शाश्वत प्रश्नांचे महाकाव्य : ‘द् ब्रदर्स कॅरामॅझोव्ह’   

मागोवा : इंग्रजी आणि भाषांतरित साहित्याचा 

डॉ. दीपक बोरगावे
 
रशियन कथन साहित्याचा जेव्हा उल्लेख केला जातो, तेव्हा निकोलाय गोगोल (१८०९-१८५२), इव्हान तुर्गेव्ह (१८१८-१८८३), फ्योदोर दस्तयवस्की (१८२१-१८८१), लिवो (लेव) टॉलस्टॉय (१८२८-१९१०) आणि मॅक्सिम गॉर्की (१८६८-१९३६) यांचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे. ही कथन परंपरा एका सलग सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रवाहातून घडलेली आहे. गोगोल यांच्यापासून आधुनिक रशियन कथन साहित्य आणि गद्याची सुरुवात होते, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. गोगोलच्या उपरोधपूर्ण, विसंगत आणि सामाजिक टीकात्मक लेखनातून पुढील पिढीचा पाया घातला गेला. तुर्गेव्ह यांनी रशियन ग्रामीण जीवन, उदारमतवाद आणि व्यक्ती-समाज यातील द्वंद्व आणि ताण यांना सुसंस्कृत युरोपीय गद्यरूप दिले. याच काळात दस्तयवस्की आणि टॉलस्टॉय हे दोन महत्त्वाचे, पण भिन्न दिशेने जाणारे प्रवाह एकाच वेळी सक्रिय होते.
 
टॉलस्टॉय हे इतिहास, समाजरचना, नैतिकता आणि मानवी जीवनाच्या व्यापक समस्या आणि प्रश्नांवर लिहित असताना, दस्तयवस्की यांनी आपल्या सर्जक लेखनातून व्यक्तीच्या आंतरिक जगाकडे, अपराधभावना, श्रद्धा-अश्रद्धा, स्वातंत्र्य, देव, माणसांमध्ये अंतस्थ असलेली दुष्ट दृष्टी अशा प्रश्नांकडे संवेदनशीलतेने लक्ष दिले. पुढील पिढीत गॉर्की हे आधुनिकीकरण, कामगार वर्ग आणि समाजवादी वास्तववादाचे प्रतिनिधी मानले जातात. या कालानुक्रमात पाहिले तर, दस्तयवस्की हे गोगोलनंतरच्या पहिल्या टप्प्यातील एक महान कादंबरीकार म्हणून त्यांचा उल्लेख नेहमी केला जातो.
 
रशियन कादंबरीला दस्तयवस्की यांनी केवळ सामाजिक वास्तव न देता, तिला अस्तित्ववादी, नैतिक आणि आध्यात्मिक खोली दिली. त्यामुळे रशियन कथन साहित्याच्या इतिहासात त्यांचे स्थान हे केवळ एक वैश्विक कादंबरीकार म्हणून नाही, परंतू आधुनिक मनुष्याच्या अंतर्मनाचे पहिले विश्लेषक म्हणून म्हणता येईल.
 
दस्तयवस्की, टॉलस्टॉय आणि गॉर्की हे तिघेही रशियन साहित्यपरंपरेतील महत्त्वाचे लेखक असले, तरी ते एका अर्थाने समकालीन नव्हते. दस्तयवस्की आणि टॉलस्टॉय हे समकालीन होते; मात्र त्यांची प्रत्यक्ष भेट झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही. गॉर्की हे त्यांच्या तुलनेत पुढील पिढीतील लेखक होते. दस्तयवस्कीच्या निधनावेळी गॉर्की किशोरवयीन होते. त्यामुळे दस्तयवस्की आणि गॉर्की यांची भेट होणे शक्य नव्हते. मात्र टॉलस्टॉय आणि गॉर्की यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. साहित्य, धर्म व समाजपरिवर्तनाच्या प्रश्नांवर त्यांचा संवादही झाला होता असे उल्लेख आहेत. या तिघांमध्ये प्रत्यक्ष भेटींपेक्षा एकमेकांवर झालेला साहित्यिक प्रभाव आणि वैचारिक संवाद हा अधिक महत्त्वाचा आहे असे म्हणता येईल.
 
दस्तयवस्की हे केवळ कादंबरीकार म्हणून नव्हे, तर आधुनिक मानवी मनाच्या नैतिक, मानसिक आणि आध्यात्मिक ताणतणावांचे एक अस्वस्थ पण प्रामाणिक साक्षीदार आहेत. एकोणिसाव्या शतकातील रशियन समाजातील दारिद्र्य, सामाजिक विषमता, राजकीय दडपशाही आणि धार्मिक संकटे यांचा त्याच्या जीवनावर आणि लेखनावर खोल परिणाम झाला. ’द् हाउस ऑफ डेड’मध्ये (१८६२) तुरुंगातील कारावासाचे विलक्षण अनुभव आहेत. हे चरित्रात्मक गद्य लेखन आहे. याला कादंबरी म्हणता येणार नाही. या अनुभवांतून लेखकाने माणसाच्या अपमानित अवस्थेचे, क्रौर्याचे आणि तरीही जिवंत राहणार्‍या मानवी संवेदनांचे चित्रण केले आहे. ’क्राइम अ‍ॅण्ड पनिशमेंट’मध्ये (१८६६) अपराध, अपराधभावना आणि नैतिक जबाबदारीतल्या ताणतणावाचा एका तरुण बुद्धिवादी मनात कसा विस्फोट होतो याचा उलगडा यात आहे. वरवर पाहता ही एक क्राईम स्टोरी असली, तरी यातील पात्रांचे मानसशास्त्रीय विश्लेषण अचाट आहे.
 
दस्तयवस्कीच्या कादंबर्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणतेही ठाम उत्तर देत नाहीत. ’द् इडियट’मध्ये (१९६९) सर्वार्थाने ’चांगला माणूस’ म्हणजे कोण? या नैतिक कल्पनेचा यात सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थाने शोध आहे. ’डेमन्स’मध्ये (१९७२; ही कादंबरी ’द् पझेस्ड’ या नावानेदेखील ओळखली जाते) निहिलिझम, राजकीय अराजकता आणि विचारशून्य क्रांतिकारकत्वतेचे विध्वंसक परिणाम काय होऊ शकतात याचे समर्थ चित्रण यात आहे. या सार्‍या कादंबर्‍यांतून दस्तयवस्की चांगले-वाईट, श्रद्धा-संशय, स्वातंत्र्य-जबाबदारी या द्वंद्वांचे प्रभावी मानवी दर्शन घडवितात. त्यांचे प्रश्न वाचकांना सतत अस्थिर ठेवतात. वाचकांना ते एका जागी सुरक्षित राहू देत नाहीत. याचबरोबर ते वाचकांना सातत्याने अंतर्मुख होण्यास भाग पाडतात.
 
या सार्‍या वैचारिक आणि कलात्मक प्रवासाचा उत्तुंग बिंदू म्हणजे ’द् ब्रदर्स कॅरामॅझोव्ह’ (१८८०) ही त्यांची महाकादंबरी. ही कादंबरी दस्तयवस्कींच्या संपूर्ण चिंतनाचा परिपाक आहे. पिता-पुत्र संघर्ष, देवाच्या अस्तित्वाचा प्रश्न, मानवी स्वातंत्र्याची किंमत, अपराध आणि प्रायश्चित्त-हे सारे ‘शाश्वत प्रश्न’ येथे साक्षात आपल्यासमोर उभे राहतात. इव्हान, अलेक्सेई आणि दिमित्री या केवळ व्यक्तिरेखा नसून मानवी अस्तित्वाच्या भिन्न नैतिक आणि आध्यात्मिक भूमिकांची मूर्त रूपे आहेत, असे ही कादंबरी वाचताना जाणवते.
 
’द् ब्रदर्स कॅरामॅझोव्ह’ ही दस्तयवस्कींच्या आधीच्या सार्‍या कादंबर्‍यांतून विकसित झालेल्या प्रश्नांची टोकदार आणि अंतिम अभिव्यक्ती आहे. आधुनिक मनुष्याच्या नैतिक गोंधळाचे, श्रद्धेच्या संकटांचे आणि स्वातंत्र्याच्या ओझ्यांचा हा एक व्यापक दस्तऐवज आहे. या लेखात या कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रश्नांचा, पात्रांचा आणि त्यामागील दस्तयवस्कीच्या दृष्टिकोनाचा सविस्तर वेध घेणे कठीण आहे. त्यामुळे या कादंरीची साधारण तोंडओळखच अशा प्रकारच्या लेखकातून देता येते याची जाणीव आहे.
 
दस्तयवस्की हे केवळ कथा सांगत नाहीत. ’क्राईम अँड पनिशमेंट’मध्ये अपराध आणि अपराधभाव, ’द् हाऊस ऑफ द् डेड’मध्ये कैद आणि मानवी अध:पतन, ’द् इडियट’मध्ये निरागसता आणि आधुनिक समाज यांचा संघर्ष- या सगळ्या कादंबर्‍यांमधून एकाच प्रश्नाभोवती फिरत राहतात : माणूस म्हणजे नक्की काय? हा प्रश्न त्यांच्या सर्व कादंबर्‍यांच्या केंद्रस्थानी आहे.’द् ब्रदर्स कॅरामॅझोव्ह’ ही त्यांची शेवटची आणि सर्वाधिक गाजलेली कादंबरी आहे. जागतिक कादंबरी विश्वात तिचे स्थान अव्वल आहे. ती आधीच्या सगळ्या कादंबर्‍यांचा विचार एकत्र करून आपणाला पुढे घेऊन जाते. म्हणूनच अनेक समीक्षकांच्यामते ही कादंबरी म्हणजे दस्तयवस्कीचे वैचारिक व आध्यात्मिक आत्मचरित्र आहे. 
 
या कादंबरीत देवाचा प्रश्न हा केवळ धार्मिक प्रश्न नाही, हे पहिल्यांदाच वाचकांना जाणवते. हा प्रश्न नैतिक आणि मानवी आहे. देव असेल तर नीतिमत्ता शक्य आहे, देव नसेल तर ‘सर्व काही चालते’- हे इव्हान करामॅझोव्हचे प्रसिद्ध विधान वाचकांना चक्रावून सोडते. इव्हान हा बुद्धिवादी आहे. तो देवाच्या अस्तित्वाविरुद्ध पुरावे देत नाही. पण तो देवाच्या जगाविरुद्ध आक्षेप घेतो. विशेषतः निरपराध बालकांवर होणार्‍या अत्याचारांचे वर्णन करताना तो म्हणतो,  अशा जगात मी सहभागी होऊ इच्छित नाही. भविष्यातील स्वर्ग, अंतिम न्याय, मोक्ष हे सगळे तो नाकारतो. कारण हे सर्व आजच्या दु:खाचे समर्थन करतात, असे त्याला वाटते. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. इव्हानचा नकार हा नास्तिकतेपेक्षा वेगळा आहे. तो देव नाकारत नाही; पण तो देवाच्या व्यवस्थेला नाकारतो. म्हणूनच दस्तयवस्की इथे वाचकाला नैतिक कोंडीत टाकतात.
 
‘ग्रँड इन्क्विझिटर’ : स्वातंत्र्याची भीती 
 
या नैतिक कोंडीतूनच निर्माण झालेले कादंबरीतील सर्वात प्रसिद्ध प्रकरण म्हणजे, ’ग्रँड इन्क्विझिटर’. इव्हानने सांगितलेली ही कथा म्हणजे संपूर्ण कादंबरीचे तत्त्वज्ञान हे एका रूपक कथेत मांडलेले आहे. ख्रिस्त पृथ्वीवर परत येतो अशी येथे कल्पना केली आहे. लोक त्याला ओळखतात. पण चर्चचा सर्वोच्च अधिकारी, ग्रँड इन्क्विझिटर त्याला तुरुंगात टाकतो. कारण ख्रिस्ताने माणसाला दिलेले स्वातंत्र्य हेच माणसाच्या दु:खाचे मूळ आहे, असे तो म्हणतो. माणसाला स्वातंत्र्य नको; त्याला भाकरी आणि निश्चितता हवी आहे. हा मुद्दा केवळ धार्मिक नाही. तो आधुनिक राजकारणालाही लागू होतो. लोक अनेकदा स्वातंत्र्याच्या बदल्यात सुरक्षितता स्वीकारतात. स्वातंत्र्य हे आवश्यक आहे? का ते शापित वरदान आहे? असा प्रश्न इथे दस्तयवस्की उपस्थित करतात.
 
ख्रिस्त या सगळ्या आरोपांना उत्तर देत नाही. तो फक्त चुंबन देतो. हे चुंबन म्हणजे तर्काचा पराभव नाही; पण तो करुणेचा अविष्कार आहे. काही प्रश्नांना तर्काने उत्तर देता येत नाही; पण त्यांच्यासोबत आपण केवळ जगू शकतो असा हा मानवी अस्तित्वाचा तिढा दस्तयवस्की या रूपकातून सांगतात.
 
आल्योशा हा कादंबरीतील श्रद्धेचे प्रतिक आहे. पण त्याची श्रद्धा सहज, आणि सरळ साधी नाही. वृद्ध साधू झोसिमाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातून दुर्गंधी येते. कोणताही चमत्कार घडत नाही. हा प्रसंग मुद्दाम दस्तयवस्कीनी लिहिला आहे. कारण चमत्कारांवर उभ्या असणार्‍या श्रद्धेला दस्तयवस्की नकार देतात. दस्तयवस्की यांना श्रद्धेचा नेमका अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे,  दु:खाच्या उपस्थितीतही प्रेम आणि करुणाचे अस्तित्व अबाधित राहणे. झोसिमाचा मृत्यू आल्योशाच्या श्रद्धेला हादरवतो, पण तो नष्ट होत नाही.
 
दिमित्री करामॅझोव्हवर वडिलांच्या खुनाचा आरोप होतो. प्रत्यक्ष खून त्याने केलेला नसतो. पण त्याचे जीवन, त्याची वासना, वडिलांविषयी असलेला त्याचा प्रचंड राग- हे सगळे त्याला नैतिकदृष्ट्या दोषी बनवतात. त्यामुळे तो शिक्षा स्वीकारण्यास तयार होतो. इथे दस्तयवस्की कायद्यापेक्षा नैतिकतेला प्राधान्य देतात. ’क्राईम अँड पनिशमेंट’मधील रास्कोलनिकोव्हप्रमाणेच इथेही शिक्षा ही केवळ न्यायालयीन नसून आत्मिक आहे. प्रत्येक माणूस प्रत्येकासाठी जबाबदार आहे, हे मानवी जीवनातील असाधारण सत्य इथे आपणाला साक्षात जाणवते.
 
सैतान : अंतर्मनातील तुकडे 
 
इव्हानला दिसणारा सैतान हे कादंबरीतील एक विलक्षण पात्र आहे. तो बाहेरचा नाही; तो इव्हानच्या मनातला आहे. तो उपहास करतो, विनोद करतो, पण सतत प्रश्न विचारतो. हा सैतान म्हणजे इव्हानच्या आतल्या मनातील श्रद्धा आणि नकार यांचा संघर्ष. माणसाने देवाला नाकारले, तरी देवाच्या अस्तित्वाचा प्रश्न माणसाच्या मनातून जात नाही. हा सैतान म्हणजे आधुनिक माणसाची मानसिक अवस्था आहे.
 
ही कादंबरी कोणतेही ठाम उत्तर देत नाही. इव्हान पूर्णपणे कोसळतो, आल्योशाला मानवी अस्तित्वाच्या प्रश्नांबद्दल कोणतेही तात्त्विक उत्तर मिळत नाही. तरीही आल्योशा मुलांना एकत्र करून त्यांना स्मृती, प्रेम आणि जबाबदारीची जाणीव करून देतो. जगातील दु:ख संपणार नाही, प्रश्नही सुटणार नाहीत, पण माणूस करुणेच्या आधारे जगू शकतो हा एक जीवनमार्ग म्हणून दस्तयवस्कीना अभिप्रेत आहे.
 
देव, नीती, स्वातंत्र्य, हिंसा, दु:ख या प्रश्नांशी आपण आजही झगडत आहोत. ‘द ब्रदर्स कॅरामॅझोव्ह’ ही संहिता आपल्याला यासंदर्भात काहीच उत्तर देत नाही. पण ती आपल्याला प्रामाणिक बनवण्याच्या दृष्टीने एक पाऊल निश्चित पुढे टाकते हे या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रश्न टाळता येत नाहीत, आणि त्यांची किंमत मात्र आपल्याला मोजावी लागते, हा एक फार महत्त्वाचा संदेश या कादंबरीतून आपल्याला मिळतो. म्हणूनच या कादंबरीचे अनन्य महत्त्व आजही संपलेले नाही. 

Related Articles