शहरात खड्डेमुक्त मोहीम   

पुणे : शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्यासाठी अखेर महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी पथ विभागाच्या तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या अभियंत्यांची पथके तयार करण्यात आली असून ही पथके खड्ड्यांचा शोध घेऊन ते बुजवून घेणार आहेत. या अभियानाचा प्रारंभ सोमवारी आयुक्तांच्या हस्ते झाला. सारसबाग येथील सणस मैदानासमोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरील खराब रस्ता खरवडून (मिलिंग) आणि तेथे डांबर वापरून खड्डे बुजवून या अभियानाचा प्रारंभ झाला. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथविभाग प्रमुख अनिरूद्ध पावसकर आदी उपस्थित होते.
 
पोलिसांसाठी सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी मध्यवर्ती भागासह उपनगरातील रस्त्यांची आणि पदपथांमध्ये खोदाई करण्यात आलेली असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते व फुटपाथ अत्यंत खराब स्थितीत आहेत.यामुळे नागरिकांमध्ये खराब नादुरुस्त रस्त्यांमुळे आणि फुटपाथ मुळे प्रचंड असंतोष पसरलेला आहे. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून पुढील काळामध्ये शहरातील रस्ते खड्डे मुक्त करण्याचा संकल्प पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेला असून त्याची सुरुवात आज करण्यात आली. आजच्या सुरुवातीनंतर शहरातील सर्व भागामधील रस्त्यांवरील खड्डे मुक्त अभियानांतर्गत रस्त्याबद्दल खड्डे बुजवण्याची प्रक्रिया या महिना अखेरपर्यंत सुरू राहणार असून या कामी ना नफा न तोटा या तत्त्वावर काही ठेकेदार यांनी या कामी महापालिकेत सहाय्य करण्याची तयारी दर्शवली असून त्यानुसार त्यांचे सहाय्य घेऊन सदर  कामास सुरुवात झालेली आहे.
 
‘पहिल्या टप्प्यात शहराच्या जुन्या हद्दीत हे अभियान राबवले जाईल. यासाठी पथ विभागाचे अभियंते आणि क्षेत्रीय कार्यालयाचे अभियंते यांची पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्यासोबत ठेकेदाराचे कर्मचारी असतील. नेमून दिलेल्या हद्दीत ही पथके फिरून स्वत:हून खड्ड्यांचा शोध घेतील आणि योग्य पद्धतीने हे खड्डे बुजवतील. महिनाभर हे अभियान राबवले जाईल,’ असे पथविभाग प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले. हे अभियान महापालिकेच्या पथ विभागाच्या काही ठेकेदारांच्या सहकार्याने राबवले जाणार आहे. ते ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या अभियानात सहभागी होणार आहेत, असेही पावसकर यांनी स्पष्ट केले.

Related Articles