट समोर ठाकले असताना त्यांनी केलेले संशोधन अधिकच अर्थपूर्ण ठरते. दरडी कोसळणे, अतिवृष्टी, भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागणे अशा नैसर्गिक संकटाच्या काळात ॠषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या डॉ. गाडगीळ यांच्या विचाराची प्रकर्षाने आठवण येईल. पश्चिम घाट विषयक अहवाल विकासाच्या संकल्पनेला नवी दिशा देणारा अहवाल होता. निसर्गाचा बळी देऊन मिळणारा विकास तात्पुरता असतो; पण निसर्गासोबत राहून मिळणारा विकास शाश्वत असतो, हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य गाभा आहे. निसर्गाचे रक्षण हे केवळ वनखात्याचे काम नाही किंवा कायद्याचेही काम नाही. स्थानिकांनीच ते केले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन ते करीत. विकास प्रकल्प राबवताना सामान्यांचा आवाज ऐकला जावा, अशी भूमिका ते मांडीत. डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण संरक्षण चळवळीची मोठी हानी झाली आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्याचा वस्तुपाठ त्यांनी समाजाला घालून दिला. त्यांच्या निधनाने परिसर आणि पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य वैज्ञानिकास आपण सर्व मुकलो आहोत.
Related
Articles
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीत आघाडीसाठी हालचाली?
18 Jan 2026
मतदानाच्या 'शाई' वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
15 Jan 2026
भारत आणि अफगाणिस्तानचे पाकिस्तानविरोधात कारस्थान
14 Jan 2026
मुंबईचा गुजरातवर विजय
15 Jan 2026
पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे आज प्रक्षेपण
12 Jan 2026
अल-फलाह विद्यापीठाची मालमत्ता ईडी करणार जप्त
13 Jan 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
रामाला शाप आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक
2
‘शंख एअरलाईन्स’ हवाई सेवेत
3
ट्रम्प यांची गोबेल्सनिती (अग्रलेख)
4
व्हॉट्सऍप कट्टा
5
वाचक लिहितात
6
इस्रोचे रॉकेट भरकटले