E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
‘ही मॅन’ची एक्झिट
Samruddhi Dhayagude
30 Nov 2025
श्रद्धांजली : मधुरा कुलकर्णी
जगातील सर्वात देखणा अभिनेता म्हणून आंतरराष्ट्रीय माध्यमांनी गौरव करुनही धर्मेंद्र यांचे पाय कायम मातीत राहिले. त्यांनी कधीही स्वतःला नंबर वन मानले नाही. धर्मेंद्र यांचे स्टारडम प्रचंड होते. सुपरस्टार असूनही त्यांचे आयुष्य साधेपणाने प्रेरीत होते. हा उमदा कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेला असला तरी उत्तमोत्तम भूमिका, संस्मरणीय व्यक्तिरेखा आणि अव्वल अभिनय यासाठी रसिकांच्या हृदयात राहील.
धर्मेंद्रसारख्या दिग्गजाला निरोप देण्यासाठी एक शिष्टाचार असतो. राष्ट्रीय सन्मान विसरून जा; त्यांच्या मृत्यूची बातमीच सस्पेन्समध्ये लपून राहिली. धर्मेंद्र यांना राष्ट्रीय सन्मानाने अंतिम निरोप द्यायला हवा होता. त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मभूषण पुरस्कराने सन्मानित करण्यात आले होते. सुरुवातीला रुग्णालयात त्यांच्या आजाराभोवती असलेल्या सस्पेन्समुळे चाहत्यांना धक्का बसला. नंतर, त्यांच्या मृत्यूबाबतच्या अफवांनी एक नाट्य निर्माण केले. कुटुंबातील सदस्यांनी माध्यमांवर आगपाखड केली. धर्मेंद्र हे भाजपचे माजी खासदार होते. त्यांचे पुत्र, सनी देओल आणि हेमा मालिनी यांनीही भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे या कुटुंबाने सर्व राजकीय पक्षांशी जवळचे संबंध राखले आहेत. मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीमध्ये अतिशय खासगी पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. याबाबत इतकी गुप्तता का पाळली गेली, असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला. त्यांना तोफांच्या सलामीसारखा राज्यस्तरीय सन्मान मिळाला नाही. पद्मभूषण पुरस्कारप्राप्त लोकप्रतिनिधीसाठी हा सन्मान अपेक्षित असतो; परंतु कुटुंबाची त्वरित अंत्यसंस्काराची इच्छा होती. त्यामुळे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. धर्मेंद्र साधेपणा, नम्रता आणि मोकळ्या स्वभावाबद्दल ओळखले जात होते. रूपेरी पडद्यावर धर्मेंद्र ‘अॅक्शन-ओरिएंटेड’ प्रतिमेत कैद झाले असले, तरी मुळात कवी होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफदेखील त्यांचे चाहते होते. धर्मेंद्र त्यांच्या अभिनयासाठी तसेच उदारतेसाठीही प्रसिद्ध होते. ‘धर्मेंद्र- नॉट जस्ट अ ही-मॅन’ हे पुस्तक पंजाबपासून मुंबईपर्यंतच्या त्यांच्या प्रवासाच्या आठवणी उलगडून दाखवते. धर्मेंद्र यांचे वडील लुधियानाजवळील सानेवाल गावात गणिताचे शिक्षक होते आणि मुलानेही प्राध्यापक व्हावे असे त्यांना वाटत होते; परंतु मुळात हुशार असलेल्या धर्मेंद्र यांनी चित्रपटक्षेत्राची वाट धरली. चित्रपट पाहणे हे त्यांचे एक दूरचे स्वप्न होते. लहानपणी, १९४८ मध्ये प्रदर्शित झालेला दिलीपकुमार यांचा ‘शहीद’ हा चित्रपट त्यांनी गुपचूप पाहिला. चित्रपट आणि दिलीपकुमार यांनी त्यांच्या हृदयावर जादू केली आणि जणू काही त्या दिवशी त्यांचे नशीब पालटले. नशीबही त्यांच्या बाजूने होते. १९५८ मध्ये ‘फिल्मफेअर’ मासिकाने नव्या कलाकारांच्या प्रतिभा शोधासाठी मोहीम राबवली. त्यात बिमल रॉय आणि गुरुदत्त सारखे दिग्गज उपस्थित होते. त्या वेळी मालेर कोटलामध्ये काम करणारे धर्मेंद्र जान मोहम्मद फोटो स्टुडिओमध्ये गेले आणि म्हणाले, ‘मला दिलीपकुमारसारखे दिसायचे आहे; काही तरी करा.’ आणि अगदी तसेच घडले. ‘फिल्मफेअर’तर्फे त्यांची निवड झाली आणि ते मुंबईत आले.त्यानंतर धर्मेंद्र यांची बहुरंगी, बहुढंगी चित्रपट कथा सुरू झाली. १९६० च्या दशकाच्या अखेरीस धर्मेंद्र यशाच्या शिड्या चढत होते. बिमल रॉय यांनी त्यांना ‘बंदिनी’ या चित्रपटात पहिली भूमिका दिली; पण हा चित्रपट तयार होण्यासाठी वेळ लागला आणि त्यांच्या संघर्षाच्या काळात अर्जुन हिंगोरानी यांनी ‘दिल तेरा हम भी तेरे’ या चित्रपटासाठी धर्मेंद्रला साइन केले. १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फूल और पत्थर’ या चित्रपटाने धर्मेंद्रला एकल नायक म्हणून स्थापित केले. या चित्रपटातील एका दृश्यात धर्मेंद्र एक गुंड आणि मद्यपीची भूमिका करत होता. तो आपला शर्ट काढून एका भिकारी आणि विधवेला घालतो. त्या वेळी, कोणत्याही नायकाकडे अशी शरीरयष्टी नव्हती. या चित्रपटाने ‘ही-मॅन’ पात्राची पहिली झलक दाखवली आणि धर्मेंद्रला पहिले फिल्मफेअर नामांकन मिळवून दिले. यशाची शिडी चढताना हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. स्पर्धा चुरशीची होती. १९६० च्या दशकात धर्मेंद्र सुरुवात करत होता, तेव्हा शम्मी कपूर सर्वांच्या पसंतीला उतरला होता. १९७० च्या दशकात राजेश खन्नारुपी वादळ घोंगावत होते. तो नवी उंची गाठत होता. त्यानंतर अमिताभ नावाचे नवे वादळ आले; पण या सगळ्यात धर्मेंद्र हा कदाचित एकमेव अभिनेता असेल, जो ६० ते ८० च्या दशकापर्यंत ‘हिट मशीन’ राहिला. हा काळ धर्मेंद्रच्या ‘हकीकत’, ‘दिल ने फिर याद किया,’ ‘ममता’, आणि ‘मेरे हमदम, मेरे दोस्त’ सारख्या चित्रपटांचा होता, तिथे त्याला बिमल रॉय, हृषिकेश मुखर्जी आणि चेतन आनंद सारख्या दिग्दर्शकांनी सन्मानित केले होते.
नंतर १९७० चे दशक आले. त्यात धर्मेंद्र यांची अनोखी शैली दिसली. त्यात अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी आणि व्यावसायिक चित्रपटांपासून ते सर्व काही होते. ‘जीवन मृत्यू’, ‘सीता और गीता’, ‘चरस’, ‘ब्लॅकमेल’, ‘चुपके चुपके’ असा प्रवास सुरू होता. १९७५ मध्ये ‘शोले’च्या वेळी त्यांची, ‘वीरू’च्या व्यक्तिरेखेची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. मग ते टाकीवर चढण्याचे दृश्य असो वा अन्य; या चित्रपटाने धर्मेंद्र यांना स्टारडमपर्यंत पोहोचवले. धर्मेंद्र सर्वात देखण्या अभिनेत्यांपैकी एक होता. दिलीपकुमार हे धर्मेंद्र यांचे आदर्श होते. एकदा एका कार्यक्रमात दिलीपकुमार म्हणाले होते, की ते मंदिरात जात, तेव्हा आपल्याला धर्मेंद्रइतके देखणे का बनवले गेले नाही, असे विचारायचे! एके काळी धर्मेंद्र यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती; परंतु दारूच्या व्यसनामुळे त्यांचे नुकसान झाले. १९९० च्या दशकानंतर ‘सत्यकाम’ आणि ‘चुपके चुपके’ या चित्रपटांचे स्टार धर्मेंद्र यांनी ‘पापी देवता’, ‘वीरू दादा’, ‘डाकू भैरव सिंह’ आणि ‘महाशक्ती’ यासारख्या चित्रपटांमध्ये ज्या प्रकारच्या भूमिका केल्या, त्या अनेक चाहत्यांसाठी वेदनादायक होत्या. १९९० ते २००३ हा काळ धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतील प्रतिगामी काळ म्हणता येईल. १९९९ मध्ये केलेल्या ‘मुन्नीबाई’ या चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतःला ‘बी-ग्रेड’ चित्रपटांमध्ये पूर्णपणे बुडवून घेतले. अभिनय आणि धर्मेंद्र यांचे नाते अतूट होते. एका मुलाखतीत धर्मेंद्र म्हणाले होते, ‘अभिनय हा माझ्यासाठी प्रियकर आहे. मला तो आवडतो. प्रियकर आणि आणि प्रेयसीमध्ये जसे भांडण होते, तसे आमच्यातही होते. कधी कधी ती नाराज होते आणि मी तिला शांत करतो; तर कधी कधी मी नाराज होतो आणि ती मला शांत करते; पण मी कधीही हार मानली नाही.’ धर्मेंद्रने कधीही अभिनय सोडला नाही. अभिनयाव्यतिरिक्त धर्मेंद्र यांना उर्दू भाषेतील रचना आणि कविता आवडायच्या. त्यांच्या अभिनयात एक साधेपणा होता. एक अशी कृपा होती, जी कधी कधी पडद्यावर दिसून येते आणि कधीकधी ‘ही-मॅन’च्या सावलीत लपलेली राहते; परंतु धर्मेंद्रचा शोध कधीच संपला नाही. त्यांच्या चित्रपटातील एक संवाद आहे, ‘काही तरी मिळवण्याची इच्छा, काही तरी चांगले शोधणे या प्रक्रियेत माणूस त्याच्याकडे असलेले सर्वस्व गमावतो. शोध कधीच संपत नाही. वेळ संपतो...’ एका कार्यक्रमात धर्मेंद्र म्हणाले होते, की प्रत्येकजण आपल्या मेंदूने काम करतो; परंतु आपण आपल्या हृदयाचा वापर करतो, कारण देवाने आपल्याला हृदय दिले आहे. आपण आपल्या हृदयाचा वापर जास्त करतो. जगातील सर्वात देखणा अभिनेता म्हणून आंतरराष्ट्रीय माध्यमांनी गौरव करुनही धर्मेंद्र यांचे पाय कायम मातीत राहिले. मातीशी त्यांचे इमान कधीच तुटले नाही. एक यशस्वी अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांचा वारसा चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्यांनी कधीही स्वतःला नंबर वन मानले नाही. धर्मेंद्र एक दिग्गज अभिनेते होते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान कलाकारांपैकी एक होते. त्यांचे स्टारडम प्रचंड होते. सुपरस्टार असूनही त्यांचे आयुष्य साधेपणाने प्रेरीत होते. हा उमदा कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेला असला तरी उत्तमोत्तम भूमिका, संस्मरणीय व्यक्तिरेखा आणि अव्वल अभिनय यासाठी रसिकांच्या हृदयात राहील.
Related
Articles
अनंत अंबानी यांचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्काराने सन्मान
10 Dec 2025
जर्मनीत होणार सैन्य भरती
06 Dec 2025
गोंदवलेकर महाराजांच्या ११२ व्या पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ
07 Dec 2025
कर्ज आणखी स्वस्त होणार?
11 Dec 2025
शेतकर्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार
08 Dec 2025
सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महोत्सवाची सुरुवात
11 Dec 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सूरांच्या मैफलीतून उघडतोय श्रोत्यांच्या भावनांचा कप्पा
2
शीतल तेजवानीच्या घरांची झडती
3
पोरकेपणाची व्यथा (ऑर्फन)
4
जबाबदारीचे भान हवे!
5
महामार्ग, की अपघाताचे सापळे? (अग्रलेख)
6
विमान प्रवाशांची आर्थिक लूट