नगराध्यक्ष पदासाठी तळेगावात आज मतदान   

तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत प्रचंड चुरस 

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या तीन्ही उमेदवारांनी अखेरच्या टप्प्यात प्रचाराला जोरदार मुसंडी मारल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. तर सहा नगरसेवकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे निवडणुकीतील गंमत काहीशी कमी झाली आहे.यापूर्वी १९ नगरसेवकांची बिनविरोध निवड झालेली आहे.फक्त नगराध्यक्षांच्या निवडणुकीत मात्र चांगले रंग चढलेले आहेत.
 
नगरपरिषदेच्या १४ प्रभागांतील २८ सदस्यांची निवडणूक होत असून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) यांची महायुती तळेगाव शहरात झालेली आहे. जागावाटपात नगराध्यक्ष पद भारतीय जनता पक्षाला देण्यात आले असून उर्वरित २८ जागांपैकी १७ जागा राष्ट्रवादीकडे आणि ११ जागांवर भारतीय जनता पक्षाला समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे प्रारंभी या वाटणीवरून भाजपमध्ये नाराजीचे वातावरण होते. नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांची दोन्ही पक्षांनी एकमताने निवड केली आहे.त्यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष ड.रंजना भोसले व माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल केली आहे.म्हणून ही निवडणूक त्रि-रंगी ठरली असून चुरस अधिकच वाढली आहे. अखेरच्या टप्प्यात किशोर भेगडे यांनी मोठी प्रचारयंत्रणा उभी करून निवडणुकीत आव्हान निर्माण केले आहे तर माजी नगराध्यक्ष भोसले यांनी सोशल माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करून प्रचारातील रंगत वाढवली आहे.
 
जागावाटपातील काही असंतुष्ट मतदारांचा फायदा दोन्ही विरोधी उमेदवार घेत असल्याने अंतिम क्षणी नेमके चित्र काय उभे राहील हे सांगणे कठीण झाले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यानंतर १९ उमेदवार बिनविरोध निवडले गेले.उर्वरित सहा प्रभागांची निवडणूक आयोगाने स्थगित करून मतदान २० डिसेंबरला ठेवले आहे.त्यामुळे नगरसेवकांच्या निवडणुकीतील उत्साहात काहीशी घट झाली आहे. आज नगराध्यक्ष निवडणुकीसाठी १४ प्रभागांत ७१ मतदान केंद्रे उभारलेली असून प्रभाग क्रमांक ३ मधील ‘अ’ आणि ‘ब’ या एकेका जागांची,प्रभाग क्रमांक ५ मधील एका जागेची तसेच प्रभाग क्रमांक १० मधील एका जागेची निवडणूक होत आहे.प्रभाग क्रमांक १० मधील दुसर्‍या जागेची निवडणूक २० डिसेंबरला होणार असल्याने शहरात नगराध्यक्ष पदाच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) चे आमदार सुनिल शेळके यांनी महायुतीसाठी पुढाकार घेतल्याने या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
 
डिजिटल प्रचाराचा जोर
 
या निवडणुकीत रील्स,फेसबुक पोस्ट,व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि खास तयार केलेले प्रचार व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून आकर्षक गाणी,ट्रेंडिंग कट्स, प्रोमो व्हिडिओ आणि विविध प्रचार सामग्री तयार केली जात आहे.शहरात पोस्टर व फलकांमुळे निवडणुकीची धांदल वाढली असून मुख्य रस्ते, चौक,बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणे रंगीत पोस्टरफलकांनी सजली आहेत. सायकल,मालमोटार आणि रिक्षातून होणार्‍या ध्वनीप्रचारामुळे शहरातील निवडणूक उत्साह आणि राजकीय तापमान अधिकच वाढले आहे.

Related Articles