कर निरीक्षकांना मिळकत कर वसुलीचे ‘टार्गेट’   

पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या निरीक्षकांना आता ‘टार्गेट’ दिले जाणार आहे. वापरात केलेला बदल, थकबाकी असलेले मिळकतदार, नवीन मिळकतींवरील कर आकारणी करणे, अशा विविध कामांसाठी हे ‘टार्गेट देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी दिली.
 
अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह कर आकारणी व संकलन विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी बाणेर भागात संयुक्त पाहणी केली होती. या संयुक्त पाहणीत काही हॉटेल चालकांकडून पुढील मोकळ्या जागेत शेड, मांडव टाकून व्यवसाय केला जात आहे,  इमारतीच्या आवारातील मोकळ्या जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचे निवासी जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले होते. यासंदर्भात अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधिक मिळकत कर निरीक्षकांना संपुर्ण पाहणी करण्याचे आदेश दिले आहे. ज्या ठिकाणी मोकळ्या जागेचा व्यावसायिक वापर होत आहे, त्याची पाहणी करून तेथे वाढीव दराने मिळकत कर आकारणी सुरु करावी, असे आदेश दिले. अशा प्रकारे सातत्याने अतिरीक्त आयुक्त स्तरावर ‘सरप्राईज व्हीजीट’ करून काय कार्यवाही केली याचा आढावा घेतला जाणार आहे.
 
यासंदर्भात अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पत्रकारांशी बोलताना मिळकत कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार याची माहिती दिली. महापालिकेकडे आजपर्यंत सुमारे चौदाशे कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे. तुलनेत यात वाढ दिसणे अपेक्षित आहे. त्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील. मिळकत कर विभागाला ७० जणांचे मनुष्यबळ मिळाले आहे. यांना एक महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मिळकत कर निरीक्षकांना एका महिन्याला ठराविक ‘टार्गेट’ निश्चित करून दिले जाणार आहे. त्यांनी दर महिन्याला नवीन मिळकतीवर कर आकारणीसाठी नोंदणी करणे, मिळकतींच्या वापरात झालेल्या बदलानंतर नव्याने कर आकारणी करणे, तसेच अनधिकृतपणे वापर होणार्‍या ठिकाणी कारवाई करून वाढीव कर आकारणी करणे, थकबाकीदारांकडून कर वसुली करणे याचे ‘टार्गेट’ ठरविले जाणार आहे, असे अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
 
भविष्यात मिळकत कर विभागाच्या कामकाजात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. या तंत्रज्ञानामुळे निश्चितच काम करण्यास मदत होईल. तसेच मिळकतींच्या नोंदीसंदर्भातील‘अ‍ॅप’मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यातही बदल केले जातील.

- पृथ्वीराज बी. पी. अतिरीक्त आयुक्त, पुणे महापालिका.

 

Related Articles