राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाचा जयंत पाटील यांचा राजीनामा?   

मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे. स्वतः जयंत पाटील ‘नॉट रिचेबल’ असून त्यांनी या वृत्ताचे खंडण न केल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचे सांगितले जात आहे. यामुळे विधानपरिषद आमदार व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वतः शशिकांत शिंदे यांनी या संबंधीचा निर्णय १५ जुलैच्या बैठकीत होईल, असे सूचक विधान केले आहे. दुसरीकडे, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या खोडसाळपणाच्या असल्याचा दावा केल्याने पक्षात गोंधळाची स्थिती आहे. पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा असली तरी भाजपमधून मात्र अजून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.
 
२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आहे. तेव्हापासून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असते. काल अचानक पुन्हा त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त आले. ना त्यांच्याकडून याचे खंडण करण्यात आले, ना जितेंद्र आव्हाड वगळता अन्य कोणी याचा इन्कार केला. ज्यांचे नाव पुढील प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चेत आहे त्या शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा आणि माहिती ही पक्षाच्या १५ जुलै रोजी होणार्‍या बैठकीत होईल, असे सूचक वक्तव्य केले. 
 
पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही हाच सूर लावताना, प्रदेशाध्यक्षाचा निर्णय शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या स्तरावरील बैठकीत होईल, असे स्पष्ट करताना, लवकरच हा निर्णय होईल, असेही सांगितले. त्यामुळे जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. आव्हाड यांनी मात्र जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे. ‘एक्स’ या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये, जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारित होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
 
भाजपमध्ये जाणार नाहीत...
 
जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असले तरी आमदार रोहित पवार यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली. जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत. राजीनामा दिला म्हणून ते पक्ष सोडून जातील, ही शक्यता वाटत नाही. सत्तेसाठी ते आजवर ज्या विचारांशी प्रामाणिक राहिले, ते विचार ते सोडणार नाहीत. एखादे मंत्रिपद मिळावे म्हणून ते शरद पवार किंवा विचारांना सोडून पळून जातील, असे मला वाटत नाही, असे रोहित पवार म्हणाले.

Related Articles