महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर   

२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची आज अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला राज्य निडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे, सचिव सुरेश काकाने, उपसचिव सुर्यकृष्ण मूर्ती, उपायुक्त राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींचा कार्यक्रम जाहीर केला. या सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला मतमोजनी होणार आहे
 
"नगर परिषद आणि नगर पंचायत यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर करत आहोत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात ही १० नोव्हेंबर २०२५ पासून होईल. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ही १७ नोव्हेंबर २०२५ असेल. नामनिर्देशन पत्राची १८ नोव्हेंबर २०२५ ला छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची मुदत ही २१ नोव्हेंबर २०२५ असेल. अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५ असेल", अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.
 
"निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ही २६ डिसेंबर २०२५ ला जाहीर होईल. मतदानाचा दिवस हा २ डिसेंबर २०२५ असेल आणि मतमोजणीचा दिवस ३ डिसेंबर २०२५ असेल. शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस हा १० डिसेंबर २०२५ असेल", अशी महत्त्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.
 
निवडणूक आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
 
सर्वाच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या मार्फत हा संदेश पोहोचवण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ही पत्रकार परिषद फक्त नगर परिषद आणि नगर पंचायती संदर्भात आहे. राज्यातील पात्र असलेल्या २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण ८६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. २४६ नगर परिषदांमध्ये १० नवनिर्वाचित नगरपरिषदांचा समावेश आहे. २३६ नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.
 
राज्यात एकूण १४७ नगरपंचायती आहेत. त्यापैकी ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये १५ नवनिर्वाचित आहे. तर २७ नगरपंतायतींची मुदत यापूर्वी संपलेली आहे. उर्वरित १०५ नगरपंतायतींची मुदत समाप्त झालेली नाही.
 
नगर परिषदांची सदस्य संख्या ही २० ते ७५ आहे आणि नगर पंचायतची सदस्य संख्या ही १७ आहे. नगर परिषदेची निवडणूक ही बहुसदस्य पद्धतीने आहे. साधारण एका प्रभागामध्ये दोन जागा नगर परिषदेमध्ये असतात. पण नगर परिषदेचा सदस्य संख्या विषम असेल तर एका प्रभागात तीन जागा असतात. साधारणत: मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान करावे लागेल. याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष राहील त्याच्यासाठी देखील मतदान करावं लागेल.
 
नगर पंचायतीमध्ये एक सदस्य आणि एक अध्यक्ष असतो. त्यामुळे तिथे मतदारांना २ मते द्यावी लागतील.
 
नामनिर्देशन हे निवडणूक आयोगाने निर्माण केलेल्या संकेतस्थळावर स्वीकारले जातील. एका प्रभागामागे एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. यासोबत जात वैधता प्रमाणपत्र आवश्यकता आहे. ज्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती जमा करावी लागील. पण असा उमेदवार निवडून आला तर त्याला निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. मतदान केंद्र निहाय मतदान याद्या ७ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
 
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. अ वर्ग नगर परिषदेसाठी सदस्य पदासाठी ५ लाख आणि अध्यक्ष पदासाठी १५ लाख, ब वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी ११ लाख २५ हजार आणि सदस्य पदासाठी ३ लाख ५० हजार, क वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी ७ लाख ५० हजार आणि सदस्य पदासाठी २ लाख ५० हजार. नगरपंचायतीसाठी अध्यक्ष पदासाठी ६ लाख आणि सदस्य पदासाठी २ लाख २५ हजार अशी खर्चाची मर्यादा आहे.
 
मतदारांसाठी जे संकेतस्थळ विकसित केली आहे त्यामध्ये शोधण्याची सुविधा दिली आहे. त्यामध्ये मतादारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल. मतदारांसाठी मोबाईल ऍप तयार केले आहे. त्यामध्ये तुमच्या उमेदवारांविषयी आणि इतर सर्व माहिती मिळेल.

Related Articles