शहाजी पाटील यांच्या कार्यालयावर छापा   

सोलापूर,(प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोलाचे शिंदे सेनेचे माजी आमदार व ज्येष्ठ नेते शहाजीबापू पाटील यांच्यासह सांगोला शहर विकास आघाडीचे नेते व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील तसेच भाजप, शेकाप आणि दीपक साळुंखे पाटील यांच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयाची रविवारी रात्री अचानकपणे निवडणूक भरारी पथकाने तपासणी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र या तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारचे संशयास्पद आढळून आलेले नाही.
 
निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर नियमित तपासणी भरारी पथकाकडून करण्यात येते. दीपक साळुंखे यांच्यासह काही नेत्यांनी हा निवडणूक विभागाचा विषय असल्यामुळे आपण त्याला सर्वतोपरी सहकार्य केल्याचे सांगितले असले तरी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मात्र सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरूनच आपल्या कार्यालयावर भरारी पथकाने धाड टाकल्याचा आरोप केला आहे. पैसे वाटून आपण निवडणुका कधीच जिंकलेलो नाही. महायुतीला पराभव दिसू लागल्यामुळेच निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मध्यरात्री भरारी पथकाने जाणीवपूर्वक आपल्या कार्यालयावर धाड टाकल्याचा आरोप शहाजी पाटील यांनी केला आहे. महायुतीकडून मारुती आबा बनकर तर शिंदेसेनेकडून आनंदा माने यांच्यात नगराध्यक्षपदासाठी कमालीची चुरस दिसून येत आहे.
 
आपल्या कार्यालयावरील छापा हा दीपक साळुंखे आणि गोरेंमुळे झाला. जयकुमार गोरे यांच्या पाठीमागे लागण्यासाठी आपण त्यांच्या मतदारसंघात जाऊन बसलो तर कळायचे की नाही, अशी टीका माजी आमदार शाहाजी बापू पाटील यांनी केली आहे.

Related Articles