E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
‘क्लिकबेट’च्या प्रभावात ‘बातम्यां’ची कसोटी
Wrutuja pandharpure
04 Jan 2026
श्वेता बंगाळ-पेंढारे
आजच्या डिजिटल युगातलं ‘क्लिकबेट’हे नवं ‘उपकरण’आहे.‘ऑनलाइन’ मजकुराकडे वाचकांचं लक्ष वेधण्यासाठी सनसनाटी शीर्षकं त्याच्या वापरानं सहज तयार करता येतात. त्यामुळेच घटनांचं वस्तुनिष्ठ वृत्तांकन करण्याऐवजी खळबळजनक शब्दांनी हल्ली बातम्या भरलेल्या असतात. ‘क्लिकबेट’च्या फासात वाचकांना अडकवण्यासाठी प्रत्येक शीर्षक प्रश्नार्थक केलं जातं.वाचल्यानंतर डोंगर पोखरून उंदीर निघाल्याची म्हण आठवल्याशिवाय राहावत नाही.
‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ हे फार मानाचं आणि महत्त्वाचं बिरुद वृत्तमाध्यमांना मिळालं. स्वातंत्र्यपूर्व असो वा स्वातंत्र्योत्तर काळ, माध्यमांनी जनजागृती आणि लोकशिक्षण महत्त्वाचं मानलं, असं इतिहास सांगतो. 80च्या दशकापासून वृत्तमाध्यमांची अगदी ठळकपणे व्यावसायिक वाटचाल सुरु झाली अन्? माध्यमांची धुरा मूठभर उद्योजकांच्या हातात एकवटली. नव्वदच्या दशकात चोवीस तास बातम्या देणार्या चॅनेल्सची स्पर्धा शिगेला पोहोचली. ‘गेटकीपिंग’चे अर्थात कोणत्या घटनांची बातमी द्यायची, कोणती टाळायची याचे निकष जनहित न राहता हितसंबंध झाले. ‘अजेंडा सेटिंग’ने तर एकच विषय इतका तीव्रतेने दाखवला, की आता यापेक्षा मोठा आणि गंभीर दुसरा कुठला विषय असूच शकत नाही, अशी लोकांची धारणा ‘तयार केली’गेली. दोन दशकांपूर्वी आलेल्या सोशल मीडियाने पारंपरिक माध्यम यंत्रणा आणि एकूणच माहितीच्या प्रचार-प्रसारावर असणारं मूठभर लोकांचं नियंत्रण धुडकावून लावलं. खर्या अर्थाने लोकशाहीचा आवाज म्हणता येईल अशी व्यवस्था त्यातून उभी राहिली.तुमच्याकडे असणारी माहिती असो वा एखादी कला, ती कुठे, कशी, केव्हा आणि कोणापर्यंत पोहोचावी याचे सगळे अधिकार मुक्तपणे वापरकर्त्यांना मिळाले. त्यासाठी मोठ्या माध्यम संस्थांपर्यंत जाण्याची गरजच उरली नाही. माध्यमांचे लोकशाहीकरण हा घटनेने दिलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला जणू नवा पैलू मिळाला. आता प्रश्न उरतो, तो स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात होऊ नये म्हणून घातलेल्या बंधनांचा. सामान्य माणसाला एका स्मार्टफोनने हवे तेवढे फोटो काढण्याची, मनात येईल ती कॉमेंट करण्याची ताकद अवघ्या एका क्लिकवर मिळाली. शिवाय खरी ओळख सांगण्याचीही गरज नसल्यामुळे चुकीच्या माहिती अथवा वक्तव्याची जबाबदारी कुणाची हा प्रश्नच गैरलागू झाला. अर्थात बेबंद असणारी दूरसंचार क्षेत्रातील ही क्रांती साधीसुधी नाही. कुठलंही तंत्र विकसित होतं तेव्हा त्याचे चांगले-वाईट दोन्ही परिणाम पहायला मिळतात.
प्रस्थापित माध्यमांनी तंत्रज्ञानाचा कल ओळखून सोशल मीडियाकडे मोर्चा वळवला . रोज न चुकता बीटवर जाऊन बातमी मिळवणं, एका-एका फोटो व्हिडीओसाठी अवजड कॅमेरा घेऊन फिरणं, घटनास्थळी धाव घेऊन चार जणांशी बोलून माहिती पडताळून पाहणं अशी रोज होणारी पत्रकारांची धडपड सोशल मीडियाने एका स्मार्टफोनवर आणून ठेवली. ‘एक्सक्लुझिव’ऐवजी ‘व्ह्यूज’ हे टार्गेट झालं. कारण एकच, ते म्हणजे वापरकर्ते. व्हॉट्स अॅप, फेसबुक, एक्स(ट्विटर), इन्स्टाग्राम, यूट्यूब ही माध्यमेच आता ‘फ्रंट पेज’ आहेत. दहा-वीस सेकंदाचा व्हिडीओ, खळबळजनक कॅप्शन, खिल्ली उडवणारे मिम्स, तिरकस संभाषणाचा स्क्रीनशॉट, बीप बीप वाजणारी ऑडिओ क्लिप, आणि सगळ्यात वरकडी म्हणजे फॅमिली ग्रुपवर फिरणारे फॉरवर्डेड मेसेजेस हे बातम्यांचे आधुनिक प्रकार बनले आहेत. विशेषतः शहरी युवावर्गासाठी इन्स्टाग्राम हाच सर्व माहितीचा अर्थात बातम्यांचा ‘सोर्स’ आहे.
2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारसंघातील प्रचारापेक्षा सोशल मीडियाचा प्रभाव अधिक दिसून आला. कॉमेंट, पोस्ट, रिप्लाय, शेअरिंग, फॉरवर्ड करत सतत अॅक्टिव्ह राहण्याच्या भरात दिसते, ते खरेच मानून अक्षरशः काही मिनिटांमध्ये कोणत्याही गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. त्यात तथ्य पडताळणी बाजूला पडली. परिणामी, कुठे जमावाकडूनहत्या झाली, कुठे धार्मिक तणाव वाढला. अर्धवट माहिती, मॉर्फ केलेले फोटो-व्हिडिओ, अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्य, भावनिक आवाहनं यांना पेव फुटलं. थोडक्यात, खोट्या माहितीचे खरे परिणाम लोकांना भोगावे लागले. लोकांच्या हातातलं हक्काचं माध्यम म्हणून ज्याचं कौतुक झालं, त्या सोशल मीडियाचं ‘अल्गोरिदम’ समजायला काही काळ जावा लागला. अखेर आपण ‘बाहुले’च आहोत हे अल्गोरिदमने दाखवून दिले. आपल्याला सोशल मीडियाच्या फीडमध्ये दिसणारा कंटेंट आपण स्वतः निवडलेला नसून अल्गोरिदमने ठरवला असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. मुळात महत्त्वाच्या घटनांची नोंद घेते ती बातमी. मात्र, सोशल मीडियावर ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी वृत्तमाध्यमांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. त्यातून विशेषतः गुन्हेगारीच्या बातम्या अतिरंजित शब्दांमध्ये मांडण्याचा ‘ट्रेंड’ आलेला दिसतो.लेखन शब्दबंबाळ करून मोठा प्रश्न उपस्थित केलेला असतो,आधुनिक लोकशाहीचा हॉलमार्क बनलेल्या सोशल मीडियाची संभ्रम, अस्वस्थता, ध्रुवीकरण असणारी ही बाजू वृत्तमाध्यमांसाठी जास्त आव्हानात्मक आहे.
‘रॉयटर्स’ या संस्थेच्या संशोधनानुसार 71 टक्के भारतीय बातम्यांसाठी ऑनलाईन माध्यमांवर अवलंबून आहेत. त्यापैकी 49 टक्के लोक फक्त सोशल मीडियावर बातम्या पाहतात. यात सर्वाधिक 54 टक्के बातम्या यूट्यूबवर तर 48 टक्के व्हॉट्स अॅपवर पाहिल्या जातात. वापरकर्त्यांचा भर फक्त वेगाने बातमी मिळण्यावर आहे. बातमीच्या गुणवत्तेशी अर्थात बातमी किती खरी-खोटी, अधिकृत, संतुलित आहे अथवा नाही याच्याशी त्यांना देणे-घेणे नाही. वृत्तमाध्यमांची सुद्धा वेगाने रंजक ‘क्लिकबेट’ बातमी देऊन व्ह्यूज मिळवण्याच्या नादात गुणवत्तेशी फारकत झाली. ‘ए आय’चा वापर करून तयार केल्या जाणार्या फेक न्यूज, डीपफेक व्हिडीओ यामुळे तर सत्य-असत्य यातील सीमारेषा आणखी पुसट झाली आहे. परिणामी, सोशल मीडियावरील बातम्यांची विश्वासार्हता घटत चाललेली दिसते. बातम्यांमध्ये अफवा, नकारात्मकता, तोचतोचपणा, खळबळजनक घटना यांचा अतिरेक वाटत असल्यामुळे अशा बातम्या प्लॅटफॉर्मकडे रिपोर्ट करणार्यांची संख्या वाढत चालली आहे.
‘ए आय’ चा काय परिणाम होईल, याची चर्चा माध्यमक्षेत्रातही आहे. सध्या ‘एआय’ मॉडेल्सचा वापर वृत्तमाध्यमे सर्जनशील शीर्षके, जुने संदर्भ, सत्य पडताळनी( फॅक्ट चेकिंग) इत्यादीसाठी केला जात आहे. ‘इंडिया टुडे’ ने लिसा आणि सना या दोन ‘ए आय’ न्यूज अँकर्सना नियुक्त केलं आहे. ‘ब्लूमबर्ग’ या जागतिक दर्जाच्या माध्यम कंपनीने बंगळुरू येथील कार्यालयात सरिता राय या ‘ए आय’ रिपोर्टरची नेमणूक केली आहे. अनेक न्यूजरूम्समध्ये ‘स्पीच टू टेक्स्ट’ किंवा ‘टेक्स्ट टू स्पीच’ अर्थात बोलून लिहिलं जाणं किंवा लिहिलेलं बोलण्याची कामं ‘ए आय’द्वारे करण्याची पद्धत रुजली आहे.
मात्र चालू काळातील घटनांची नोंद अद्याप कोणतेही ‘ए आय’ मॉडेल घेऊ शकत नाही, ही पत्रकारांसाठी जमेची बाजू आहे. तसेच प्रादेशिक भाषा, प्रत्येक प्रांताची वेगळी संस्कृती, नीतिनियम याबाबत ‘ए आय’ला अजूनही संपूर्ण आणि अचूक ज्ञान नाही. मात्र ‘ए आय’च्या विकासाचा आणि वापराचा वेग पाहता या गोष्टीदेखील ‘ए आय’ लवकरच करू शकेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. 90च्या दशकात कॉम्प्युटर युग सुरु झालं तेव्हादेखील माणसाचं काय होईल, अशी चर्चा होतीच. परंतु कॉम्प्युटर शिकून घेणार्यांनी निश्चितच प्रगती केली. त्यामुळे ‘ए आय’चा वापर शिकून घेणं, त्याचप्रमाणे आपली माणूस म्हणून असणारी कौशल्यं वाढवणं गरजेचं आहे.
अखेर, आपण लिहितो ते माणसंच वाचणार, आपण बोलतो तेही माणसंच ऐकणार आहेत. त्यामुळे त्यांना भावलं पाहिजे असा मानवी भावनिक स्पर्श आपल्या प्रत्येक लिहिण्या-बोलण्याला असावा. सोपं-जलद होईल म्हणून आपण सर्रास ‘ए आय’ जनरेटेड कंटेंट वापरला तर तो अगदी रुक्ष, तांत्रिक आणि निर्जीव वाटेल. तंत्रज्ञान कितीही बदललं, तरी सत्य शोधणं ही पत्रकारितेची मूलभूत जबाबदारी राहतेच. सोशल मीडियाच्या वेगवान जगात वेगवान असण्यापेक्षा अचूक असणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया आणि एआय मॉडेल्स भरमसाठ डेटा देऊ शकतात, परंतु अचूक संदर्भ, संवेदना आणि नैतिकता ही मानवी मूल्यं फक्त पत्रकारांकडे आहेत.
वाचकांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. फक्त दिसेल ते पुढे पाठवणं ही जबाबदार लोकशाही नव्हे; विचारपूर्वक माहिती निवडणं, माहितीचा स्त्रोत तपासणं आणि अफवांपासून दूर राहणं ही आधुनिक नागरिकांची किमान कर्तव्यं आहेत. सोशल मीडिया हे साधन आहे; निर्णय मात्र आपलेच असावेत.
(लेखिका अहिल्यानगरच्या न्यू आर्ट्स, कॉर्मस अँड सायन्स कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापक आणि संज्ञापन शास्त्राच्या अभ्यासक आहेत.)
Related
Articles
नाशिकमध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला
15 Jan 2026
मेट्रो आणि बस प्रवास फुकट करण्यापेक्षा....
15 Jan 2026
प्रेमळ आणि बहुआयामी डॉ. शां. ब. मुजुमदार
12 Jan 2026
शास्त्रज्ञांनी शोधल्या बेडकांच्या दोन नवीन प्रजाती
12 Jan 2026
अर्शदीप सिंग,आयुष बदोनीला भारतीय संघात संधी
14 Jan 2026
पिंपरी-चिंचवड निवडणुकीत अजित पवार आणि लांडगे यांच्यात सामना
15 Jan 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
इराणमधील आंदोलन चिरडण्यास सुरुवात
2
रामाला शाप आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक
3
‘शंख एअरलाईन्स’ हवाई सेवेत
4
ट्रम्प यांची गोबेल्सनिती (अग्रलेख)
5
इराणचा इतिहास क्रांतीने भरलेला
6
ओडिशात छोटे विमान कोसळून सहा जखमी