सांस्कृतिक उद्योजकता : महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा पाया   

डॉ. गीताली टिळक ,कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
 
महाराष्ट्राने ज्ञान, कला आणि सांस्कृतिक परंपरा यांचा समन्वय साधत देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात दीर्घकाळ महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे; पण नव्या जागतिक परिस्थितीत, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्रसारमाध्यमे आणि सांस्कृतिक उद्योगांच्या वेगवान वाढीच्या पार्श्‍वभूमीवर, आपल्या संस्कृतीची नवीन मांडणी आणि तिच्या प्रणालीगत विकासाची गरज प्रकर्षाने जाणवते. या संदर्भात सांस्कृतिक उद्योजकता ही संकल्पना केवळ आर्थिक संधी निर्माण करणारी नव्हे, तर समाजाला नव्या ओळखीची, नव्या ऊर्जेची प्रेरणा देणारी ठरू शकते.
 
आजचा तरुण वर्ग पारंपरिक नोकरीपलीकडे जाणार्‍या करिअरचा शोध घेत आहे. कला, लोकपरंपरा, नाट्य, संगीत, साहित्य, हस्तकला, लोकसाहित्य आणि पर्यटन या क्षेत्रांत महाराष्ट्राला अद्वितीय वारसा लाभला आहे; परंतु या वारशाचे उत्पादन, व्यवस्थापन आणि बाजारपेठीकरण यांची आधुनिक पूरक रचना तयार केल्याशिवाय, या क्षेत्रातील तरुणांना जागतिक स्तरावरची उंची मिळणे अवघड आहे. त्यामुळे सांस्कृतिक घटकांना उद्योजकतेशी जोडणारी नवी शैक्षणिक रचना ही काळाची मागणी बनली आहे.
 
विद्यापीठांनी ‘सांस्कृतिक उद्योजकता’ ही स्वतंत्र अभ्यासशाखा म्हणून स्थापावी, अशी अपेक्षा आता वाढू लागली आहे. यात विद्यार्थी केवळ परंपरा शिकणार नाही, तर त्या परंपरा आधुनिक भाषेत कशा सादर करायच्या, डिजिटल माध्यमांतून त्यांची मूल्यसाखळी कशी उभारायची, स्टार्टअप मॉडेल कसे विकसित करायचे, पर्यटनाशी कसा मेळ साधायचा, स्थानिक समुदायांना कशा प्रकारे रोजगार निर्मितीत सहभागी करायचे याचे सक्षम प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे.महाराष्ट्रातील काही नामांकित संस्थांनी लोककला, वारसा व्यवस्थापन, क्राफ्ट-डिझाइन, डिजिटल आर्टस् आणि मीडिया प्रॉडक्शनच्या माध्यमातून या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत; परंतु राज्यभर एकसंध धोरण, वित्तीय प्रोत्साहन, संस्थात्मक सहकार्य आणि ग्रामीण-शहरी जोडणीचा बळकट पूल उभारणे आता अत्यावश्यक बनले आहे.
 
सांस्कृतिक उद्योजकतेचे खरे सामर्थ्य हे केवळ रोजगार निर्मितीत नसून सांस्कृतिक स्वाभिमानाच्या पुनर्निर्मितीत आहे. जागतिकीकरणामुळे विविध परंपरांचे मिश्रण झाले असले तरीही स्थानिक ओळख एका प्रदेशाला त्याची वैशिष्ट्यपूर्ण उंची देते. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत नव्या पिढीसाठी प्रेरणा दडलेली आहे. लावणीचे सौंदर्य, पोवाड्याची ऊर्जा, वर्धा-कोल्हापूर-सातारा या पट्ट्यातील हस्तकलेचे कौशल्य, वारकरी परंपरेतील एकात्मतेचा संदेश, पुणे-मुंबईतील नाट्य-सांस्कृतिक चळवळींची प्रगल्भता या सर्व गोष्टींचे ज्ञानव्यवस्थेत रूपांतर म्हणजे सांस्कृतिक उद्योजकतेचे उद्युक्त करणारे बीज आहे.
 
आज महाराष्ट्राला तंत्रज्ञानाचे दालन जसे खुलते आहे, तसेच कलेचे उद्योगीकरण आणि वारशाचे आधुनिकीकरण करणारा ठोस विकासमार्ग तयार झाला पाहिजे. विद्यापीठे, उद्योग, स्थानिक समुदाय, प्रवासी मराठी, कलावंत आणि तज्ज्ञ यांच्या संयुक्त नेतृत्वातून हे शक्य आहे. म्हणूनच, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सांस्कृतिक उद्योजकता हे फक्त एक शैक्षणिक क्षेत्र नाही, तर राज्याच्या सामाजिक आत्मविश्‍वासाचा, आर्थिक सक्षमीकरणाचा आणि सांस्कृतिक ओळखीचा आधारस्तंभ ठरू शकते.

Related Articles