हिंजवडीत बसच्या धडकेत भावंडांचा मृत्यू   

मद्यधुंद चालकाचा प्रताप

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. भरधाव खासगी बस थेट पदपथावर चढली आणि पायी जाणार्‍या नागरिकांना जोराची धडक दिली. या दुर्घटनेत दोन शाळकरी भावंडांचा मृत्यू झाला असून, काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड या रस्त्यावर झाला. अर्चना देवा प्रसाद (वय-८), सूरज देवा प्रसाद (वय-६) अशी मृत भावंडांची नावे आहेत. जखमींमध्ये प्रिया देवा प्रसाद (वय १८) आणि अविनाश चव्हाण यांचा समावेश आहे. बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत.
 
आयटी कर्मचार्‍यांना घेऊन जाणारी ही बस भरधाव वेगात होती. मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट पदपथावर चढली. यावेळी पायी जाणारी भावंडे आणि इतर पादचार्‍यांना बसने धडक दिली. दुर्घटनास्थळीच दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हिंजवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि बघ्यांची गर्दी हटवली. हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा या दुर्घटनेमुळे समोर आला आहे. नागरिकांकडून अपघात थांबणार कधी ? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क परिसर अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ बनत आहे. मागील अकरा महिन्यांत या परिसरात विविध अपघातांत ३६ नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये ‘आयटी’ कंपन्यांत काम करणार्‍या तरुणांचाही समावेश आहे. वाहनांची अनियंत्रित वर्दळ, खराब आणि अरुंद रस्ते, अपुर्‍या पायाभूत सुविधा आणि अवजड वाहनचालकांचा आडमुठेपणा यामुळे आयटी हब परिसर धोकादायक बनत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

Related Articles