हास्याचा ‘इंद्रवदन’ शांत झाला   

शुभांगी लाटकर, (प्रसिध्द अभिनेत्री)

चित्रसृष्टी आणि छोटा पडदा आपल्या विनोदी भूमिकांनी गाजवणारे, सहजसुंदर अभिनय आणि अचूक टायमिंगसाठी ओळखले जाणारे सतीश शहा यांच्या ‘एक्झिट’ने अवघे मनोरंजन विश्व आणि रसिक हळहळले. त्यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय टप्पे, अप्रतिम अदाकारी, मागे उरलेल्या धमाल व्यक्तिरेखा याचा आढावा घेताना मात्र हा माणूस जणू जिवंत होऊन समोर येतो. हास्याचा ‘इंद्रवदन’च जणू तो. 
 
सतीश शहा हे नाव उच्चारले की त्यांच्या अनेकविध व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर येतात आणि आपल्या चेहर्‍यावर आपोआप हास्य फुलते. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’मधील ‘इंद्रवदन साराभाई’ असो किंवा ‘जाने भी दो यारों’मधील कमिशनर डी’मेलो’ असो, सतीश शहा यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या ओठांवर हसू आणते. त्यांचा विनोदी अभिनय हा फक्त मनोरंजन न राहता, तो जीवनाकडे पाहण्याचा एक निर्भेळ आणि निरागस दृष्टिकोन देतो. सतीश शहा यांचा जन्म २५ जून १९५१ रोजी मुंबईत  झाला. त्यांचे वडील व्यावसायिक होते. शालेय जीवनात सतीश यांना अभिनयापेक्षा खेळाची अधिक आवड होती, पण नशीबाने त्यांना कलेच्या प्रांगणात आणले. एकदा शाळेच्या नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यावर त्यांना अभिनयाची गोडी लागली. पुढे त्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले.
 
एफटीआयआयमधून बाहेर पडल्यावर त्यांनी सुरुवातीला नाटकांमध्ये काम करत रंगभूमीवर आपला पाया मजबूत केला. रंगभूमीवरील हा अनुभवच त्यांच्या अभिनयातील शिस्त आणि अचूकतेचा आधारस्तंभ ठरला. १९७० च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८), गमन (१९७९) आणि उमराव जान (१९८१) अशा चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका साकारल्या, पण त्यांना खरी ओळख मिळाली ती १९८३ मध्ये आलेल्या ‘जाने भी दो यारों’ या आता  ‘कल्ट क्लासिक’ ठरलेल्या चित्रपटातून. या चित्रपटातील ‘डेड बॉडी’ची भूमिका साकारणार्‍या कमिश्नर डी’मेलो या भूमिकेमुळे ते विनोदी अभिनेता म्हणून  प्रस्थापित झाले. 
 
सतीश शहा यांच्या अभिनयाची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचे कॉमिक टायमिंग. विनोदी भूमिका करणे सर्वात कठीण मानले जाते, कारण प्रेक्षकांना हसवणे हे खूप मोठे आव्हान असते. सतीश शहा यांनी या कठीण कामात आणलेली सहजता अभिनयाच्या गाढ अभ्यासातून आली होती. त्यांच्या विनोदाची शैली कधीही ओढून-ताणून केलेली नसायची. त्यांचे टायमिंग, चेहर्‍यावरील भाव, संवादफेक हे सगळे सहज आणि नैसर्गिक असायचे. त्यांचा विनोद हा संवादात नसून, संवादानंतर दिलेल्या ‘नॅचरल रिअ‍ॅक्शन’मध्ये अधिक असायचा. विनोदी संवादांमध्ये अचूक पॉज (विराम) कधी घ्यायचा आणि अभिनयाचा पेस (गती) कधी वाढवायचा, याचे त्यांचे ज्ञान इतके उत्कृष्ट होते की तो सीन अधिक प्रभावी बनत असे. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’मध्ये इंद्रवदनची खुर्चीवर बसण्याची किंवा समोरच्या व्यक्तीला निरखण्याची पद्धत असो, त्यांची देहबोली विनोदासाठी किती परिणामकारक होती हे दाखवते. सतीश शहा यांच्या कारकिर्दीतील एक अविस्मरणीय टप्पा म्हणजे १९८४ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेली ‘ये जो है जिंदगी’ ही मालिका. या मालिकेने त्यांना घराघरात पोहोचवले. या सिटकॉमच्या केवळ ५५ भागांमध्ये त्यांनी ५५ वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम केला! हा केवळ विक्रम नव्हता, तर अभिनयाचा महायज्ञ होता. हा विक्रम प्रत्येक टेलिव्हिजन कलाकारासाठी अभ्यासपाठ आहे. एकाच कलाकाराने प्रत्येक एपिसोडमध्ये वेगळ्या वेषात, वेगळ्या बोलीभाषेत आणि वेगळ्या स्वभावात प्रेक्षकांसमोर येणे, हे केवळ त्यांच्या अफाट प्रतिभेमुळेच शक्य झाले. ही भूमिका त्यांच्या बहुआयामी अभिनयशैलीचे उत्तम उदाहरण ठरली. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेने सतीश शहा यांना नवी ओळख दिली. माया साराभाईचा नवरा आणि ‘मिडल क्लास’ सून मोनिशाला सतत टोमणे मारणारा ‘इंद्रवदन साराभाई’ ही भूमिका त्यांनी अजरामर केली. इंद्रवदनचे हे पात्र केवळ विनोदी नव्हते, तर त्यात एक वडील, एक पती आणि एक सासरा म्हणून असणारे भावनात्मक कंगोरेही होते. त्यातील कोट्या आणि टोमणे हे सतीश शहा यांच्या वैशिष्ट्यपूर्ण देहबोलीमुळे आणि अचूक उच्चारामुळे अधिक प्रभावी ठरले.सतीश शहा यांचा जन्म मुंबईत झाला असल्याने त्यांची मराठी चित्रसृष्टीशीही घट्ट नाळ होती. त्यांना उत्तम मराठी बोलता येत होते आणि त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही काम केले. ‘गंमत जंमत’ (१९८७) मध्ये साकारलेली विनोदी पोलिसाची म्हणजेच ‘इन्स्पेक्टर फुटाणे’ ही भूमिका आजही 
 
प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच, त्यांनी वाजवा रे वाजवा (२००८) सारख्या मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. रंगभूमीवर चुकांना माफी नसते. यामुळे त्यांची अभिनयातील शिस्त आणि अचूक टायमिंग लख्ख होत गेले. नाट्यगृहामध्ये आवाज दूरपर्यंत पोहोचवावा लागतो, त्यामुळे त्यांची संवादफेक आणि उच्चार अधिक स्पष्ट आणि प्रभावी झाले, जे त्यांच्या पडद्यावरील अभिनयातही दिसून आले. सतीश शहा यांनी ५० वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत दोनशेहून अधिक चित्रपट आणि अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’, ‘जुडवा’ आणि ‘ओम शांती ओम’सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या पण लक्षात राहणार्‍या भूमिका केल्या. सतीश शहा हे भावी पिढीतील कलाकारांसाठी एक विनोदी अभिनयाचे विद्यापीठ आहेत. त्यांनी शिकवलेले धडे अमूल्य आहेत.सतीश शहा यांच्यासारख्या श्रेष्ठ विनोदी अभिनेत्याची एक्झिट खूपच दुःखद आहे. त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले की, पडद्यावरची छोटी भूमिकाही केवळ अभिनयाच्या बळावर अमर होऊ शकते. सतीश शहा यांनी हसवत-हसवत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले, जे कायम तसेच राहील. 

प्रेरणास्रोत ठरलेला अभिनेता 

सतीश शहा यांच्याप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘हुकमी मनोरंजन’ म्हणून ओळखले जाणारे गोवर्धन असरानी! त्यांचे निधनही भारतीय विनोदविश्वासाठी एक मोठा धक्का होता. असरानी हे नाव उच्चारले की डोळ्यासमोर येतो तो ‘शोले’मधला ‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं’ हा अजरामर संवाद आणि त्यांच्या चेहर्‍यावरचे निरागस हास्य. असरानीजींनी आपल्या कारकिर्दीत केवळ विनोदी भूमिकाच नाही, तर चरित्र आणि नकारात्मक भूमिकाही साकारल्या. छोटी सी बात, चुपके चुपके, बावर्ची, नमक हराम अशा शेकडो चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांच्या अभिनयात एक खास ‘भोळेपणा’ आणि अतिशय सहजता होती. त्यांचे टायमिंग, संवादांची खास शैली  त्यांनी निर्माण केलेला आनंद आणि हास्य अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत राहील. 
 

Related Articles