आषाढी वारीमध्ये २५० कोटींची उलाढाल   

दशमी, एकादशी आणि द्वादशीला भक्तांची विक्रमी गर्दी 

सोलापूर, (प्रतिनिधी) : आषाढी वारीमध्ये यंदा सुमारे २८ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी हजेरी लावली. यामुळे प्रासादिक साहित्य, फोटो फ्रेम, पेठा, श्रींच्या मूर्ती, कुंकू, बुक्का, हॉटेलचे पदार्थ आदी विक्रीमधून सुमारे २५० कोटीहून अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे. 
 
यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे आषाढी यात्रेला दरवेळेपेक्षा भाविकांची संख्या वाढणार, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. त्यानुसार लाखो भाविकांची उपस्थिती होती. दर्शनानंतर कुंकू, बुक्का, पेढे, श्री विठ्ठल रुक्मिणीचे फोटो, फायबरच्या मूर्ती, तुळशी माळ, टाळ, मृदुंग, विणा, खेळणी यांना भाविकांकडून जास्त मागणी झाली. त्यामुळे मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, भक्ती मार्ग या ठिकाणी स्थानिक व्यापार्‍यांची कायमस्वरूपी दुकाने, हॉटेल होती. तर शहरातील स्टेशन रोड, गांधी रोड, बुरुड गल्ली रोड, टिळक स्मारक, गोपाळपूर रोड, संत पेठ, सांगोला चौक, भोसले चौक, सरगम चौक ते इसबावी रोड, ६५ एकर परिसर, उपनगरीय भागातील रोडवर स्थानिकांसह बाहेरगावाहून आलेल्या छोट्या व्यापार्‍यांची दुकाने, स्टॉल यावर खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गतवर्षीपेक्षा ५० कोटींनी जास्त उलाढाल झाली असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले आहे.

Related Articles