प्रमुख पाच रस्त्यांवर लवकरच ’पे अ‍ॅण्ड पार्क’   

पुणे : शहरातील अत्यंत वर्दळीच्या पाच रस्त्यांवर लवकरच पे अ‍ॅण्ड पार्क योजना राबविण्यात येणार आहे. वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाने यासंदर्भातील आराखडा तयार केला असून लवकरच याची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प विभागाचे अशिक्षक अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली.
 
यामध्ये लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन आणि जंंगली महाराज रस्ता, विमाननगर, बाणेर येथील हायस्ट्रिट आणि बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्त्यावर हे ’पे अ‍ॅण्ड पार्क’ करण्यात येणार आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिस संयुक्तरित्या प्रयत्न करत आहेत. शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासोबतच वर्दळीच्या रस्त्यांवर बेशिस्तपणे उभे राहाणार्‍या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ’पे अ‍ॅण्ड पार्क योजना’ राबविण्यात येणार आहे. महापालिकेचे सभागृह अस्तित्वात असतानाच सुमारे सात वर्षांपुर्वी यासंदर्भातील ठराव लोकप्रतिनिधींनी सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे.
 
दरम्यान, दुचाकींसाठी प्रत्येक तासाला चार रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी तासाला २० रुपये दर असेल. वरील पाचही रस्त्यांपैकी लक्ष्मी रस्त्यावर केवळ दुचाकींसाठी ’पे अ‍ॅण्ड पार्क’ करण्यात येणार आहे. रस्ता अरुंद आणि एकेरी असल्याने या रस्त्याला जोडणार्‍या काही अंतर्गत रस्त्यांवरही पे अ‍ॅण्ड पार्कचे नियोजन करण्यात आले आहे. तर उर्वरीत रस्त्यांवर ठराविक अंतराने पे अ‍ॅण्ड पार्कची व्यवस्था करण्यात येईल. यासाठी येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. पे अ‍ॅण्ड पार्कच्या ठिकाणी सीसीटीव्हींचा वॉच ठेवण्यासोबतच स्ट्रीट फर्निचरही करण्यात येणार असल्याचे दिनकर गोजारे यांनी नमूद केले.  

Related Articles