इंग्रजांची व्यापार बुद्धी   

अरिफ शेख 

एके काळी भारत ब्रिटिशांच्या राज्याचा भाग होता. आज हाच ब्रिटन भारतातून गुंतवणूक मिळवून त्याद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रात किती नोकर्‍या निर्माण होतील हे आपल्या देशात जाहीर करत आहे. ताज्या भारत-ब्रिटन करारात ब्रिटनचा फायदा जास्त असल्याचे जाणवते. 
 
इंग्लंड किंवा  ब्रिटनचे पंतप्रधान केर  स्टार्मर १२६ जणांचे एक मोठे शिष्टमंडळ घेऊन भारतात आले होते. स्टार्मर या भेटीला वर्षातील सर्वात मोठे व्यापार अभियान म्हणत आहेत आणि भारतासोबत व्यापार वाढवण्याबाबत त्यांना मोठ्या आशा आहेत. त्यांचा विश्वास आहे, की जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासोबत व्यापार वाढवून ब्रिटनदेखील आपल्या अर्थव्यवस्थेला आधार देऊ शकते. एप्रिल-जून तिमाहीमध्ये ७.८ टक्के हा भारताचा जीडीपीवाढीचा दर कोणत्याही पाश्चात्य देशाच्या तुलनेत मोठा दिसतो. ब्रिटनचा आर्थिक  विकास  दर ०.३ टक्के आहे. अर्थात त्यांचा दर डोई ‘जीडीपी’५२ हजार ६३६ डॉलर्स आहे तर भारताचा दर डोई जीडीपी केवळ २६९६.६६ डॉलर्स  आहे हा भाग वेगळा.
 
ब्रिटिश पंतप्रधान केर  स्टार्मर  यांची ही भारत  भेट औपचारिक होतीच, पण भविष्याचा आराखडा तयार करण्याची संधीही होती.  भारतासाठी देखील  ही भेट  राजनैतिकच नाही, तर धोरणात्मक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची होती. भारताला विकासासाठी तांत्रिक कौशल्य, आर्थिक संसाधने आणि जागतिक अनुभव असलेल्या भागीदारांची आवश्यकता आहे. ब्रिटन जागतिक राजकारणात आणि वित्तीय व्यवस्थेत एक महत्त्वाचा खेळाडू आहे. आपण ‘व्हिजन २०३५’ बद्दल बोलतो, तेव्हा ते केवळ आर्थिक प्रगतीचाच संदर्भ देत नाही, तर समग्र विकासाचादेखील संदर्भ देते. तांत्रिक नवोपक्रम, शिक्षणाचा विस्तार, आरोग्यसेवा मजबूत करणे, हरित ऊर्जेकडे संक्रमण आणि जागतिक सुरक्षेत योगदान देणे या सर्व क्षेत्रांमध्ये भारत आणि ब्रिटनमध्ये सहकार्याची प्रचंड क्षमता आहे. व्यापार संबंध या भागीदारीचा प्रमुख आधारस्तंभ बनले आहेत. अलिकडेच झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध एका नवीन पातळीवर पोहोचले आहेत. ‘व्हिजन २०३५’ अंतर्गत हा करार दोन्ही अर्थव्यवस्थांचा पाया रचेल. यामुळे केवळ वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण वाढणार नाही, तर स्टार्टअप्स, फिनटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रात सहकार्याचा विस्तार होईल. भारताचे डिजिटल क्रांतीचे स्वप्न आणि ब्रिटनची तांत्रिक कौशल्य एकत्रितपणे एक नवीन अध्याय निर्माण करेल. या संबंधांची सर्वात मोठी ताकद म्हणजे ब्रिटनमधला भारतीय समाज. आज भारतीय वंशाच्या वीस लाखांहून अधिक व्यक्ती ब्रिटनमध्ये राहतात. राजकारणापासून व्यवसायापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, भारतीय वंशाचे लोक ब्रिटनच्या संस्कृतीत खोलवर रुजले आहेत. त्यांची उपस्थिती दोन्ही देशांमधील एक नैसर्गिक पूल म्हणून काम करते.  भारत त्याच्या तरुणाईने प्रेरित होऊन, जागतिक नेतृत्वाकडे वाढचाल करत असताना, ब्रिटनमधील भारतीय समुदाय ही प्रक्रिया आणखी मजबूत करेल. तथापि, हे सर्व वाटते तितके सोपे नाही. 
 
भारत आणि ब्रिटनमधील संबंधांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. ‘ब्रेक्झिट’नंतर ब्रिटनची आर्थिक अनिश्चितता भारताचे अंतर्गत धोरणात्मक अडथळे आणि जागतिक सत्तेच्या संतुलनात बदल हे सर्व घटक त्यांच्या भागीदारीच्या गतीवर परिणाम करू शकतात. भारतात ब्रिटनची गुंतवणूक केवळ आर्थिक फायद्यासाठीच नाही, तर त्याच्या जागतिक प्रासंगिकतेसाठीही आवश्यक आहे. ‘ब्रेक्झिट’नंतर युरोपीय महासंघापासून ब्रिटनचे वेगळे होणे त्याला नवीन भागीदार शोधण्यास भाग पाडत आहे. भारताची मोठी लोकसंख्या, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था  बघता ब्रिटनसाठी एक नैसर्गिक निवड आहे. भारतासाठी ब्रिटन हा एक भागीदार आहे, ज्याद्वारे तो केवळ युरोपच नाही, तर संपूर्ण अटलांटिक जगात प्रवेश करू शकतो.  ब्रिटनसोबत भारताच्या संरक्षण आणि व्यावसायिक संबंधांमध्ये नवीन सुरुवात आशादायक आहे. दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार कराराचा निष्कर्ष दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर मानला जात आहे.स्टार्मर  यांच्या पहिल्या अधिकृत भारत दौर्‍याचे भारत आणि ब्रिटनमधील संबंधांमध्ये नवीन बदलाचे प्रतीक म्हणून वर्णन केले गेले.. या भेटीदरम्यान ४६८ दशलक्ष डॉलर्सचा क्षेपणास्त्र करार, मुक्त व्यापार कराराची लवकर अंमलबजावणी करण्याची वचनबद्धता आणि भारतात नऊ ब्रिटिश विद्यापीठांची केंद्रे  स्थापन करण्याचा करार यांचा समावेश आहे. 
  
स्टार्मर यांनी मुंबईसही भेट दिली. हिंदी चित्रपट उद्योगा बरोबर संयुक्त चित्रपट निर्मितीची ब्रिटनची योजना आहे. त्यांच्या भेटीच्या काळात झालेल्या करारांनुसार भारतीय  कंपन्या व गुंतवणूकदार ब्रिटनमध्ये नजीकच्या  भविष्यकाळात सुमारे १ अब्ज पौंडांची गुंतवणूक करणार आहेत.त्यातून ब्रिटनमध्ये किमान  ७ हजार नवे रोजगार निर्माण होती.तथापि, मुक्त व्यापारकराराचे मूल्यमापन त्याच्या प्रतीकात्मक मूल्यापेक्षा वास्तविक आर्थिक परिणामाच्या आधारावर केले पाहिजे. मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीमुळे भारताची कापड, औषधनिर्माण आणि सेवा, विशेषतः आयटी आणि फिनटेक, ब्रिटिश बाजारपेठेत निर्यात वाढू शकते. पण  मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीबाबत काही चिंतादेखील आहेत. उदाहरणार्थ, स्वस्त ब्रिटिश आयातीमुळे किंवा नियामक अडथळ्यांना तोंड दिल्याने भारताला अडचणी येण्याची भीती वाटते.मुक्त व्यापार करार ब्रिटनला एक फायदेशीर वाढीची संधी आणि स्थिर अर्थव्यवस्थेसह एक मजबूत भागीदार मिळवून देते  यात शंका नाही. तथापि, मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीमध्ये भारतीय हितांचे रक्षण करण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भारता बरोबर  मुक्त व्यापार करार  केलेला असला तरी स्टार्मर यांनी भारतीयांसाठी  व्हिसाच्या नियमांत शिथिलता देण्यास नकार दिला आहे.हा करार व्यापार केंद्रित आहे, स्थलांतरास प्रोत्साहन देणासाठी तो नाही असे ते म्हणाले आहेत.     

Related Articles