मायक्रोप्लास्टिक्सचा वाढता धोका   

मिलिंद बेंडाळे 

आपण नकळत दररोज हजारो मायक्रोप्लास्टिक कण गिळत आहोत. हा अदृश्य शत्रू मेंदूपर्यंत पोहोचला आहे. प्लास्टिकच्या कपमधून दिला जाणारा गरम चहा, प्लास्टिकच्या डब्यातून दिली जाणारा नाश्ता, इतर वेळी होणारा नॉन-स्टिक भांड्याचा वापर ही रोजची निरुपद्रवी वाटणारी प्रत्येक कृती एका नव्या गंभीर संकटाच्या जवळ घेऊन जात आहे. हे संकट आहे शरीरात हळूहळू विषारी थर साचवणार्‍या मायक्रोप्लास्टिक्सचे.
 
मायक्रोप्लास्टिकचे संकट आता प्रत्येकाच्या घरात पोचले आहे.  प्लास्टिकचा इतिहास १९ व्या शतकाच्या मध्यापासूनचा आहे. कोणत्याही शोधाप्रमाणे, विशिष्ट समस्येवर उपाय शोधण्याच्या उद्देशाने कृत्रिम प्लास्टिकची सुरुवात झाली. १९ व्या शतकात प्रामुख्याने कंगवा, बिलियर्ड बॉल, पियानो आणि इतर साहित्य बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कासवाच्या कवचाची आणि हस्तिदंताची उपलब्धता कमी होऊ लागली. १८६२ मध्ये पहिले खरे ‘कृत्रिम प्लास्टिक’- पार्केसाइन- तयार करण्याचे श्रेय अलेक्झांडर पार्केस यांना दिले जाते. ते लवकरच काही उत्पादनांसाठी कासवाच्या कवचाचा आणि हस्तिदंताचा स्वस्त पर्याय बनले.
 
१९०७ मध्ये बेल्जियन रसायनशास्त्रज्ञ लिओ बेकेलँड यांनी बेकलाइट तयार केले, जे सर्व उद्देशांसाठी पहिले कृत्रिम प्लास्टिक होते. त्यानंतर, ‘बीएएसएफ, ड्यूपाँट, इम्पिरिअल केमिकल इंडस्ट्रीज आणि डाऊ केमिकल्ससारख्या प्रमुख अमेरिकन आणि ब्रिटिश कंपन्यांनी संशोधन, उत्पादन विकास आणि विपणनात गुंतवणूक केल्याने विकासाला वेग आला. दुसर्‍या महायुद्धात पॅराशूटपासून रडार केबलिंग, वाहन आणि विमानाच्या चाकांपर्यंत सर्वत्र प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर, प्लास्टिकचा नागरी वापर झपाट्याने वाढला. कपड्यांपासून अन्नाच्या  पॅकेजिंगपर्यंत सर्वत्र नायलॉन, रेयॉन, पॉलिस्टीरिन, पेट आणि टेफ्लॉनचा वापर केला जात होता. प्लास्टिकचा वापर वाढू लागला. आता शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि नागरिकांना हे अप्रिय सत्य लक्षात येत आहे, की प्लास्टिकला इतके उपयुक्त बनवणारे गुणधर्म प्रत्यक्षात पृथ्वीला प्रदूषित करत होते. 
 
प्लास्टिक पूर्णपणे नष्ट करता येत नाही. ते अनेक दशके किंवा शतके कुजत नाही, खराब होत नाही.  टाकून दिलेले प्लास्टिक जमिनीवर आणि महासागरांमध्ये जमा होते. त्यामुळे एक मोठी पर्यावरणीय आपत्ती निर्माण होते. टाकून दिलेल्या प्लास्टिकमुळे पृथ्वीला आणि मानवी जीविताला असलेला धोका आता चांगलाच स्पष्ट झाला आहे; परंतु अद्याप त्यावर  ही समाधानकारक उपाय सापडलेला नाही.  बायोकेमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये संशोधनातून   प्लास्टिकचे सेवन करणारे आणि त्याचे छोट्या घटकांमध्ये विघटन करणारे बॅक्टेरिया वेळोवेळी नोंदवले गेले आहेत; परंतु त्यावर पुढे काम झाले नाही. ‘फोटो ऑक्सिडेशन’सारख्या इतर पद्धती अद्याप व्यापकपणे अंमलात आणल्या गेलेल्या नाहीत. 
 
सरकारी धोरणे सामान्यतः प्लास्टिकचा वापर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात; परंतु बहुतेक देशांमध्ये ती फारशी यशस्वी झालेली नाहीत कारण कृत्रिम प्लास्टिकचे पर्याय सहज उपलब्ध नाहीत किंवा परवडणारे नाहीत. गेल्या दोन दशकांमध्ये, नॅनोप्लास्टिक्सच्या व्यापकतेबद्दल एक नवी चिंता निर्माण झाली आहे. संशोधकांना सूक्ष्म किंवा नॅनोप्लास्टिक्स सर्वत्र आढळून आले. अगदी माती, महासागर, नद्या, जमिनीपासून समुद्रातील सजीव प्राण्यांमध्ये आणि मानवी अवयवांमध्ये. रक्तवाहिन्यांपासून श्वसनसंस्थेपर्यंत, यकृत आणि मेंदूपर्यंत त्याचा लीलया वावर आहे!
 
सुरुवातीच्या अभ्यासात नॅनोप्लास्टिक्स ही दीर्घकालीन जोखीम असल्याचे दिसून आले; परंतु जोखमींचे नेमके स्वरूप आणि व्याप्ती निश्चित होण्यास वेळ लागेल. यासंदर्भात असे काही पुरावे आहेत, जे शरीरात जळजळ निर्माण करू शकतात. एक गृहीतक असे आहे, की विविध अवयवांमधील नॅनोप्लास्टिक रसायनांमुळे कर्करोगासह विविध समस्या उद्भवू शकतात. इतर अभ्यासातून दिसून आले आहे, की रक्ताभिसरण प्रणालीतील नॅनोप्लास्टिक्स हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी धोका वाढवू शकतात. नॅनोप्लास्टिक्सचा संबंध रोग आणि आयुर्मानाशी असला, तरी हे दुवे स्थापित करण्यासाठी पुरेसे संशोधन झालेले नाही.  या क्षेत्रातील संशोधनासाठी पुरेसा निधी आणि अभ्यास आवश्यक आहे. सागरी आणि नदीकाठच्या जीवांवर तसेच वनस्पती आणि प्राण्यांवर होणारा त्यांचा परिणाम याचाही पुढील अभ्यास आवश्यक आहे. दुर्दैवाने, फार थोडे देश या मुद्द्याकडे लक्ष देत आहेत. मायक्रोप्लास्टिक आणि नॅनो प्लास्टिकचे हे अतिसूक्ष्म कण आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत; पण ते सर्वत्र आहेत. पाणी, भाज्या, फळे, मीठ आणि अगदी मुलांच्या दुधातही या प्लास्टिकचा अंश सापडला आहे. मायक्रोप्लास्टिक्स आपल्या पदार्थ बनवण्याच्या सवयींमधून, वापरात असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंमधून आणि पाण्याच्या अयोग्य साठवणुकीतून आपल्या शरीरात प्रवेश करतात. 
 
एका संशोधनात असे समोर आले आहे, की १९९० च्या तुलनेत २०१८ मध्ये माणसाने सेवन केलेल्या प्लास्टिकचे प्रमाण सहापटीने वाढले आहे. हे प्लास्टिक शेतीत पिकांच्या मुळांवाटे, जनावरांच्या खाद्यातून आणि प्रक्रिया केलेल्या अन्नातूनही आपल्यापर्यंत पोहोचते. अन्न जेवढे जास्त प्रक्रिया केलेले असेल, तेवढे त्यात प्लास्टिक मिसळण्याची शक्यता जास्त असते. कारण, कारखान्यांमध्ये जलद आणि प्रभावी उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर केला जातो.या भयानक वास्तवातून बाहेर पडण्यासाठी काही करता येऊ शकते का? नक्कीच! वॉशिंग्टन विद्यापीठातील बालरोग विभागाच्या प्राध्यापक शीला सत्यनारायण यांच्या मते घरात करण्याजोगे असे अनेक सोपे उपाय आहेत, जे आपण लगेचच अमलात आणू शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनावर थोडे तरी नियंत्रण मिळाल्याचे समाधान मिळेल. पाणी हे मायक्रोप्लास्टिकच्या प्रवेशाचे एक मोठे साधन आहे. पाण्याच्या बाटलीचे झाकण प्रत्येक वेळी उघडताना आणि बंद करताना प्रति लिटर ५५३ मायक्रोप्लास्टिक कण तयार होतात. 
 
बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण अपेक्षेपेक्षा किती तरी जास्त असते, हे एका अभ्यासातून समोर आले आहे. नळाच्या पाण्यातही मायक्रोप्लास्टिक्स आढळतात. एका अभ्यासानुसार, ब्रिटनमधील नळाच्या पाण्याच्या १७७ नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे कण आढळून आले. तथापि, नळाचे पाणी सुरक्षित असल्यास चांगल्या फिल्टरचा वापर करून मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत कमी करता येते; पण चहा बनवण्यासाठी प्लास्टिकयुक्त टी-बॅग वापरल्यास पाण्यातील प्लास्टिक कमी करण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरू शकतो, कारण त्यातून अब्जावधी सूक्ष्म कण बाहेर पडतात. प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी किंवा डब्यात ठेवलेले पदार्थ जास्त असुरक्षित असतात. पॅकेज उघडतानाही मायक्रोप्लास्टिकचे कण तयार होतात. एका अभ्यासानुसार, फक्त पॅकेट उघडल्याने प्रति सेंटीमीटर २५० मायक्रोप्लास्टिकचे कण बाहेर पडतात. 
 
जुन्या प्लास्टिकच्या भांड्यांमधून अनेकदा जास्त प्लास्टिक कण बाहेर पडतात, हे मलेशियामधील एका संशोधनातून समोर आले आहे.  चॉपिंग बोर्ड, प्लास्टिकचे चमचे आणि स्पॅच्युला यासारख्या वस्तूंमधून हे कण तयार होतात. चॉपिंग बोर्डवर भाजी चिरल्याने तयार झालेले प्लास्टिकचे कण भाज्यांमध्ये मिसळतात. नॉन-स्टिक भांड्यांमधील कोटिंग खराब झाल्यानेही मायक्रोप्लास्टिकचे कण अन्नात जातात. मायक्रोप्लास्टिकचे हे संकट भीषण असले, तरी त्यावर ‘नियंत्रण’ मिळवणे नक्कीच शक्य आहे. पाणी गाळण्यासाठी उत्तम फिल्टरचा वापर करणे, प्लास्टिकऐवजी काचेची, स्टीलची किंवा मातीची भांडी वापरणे आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळणे, हे साधे उपाय मोठे परिवर्तन घडवू शकतात. 

Related Articles