गंगाधाम चौकजवळील रस्त्याचा उतार होणार कमी   

निविदा मंजुरी

पुणे: कोंढवा येथून आई माता मंदिरासमोरून गंगाधाम चौकाकडे जाणार्‍या डोंगर उतारावरील रस्त्याचा उतार कमी करण्याच्या कामासाठीची निविदा आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आली. या तीव्र उतारामुळे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अपघाताना आळा बसणार असल्याचा दावा पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केला आहे.
 
मार्केटयार्डच्या लगतच असलेला गंगाधाम चौकातून मोठ्याप्रमाणावर वाहतूक होते. अशातच आई माता मंदिरासमोरून गंगाधाम चौकाकडे येणार्‍या तीव्र डोंगर उतारावरील रस्त्यावर सातत्याने प्राणांतिक अपघात होत आहेत. उतारावरून येणार्‍या वाहनांमुळे वाहने अनियंत्रीत होत असल्याचा निष्कर्ष काढून महापालिका प्रशासनाने हा उतार कमी करण्याचे काम हाती घेतले आहे.
 
या रस्त्यावर आठ महिन्यांपुर्वी डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी महिला मरण पावली. त्यावेळी प्रशासनाने तीव्र उतार कमी करण्यासाठी जाहीर केले होते. त्यानुसार निविदाही काढली होती. परंतू पहिल्यावेळी काढलेली निविदा रद्द करण्यात आली. राजकिय दबावामुळे काही तांत्रिक दोष दाखवून ही निविदा रद्द करण्यात आल्याची चर्चा त्यावेळी होती. 
 
पहिल्या निविदेतील त्रुटी दूर करून फेरनिविदा मागवूनही तीन महिने उलटले. परंतू पुन्हा तोच दबाव सुरू झाल्याने प्रशासनाने निविदा उघडली नाही. दरम्यान मागील महिन्यांत गंगाधाम चौकात अपघातात पुन्हा दुचाकीवरील एका महीला सहप्रवासी मरण पावली. यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी भेट देत तातडीने उपाययोजना करण्यात येईल, असे जाहीर केले.
 
या अपघातामुळे गडबडलेल्या प्रशासनाने अखेर तातडीने वरिल कामाची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवली.  या कामासाठी तीन निविदा आल्या. त्यापैकी मोहनलाल मथरानी कन्स्ट्रक्शन९ची २०.०१ टक्के सर्वात कमी दराची असलेली निविदा मान्यतेसाठी ठेवण्यात आली. त्याला आज आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कामासाठी ९ कोटी १६ लाख रुपये खर्च येणार आहे.

जडवाहतूक रोखण्यासाठी उभारले लोखंडी हाईट बॅरिअर्स 

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगाधाम चौकात प्रामुख्याने कात्रज कोंढवा रस्त्यावरील कान्हा हॉटेल चौक ते गंगाधाम चौकापर्यंतच्या रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी घातली आहे. या रस्त्यावरून रेडीमिक्सची वाहतूक करणारे मिक्सर, डंपर आणि मोठ्याप्रमाणावर मालवाहतूक करणारी जड वाहने येउ नयेत यासाठी आई माता मंदिरा जवळ गंगाधाम चौकाकडे येणार्या आणि गंगाधाम चौकातून आई माता मंदिराच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर लोखंडी हाईट बॅरीअर्स उभारण्यात आले आहेत. यापैकी एकाचे काम झाले असून दुसर्या हाईट बॅरीअरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
 

Related Articles