अत्याचाराला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या, प्रशांत बनकरला अटक   

गोपाळ बदने फलटण पोलिस ठाण्यात हजर

सातारा,(प्रतिनिधी) : फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकर याला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक करण्यात आली. त्याला फलटण न्यायालयाने चार दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. फरारी मुख्य आरोपी निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. शुक्रवारपासून बदने पोलिसांना गुंगारा देत होता. बदने यांचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत होता. सातारा पोलिसांच्या माध्यमातून पथक पंढरपूर आणि पुणे येथे पाठवण्यात आली होती. मात्र, स्वत: बदने फलटण शहर पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.
 
महिला डॉक्टरने बदने याच्या छळाला कंटाळून एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी आणि हातावर पेनाने मजकूर लिहिला होता. बदने हा मूळचा परळीचा आहे. घटनेनंतर पळून गेलेला बदने शनिवारी रात्री उशिरा फलटण पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाला. प्रशांत बनकरच्या आई-वडिलांनी मुलाचे नाव या प्रकरणात अकारण  गोवण्यात आल्याचा आरोप केला. आमचा मुलगा पुण्याला असतो. तो दिवाळीसाठी घरी आला होता. आमचा मुलगा असा नाही. त्या मॅडम अन्याय करून गेल्या आहेत. त्यांनी मुद्दाम त्याचे नाव लिहिले, असे बनकरच्या आईने म्हटले आहे. त्या म्हणाल्या, मी तिला मुलीप्रमाणे सांभाळले. तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तिने कोणाच्या दबावाखाली हे केले आहे का? हे सरकारने पाहावे, असे वडील म्हणाले आहेत.
 
दरम्यान, बनकर याच्या वडिलांना आणि भावाला पोलिसांनी शुक्रवारी पोलिस स्थानकमध्येच थांबवून ठेवण्यात आले होते. प्रशांतला अटक करण्यात आली नाही, तर तो स्वतःहून घरी आला. तेथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे प्रशांतच्या भावाने सांगितले आहे. प्रशांतच्या बहिणीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी घरी आले की, डॉक्टरला भेटायचे. ती आमच्याकडे राहायला होती. आमची एवढी मैत्री झाली होती, की ती सर्व मला सांगायची. मी नोकरी करायचे. मी तिला म्हणायचे की, तुला चांगली सरकारी नोकरी आहे. त्यावर ती म्हणाली की, नोकरीत खूप तणाव आहे. ती खूप तणावातच असायची. या महिन्यात प्रशांत आठ दिवसांसाठी घरी आला होता. तो तिच्याशी घरच्या व्यक्तींसारखेच बोलला होता.
 
पुण्याला आला तेव्हा तिने त्याला संदेश पाठवून प्रपोज केले होते. त्यावर भावाने, ‘नाही मॅडम, मी तुम्हाला घरातल्यासारखे मानतो, तुम्ही मला दादा म्हणता,’ असे म्हणत नकार दिला होता, असा गौप्यस्फोट प्रशांतच्या बहिणीने केला आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलिस अधिकार्‍यावर अत्याचाराचा आरोप करत, तसेच बनकरवर मानसिक, शारीरिक छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे; मात्र बनकर याच्या बहिणीने दिलेली माहिती वेगळी आहे. 
 
लक्ष्मीपूजनादिवशी महिला डॉक्टर घरी आल्या होत्या. तेव्हा माझा भाऊ छळ करतो, असे आई आणि वडिलांना का सांगितले नाही? तिला नाही म्हटले म्हणून तिने त्याचे नाव घेतले आहे. तो तिच्या संपर्कात नव्हता, असा दावा प्रशांत बनकरच्या बहिणीने केला. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून महिला डॉक्टर पोलिस आणि आरोग्य विभागामध्ये वादात अडकल्या होत्या. पुढील तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवला. शुक्रवारी रात्री उशिरा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles