जोडगोळीचा प्रभाव दिसला   

मिडविकेट : कौस्तुभ चाटे 

ऑस्ट्रेलिया विरुद्धची एक दिवसांच्या ३  सामन्यांची मालिका गेल्याच आठवड्यात संपली. ऑस्ट्रेलियन संघाने या मालिकेत २-१ असा विजय मिळवला हे खरे, पण त्याहीपेक्षा रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडगोळी या मालिकेत कशी कामगिरी करते याकडेच सर्वांचे लक्ष होते. गेल्या वर्षी या दोघांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, आणि काही महिन्यांपूर्वी त्यांनी कसोटी क्रिकेटला देखील अलविदा केलं. त्यामुळे क्रिकेटच्या या तिसर्‍या फॉरमॅटमध्ये ते कसे खेळतात हे बघणे निश्चितच महत्वाचे होते. कदाचित हे दोघेही ऑस्ट्रेलियामध्ये शेवटची मालिका खेळतील ही शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे त्या दृष्टीने देखील क्रिकेट रसिक त्यांच्या कामगिरी कडे लक्ष ठेवून होते. 
 
भारतीय क्रिकेटच्या गेल्या दशकातील दोन सर्वोत्तम खेळाडू, ज्यांनी भारतीय क्रिकेट सर्वच फॉरमॅट्स मध्ये गाजवलं असे दोघे नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात कसे खेळतील, ते संघाला साथ देतील का, क्रिकेटच्या दृष्टीने तसे ’ज्येष्ठ’झालेले दोघेही हा फॉरमॅट नीट खेळतील का, त्यांचा फिटनेस साथ देईल असे एक ना अनेक प्रश्न क्रिकेट रसिकांना भेडसावत होते. एकदिवसाच्या  क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा  आता  दीड वर्षावर येऊन ठेपली आहे, त्यामुळे त्या दृष्टीने संघ बांधणी करत असताना या दोघांचे संघात स्थान असेल का हा सर्वात महत्वाचा प्रश्न या निमित्ताने विचारला जात होता.  क्रिकेटचा खेळ आता सर्वार्थाने प्रायोजक आणि माध्यमांच्या हाती गेला आहे यात शंका नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर या मालिकेचे प्रक्षेपण करणार्‍या वाहिनीचे देता येईल. त्यांनी या मालिकेची जाहिरात करत असताना देखील इतर कशाहीपेक्षा ’रो-को’ जोडीवरच भर दिला होता. म्हणजे प्रायोजक आणि माध्यमांचे देखील या जोडीच्या खेळाकडे लक्ष होते. आणि त्यामुळेच ही मालिका ’रो-को’ जोडीसाठी सर्वात महत्वाची होती हे नक्की. 
 
ही तशी छोटेखानी मालिका भारतीय संघाचा कस बघणारी असणार हे नक्की होते. ऑस्ट्रेलिया सारखा तगडा प्रतिस्पर्धी, त्यातही त्यांच्या देशात एकदिवसाचे सामने खेळायचे हे तसे नक्कीच स्पर्धात्मक असणार होते. पण शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील हा संघ कसा खेळतो हे बघणे महत्त्वाचे असणार होते. संघात रोहित आणि कोहली तर होतेच, पण राहुल, श्रेयस अय्यर सारखे एकदिवसाच्या क्रिकेटला साजेसे फलंदाज होते, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल सारखे अष्टपैलू देखील होते. गोलंदाजीची धुरा सिराज, अर्शदीप, कुलदीप, प्रसिद्ध आणि हर्षित राणा या तरुण खेळाडूंवर होती. सध्याच्या आपल्या क्रिकेट संघाला कोणत्याही प्रकारची विश्रांती न देता अव्याहतपणे खेळायला लावणे हे बहुतेक आपल्या क्रिकेट मंडळाचे उद्दिष्ट असावे असे वाटत आहे. जून-जुलै मध्ये इंग्लंडचा खडतर दौरा, पाठोपाठ आशिया कप स्पर्धा, त्यानंतर लगेचच वेस्टइंडीज विरुद्ध कसोटी सामने आणि लगेचच हा ऑस्ट्रेलिया दौरा. (हा झाला की पुढे लगेच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आहेच.) क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्स मध्ये आपले खेळाडू सतत खेळत आहेत. त्यांना विश्रांती नावाचा प्रकार नाहीच. खरे तर आज आपण या तीनही फॉरमॅट्स मध्ये तीन वेगळे संघ खेळवू शकतो इतके खेळाडू आपल्याकडे खेळत आहेत. पण आपल्या बोर्डाला काही ठराविक खेळाडूंनी प्रत्येक संघात खेळणे आवश्यक वाटते. आता ही गरज बोर्डाची आहे की प्रयोजकांची याची कल्पना नाही, पण काही ठराविक खेळाडू आपल्याकडे प्रत्येक मालिका, प्रत्येक सामना खेळताना दिसतात. 
 
असो, मालिकेतला पहिला सामना पावसामुळे कमी षटकांचा झाला. २६ षटकांच्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त १३६ धावा केल्या. अक्षर पटेल आणि के एल राहुल यांचा अपवाद वगळता एकही खेळाडू वीस धावा देखील करू शकला नाही. अर्थातच ऑस्ट्रेलियासाठी हे आव्हान अगदीच सोपे होते, जे त्यांनी केवळ २१ षटकांमध्ये पूर्ण केले. दुसर्‍या सामन्यात आपण थोडी बरी कामगिरी केली. ५० षटकांमध्ये २६४ धावा करून आपण ऑस्ट्रेलियन संघाला थोडेतरी आव्हान दिले. पण ऑस्ट्रेलियाने या सामन्यात देखील प्रभावी खेळ करताना आपल्याला २ गडी राखून हरवले. या सामन्यात आपल्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा देखील फटका बसला.
 
तिसर्‍या सामन्यात मात्र भारतीय संघाने चांगला विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत असताना सर्वबाद २३६ धावा केल्या होत्या, आणि भारतीय फलंदाजांनी केवळ एका गड्याच्या मोबदल्यात आणि ३९ षटकांमध्येच विजय साकारला. हा विजय नक्कीच सुखावणारा होता. ’रो-को’ जोडीचा विचार करता, पहिल्या सामन्यात दोघेही सपशेल अपयशी ठरले, दुसर्‍या सामन्यात रोहितने प्रभावी खेळ केला पण विराट पहिल्या सामन्याप्रमाणेच परत एकदा शून्यावर बाद झाला तर तिसरा सामना मात्र या जोडीचा ठरला. शुभमन गिल बाद झाल्यानंतर त्यांनी खेळाची सूत्रे आपल्या हातात घेत, तुफान फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. रोहितने या सामन्यात दर्जेदार शतक झळकावले तर विराटने देखील आपला खेळ उंचावत अर्धशतकी खेळी केली. 
 
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही जवळजवळ १२-१५ वर्षे भारतीय क्रिकेट गाजवले आहे. हे दोघेही मोठे खेळाडू आहेत यात शंका नाही. या मालिकेमध्ये ते दोघेही अनेक महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होते. पहिल्या सामन्यात दोघेही अपयशी ठरले. रोहितने ८ धावा केल्या तर विराट भोपळा देखील फोडू शकला नाही. यावेळी अनेक क्रिकेट पंडितांनी त्यांच्या खेळावर मनसोक्त टीका केली. त्यांचा खेळ संपल्याच्या चर्चा होऊ लागल्या. दुसर्‍या सामन्यात विराट पुन्हा एकदा अपयशी ठरला. या सामन्यात देखील तो शून्यावर परतला आणि सर्वच पंडितांनी पुन्हा एकदा त्याच्या खेळावर आसूड ओढले. दोन्ही सामन्यांमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर तो बाद झाला आणि ’विराट संपला’ ही आरोळी पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागली. 
 
पण तिसर्‍या सामन्यात मात्र त्याने अत्यंत जबाबदारीने खेळ केला. सिडनीच्या मैदानावर भारतीय फलंदाजी बहरते हा इतिहास आहे. यावेळी देखील विराटने संयमाने खेळ करत ७४ धावा केल्या. विशेष म्हणजे या खेळीत एकही षटकार नव्हता. केवळ ७ चौकारांच्या साहाय्याने त्याने या धावा जमवल्या. दुसरीकडे पहिला सामना अपयशी ठरल्यानंतर रोहितने दुसर्‍या सामन्यापासून आपला खेळ उंचावला. दुसर्‍या सामन्यात त्याने चांगले अर्धशतक झळकावले तर तिसर्‍या सामन्यात आपल्याला तो ’व्हिंटेज’ रोहित पुन्हा एकदा बघायला मिळाला. मैदानावर चोहोकडे अप्रतिम फटकेबाजी करत त्याने क्रिकेट रसिकांना खुश केले. साधारण १०० च्या सरासरीने त्याने १२१ धावा करताना १३ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली. हे शतक रोहितसाठी नक्कीच खास असेल.
 
रोहित आणि विराट हे दोघेही मोठे खेळाडू आहेत. क्रिकेट रसिक दोघांकडूनही कायमच चांगल्या खेळाची अपेक्षा करतात. अर्थातच यामध्ये गैर काहीच नाही. पण शेवटी हा खेळ आहे. खेळाडू एखाद्या सामन्यात चांगला खेळू शकला नाही, धावा जमवू शकला नाही तरी क्रिकेट रसिकांनी आपला संयम कायम ठेवणे आवश्यक आहे. पहिल्या दोन सामन्यांत विराटने धावा केल्या नाहीत तर ’तो संपला’ अशी घोषणा करून आपण मोकळे झालो. पण हाच विराट मैदानात जे चैतन्य निर्माण करतो त्याची मोजदाद आपण कुठे करतो? हाच विराट क्षेत्ररक्षण करत असताना २५-३० धावा अडवतो, २-३ चांगले झेल घेतो त्याची गणना आपण कुठे करतो? मोठ्या खेळाडूचा मैदानावरील ’ऑरा’ वेगळा असतो आणि त्याची नोंद कोणत्याही धावफलकात होत नसते. विराट काय किंवा रोहित काय, दोघांमध्येही चांगल्या दर्जाचे क्रिकेट अजूनही शिल्लक आहे. आता गरज आहे ते म्हणजे त्यांना पुरवून पुरवून खेळवण्याची. अजून काही महिन्यांनी असलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी ते दोघेही संघात असणे भारतीय क्रिकेटसाठी महत्वाचे असेल. तो विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत आहे. त्यामुळे त्या खेळपट्ट्यांवर दोघांचा अनुभव नक्कीच महत्वाचा असेल. संघाचे नेतृत्व शुभमन सारख्या तरुण खेळाडूकडे असले तरीही ही रो-को ची जोडगोळी अजूनही भारतीय क्रिकेटमध्ये कार्यरत असणार आहे, आणि त्यांच्या अनुभवाचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे.  
 

Related Articles