कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी संघर्ष   

राज्यरंग : राही भिडे

कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षात सर्व काही ठीक नाही. अलिकडेच सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार या दोन वरिष्ठ पक्षनेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला. सिद्धरामय्या यांना सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा विक्रम करायचा आहे, तर शिवकुमार हे मुख्यमंत्री होण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. त्यामुळे कर्नाटकमधील राजकारण ढवळून निघत आहे. ही भाजपासाठी संधी तर ठरणार नाही ना?
 
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या यांच्या जागी शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवणार की नाही याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्रिपद वाटप करण्याच्या सूत्रावर पक्षाने सहमती दर्शवल्याचीही चर्चा आहे. सत्तावाटप कराराबाबत काँग्रेस मौन बाळगून आहे; परंतु दोन्ही नेत्यांचे समर्थक याबाबत दावे करत आहेत. यामुळे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वापुढे पेच निर्माण झाला आहे. २० नोव्हेंबर रोजी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षे पूर्ण केली. काँग्रेसच्या सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या वृत्तानुसार, शिवकुमार यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यासाठी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर दबाव आणण्यासाठी किमान १५ आमदार आणि विधान परिषदेचे सुमारे एक डझन सदस्य दिल्लीत तळ ठोकून आहेत. दोन वर्षांपूर्वी २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत १३५ जागा जिंकून काँग्रेसने सत्ता मिळवली. त्या वेळी काँग्रेसचा हा एक महत्त्वाचा विजय ठरला होता. तथापि, पक्षाला योग्यरित्या आनंद साजरा करता येण्यापूर्वीच सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून मतभेद निर्माण झाले. पक्षश्रेष्ठींनी त्या वेळी परिस्थिती नियंत्रणात आणली. तथापि, आता कर्नाटकमधील काँग्रेसचा डाव उघडकीस आल्यानंतर पक्षाला कडक इशारा द्यावा लागला असून आपल्या आमदारांना आणि नेत्यांना नेतृत्वाबद्दल सार्वजनिक वक्तव्य करण्यास मनाई करावी लागली आहे. शिवकुमार यांचे समर्थक दिल्लीमध्ये तळ ठोकून असताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपण मुख्यमंत्री कायम राहू, असा विश्वास व्यक्त केला. नेतृत्वबदल, मंत्रिमंडळात फेरबदल किंवा सरकार पुनर्रचना याबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील, असा सूर दोघांनी लावला. 
 
पुढील अडीच वर्षेही मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याच्या सिद्धरामय्या यांच्या विधानावर शिवकुमार यांनी त्यांचे अभिनंदन केले. अर्थात हे कुत्सितपणे होते, हे वेगळे सांगायला नको. सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत. त्यांना वाटते, की पक्षनेतृत्व या मुद्द्यावर नेते आणि आमदारांना शांत करण्यासाठी त्यांच्या बाजूने काम करत आहे. ते सांगतात, की त्यांना आणि शिवकुमार यांना पक्षनेतृत्व जे काही सांगेल, ते स्वीकारावे लागेल. मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याबाबत त्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे. ते दिल्लीतील आमदारांच्या लॉबिंगला फार महत्त्व देत नाहीत. शिवकुमार मात्र आमदारांचा बचाव करताना म्हणतात, की आमदारांना आपल्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याचा अधिकार आहे. त्यांना कोणी थांबवू शकत नाही. शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त होते. सिद्धरामय्या यांच्याशी त्यांना कोणत्याही विषयावर चर्चा करायची नाही. ते स्पष्टपणे सांगतात, की त्यांनी सर्व जबाबदारी वरिष्ठ नेतृत्वावर सोपवली आहे आणि मुख्यमंत्री तसेच आपण स्वत: पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करु. म्हणून आता हा विषय ते आणि पक्षश्रेष्ठींच्या दरम्यान आहे. दरम्यान, शिवकुमार यांनी पक्षात गटबाजी असल्याचे नाकारून, पक्षातील अंतर्गत कलहाबाबतच्या बातम्यांसाठी भाजपला जबाबदार धरले. पक्षाचे राज्य प्रभारी आणि सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही राज्य काँग्रेसमधील अंतर्गत कलहासाठी भाजपला जबाबदार धरले. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितले, की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. दोघांनीही मान्य केले, की भाजप माध्यमांच्या एका गटाच्या सहकार्याने काँग्रेस आणि त्यांच्या सरकारला बदनाम करण्यासाठी मोहीम चालवत आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन वरिष्ठ नेत्यांमधील वादामुळे राज्य काँग्रेसच्या हातून निसटले. कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे राज्याच्या राजकारणात नवी उलथापालथ झाली आहे. कर्नाटक काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू असल्याच्या अटकळीदरम्यान, सिद्धरामय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले, की खर्गे यांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदावर राहून आगामी राज्य अर्थसंकल्पाची तयारी करण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे, शिवकुमार यांचे समर्थक त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत. अनेक आमदारांनीही कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गटात खळबळ उडाली आहे. तथापि, सिद्धरामय्या यांनी आता या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. खर्गे यांची भेट घेतल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले, की आम्ही बंगळुरूसह कर्नाटकमधील आगामी नगरपालिका निवडणुकांवर चर्चा केली. नेतृत्वबदल आणि आमदारांच्या दिल्ली दौर्‍याचा संदर्भ देताना सिद्धरामय्या म्हणाले, की ही फक्त एक अफवा होती. माध्यमांनी ही कथा रचली. मी आमदारांना ते दिल्लीला का गेले हे विचारले नाही. याबाबत मला काही जाणून घ्यायचे असेल, तर मी गुप्तचर विभागाकडून माहिती घेईन. आमदारांना दिल्लीला जाऊ द्या. शेवटी प्रत्येक नेता, मंत्री आणि अगदी शिवकुमार आणि मी पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे. एकिकडे ही प्रांजळ मते ऐकायला मिळत असताना १५ हून अधिक काँग्रेस आमदारांनी नवी दिल्लीमध्ये खर्गे यांची भेट घेतली आणि शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी दबाव आणला. सिद्धरामय्या यांनी नोव्हेंबरमध्ये अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. परिणामी, अनेक आमदार पुढील अडीच वर्षांसाठी शिवकुमार यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी मागणी करत आहेत. तथापि, काँग्रेसने संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे. कर्नाटकमध्ये गेल्या काही काळापासून नेतृत्वबदलाचे अंदाज पसरत आहेत. शिवकुमार यांचे समर्थक त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत होते. अनेक आमदारांनीही कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये तणाव वाढला होता. तथापि, सिद्धरामय्या यांनी या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. अधूनमधून काँग्रेसमधील नेतृत्वबदलाचा प्रश्न डोके वर काढत असतो. 
 
कर्नाटकमध्ये काँग्रेसला यश मिळवून देण्यात प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा मोठा वाटा असला, तरी समर्थकांची संख्या जास्त असल्याने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर आली. त्या वेळी अडीच वर्षांनंतर शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव होता, असे सांगितले जाते; परंतु सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नसल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेले कर्नाटक हे एकमेव मोठे राज्य आहे. तिथे काँग्रेसला सत्ता आणता येते; परंतु ती टिकवता येत नाही, हा अनुभव आहे. आताही कर्नाटक काँग्रेसमधील संघर्ष सुरूच आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात तणाव आहे. शिवकुमार यांच्या समर्थकांनी उघडपणे नेतृत्वबदलाची मागणी केली नसली, तरी त्यासाठी दिल्ली दरबारी तळ ठोकला आहे. हे समजताच सिद्धरामय्या यांनी अनेक आमदारांसह दिल्ली गाठली. काँग्रेसने नेतृत्वबदल केल्यास आपल्यामागे भरपूर समर्थक असून काहीही होऊ शकते, हे दाखवण्याचा आणि तसा अप्रत्यक्ष इशारा देण्याचा त्यांचा हेतू होता. कर्नाटक हे खर्गे यांचे राज्य असून राष्ट्रीय अध्यक्षांच्या राज्यातला हा सत्तासंघर्ष परवडणारा नाही. एकीकडे शिवकुमार यांनी नेतृत्वबदलाची चर्चा फेटाळून लावली आहे, दुसरीकडे  सिद्धरामय्या यांनी पक्षनेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य राहील, असे सांगितले आहे. मात्र आतून संघर्ष कायम आहे. 
 
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्याअगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. एकीकडे ही स्थिती असताना कर्नाटक काँग्रेसमधील सुंदोपसुंदीचा फायदा उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दक्षिण दिग्विजयाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे राज्य भाजपला मागील निवडणुकीमध्ये गमवावे लागले. मागच्यासारखे काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावून सत्ताबदल करता येतो का, हे भाजप आजमावत आहेच; परंतु माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी चौकशीला सामोरे जात आहेत. त्यांच्या मुलाकडे त्यांच्यासारखे कर्तृत्व नाही. धर्मनिरपेक्ष जनता दल केंद्रातील सत्तेत असले, तरी लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे कुटुंब अगोदरच बदनाम झाले आहे. अशा स्थितीत काँग्रेसमधील सत्तासंघर्षाचा फायदा उठवण्याची भाजपंची क्षमता आहे का, हा खरा प्रश्न आहे. 
 

Related Articles