पुणे-मुंबई प्रवास होणार आणखी जलद   

मिसिंग लिंकचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

पुणे : मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई प्रवासातील अंतर सहा किलो मीटरने कमी होणार असून प्रवाशांचा आर्धा तास वाचणार आहे. तसेच, घाटाचा काही भागही टाळता येणार आहे. हा मार्ग स्थापत्य शास्त्राचा अद्वितीय नमुना आहे. या मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. 
 
केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या २४ तास जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व वर्षपूर्ती कार्यअहवालाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी  आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, मिसिंग लिंकमुळे पुणेकरांना एका तासात नवी मुंबईच्या विमानतळावर जाता येणार आहे. मिसिंग लिंक म्हणजे सर्वांत लांब ९ कि.मी. चा बोगदा आहे. 
 
२३ मीटर रूंदीचा हा जगातील सर्वात मोठा बोगदा असून त्याची उंची १८५ मीटर आहे. या बोगद्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुण्याची गरज लक्षात घेऊन पुण्यात दुसरे विमानतळ आपण करणार आहोत, असेही सांगितले.चंद्रकांत पाटील म्हणाले, मोहोळ हे लोकनेते आहेत. त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे. त्यांच्याकडून पुणेकरांच्या खूप अपेक्षा आहेत. रिंगरोड, वाहतूक कोंडी, मेट्रोचा विस्तार, रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आदी स्थानिक प्रश्न आहेत. मोहोळ दिल्लीत गेले असले, तरी पुण्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्यावी. 
 
मोहोळ म्हणाले, मंत्री म्हणून देश भरात फिरत असलो, तरी पुण्याकडे माझे दुर्लक्ष होणार नाही. आम्हाला पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवायचे आहे. वर्षभरात मी जे काही कार्य केले आहे. ते मतदारांसमोर मांडणे हे माझे कर्तव्य आहे. जनसंपर्क कार्यालयात संपूर्ण सुविधा उपलब्ध असतील. हे कार्यालय २४ तास खुले असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पांडे यांनी केले. 
 
तरच पुणेकर डोक्यावर घेतात 
 
भाजप भविष्यातील गुतवंणूक करणारा पक्ष आहे. पक्ष पुढची पिढी तयार करत आहे. या पक्षात कोणता नेता कोणाला संधी देत नाही, तर ही एक व्यवस्था आहे. ती व्यवस्था व्यक्तीची क्षमता आणि कतृर्र्त्व पाहून संधी देते. जो व्यक्ती असामान्य काम करेल, त्यालाच पुणेकर डोक्यावर घेतात. मोहोळ यांना पुणेकरांनी डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे त्यांनी कायम पुणेकरांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

Related Articles