शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष   

अखेर जयंत पाटील पायउतार

मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा मंजूर करताना विधानपरिषद आमदार व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय मंगळवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित बैठकीत घेण्यात आला. 
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. मिळालेल्या संधीचे १०० टक्के सोने करण्याचा मी प्रयत्न  करेन, असे शिंदे यांनी निवडीनंतर सांगितले. तर, एका माथाडी कामगाराचा मुलगा आपल्या पक्षाचे नेतृत्व करणार असल्याचा विशेष आनंद असल्याची प्रतिक्रिया पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.  तर, हा शेवट नाही तर एका नव्या पर्वाची सुरुवात आहे, अशी भावना मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. मात्र, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले होते. स्वतः जयंत पाटील यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण अजून प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याचे स्पष्ट करताना भाजप प्रवेशाच्या बातम्या निराधार असल्याचा दावा केला होता. मात्र, राज्याच्या नेतृत्वात बदल होणार, शरद पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाकरी फिरवणार, अशी कुजबूज सुरूच होती व ती कुजबूज अखेर खरी ठरली. 
 
शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची बैठक काल मुंबईतील स्व. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाली. या बैठकीत शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या निवडीनंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील प्रत्येक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करेन. तसेच, पक्ष संघटना राज्यात सर्वत्र पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली, या संधीचे १०० टक्के सोने करण्याचा मी प्रयत्न करण्याचे काम करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 
 

Related Articles