पुण्यात गुरूपौर्णिमा उत्सव साजरा ; मंदिरांमध्ये गर्दी; शाळेत विशेष कार्यक्रम   

पुणे : शहर व उपनगरातील शाळा, महाविद्यालये तसेच मंदिरांमध्ये गुरुपोर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती. आनंददायी व उत्साही वातावरणात गुरुवारी शहरात गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली.
 
गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी शहर व उपनगरातील मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रीमंत दगडूशेठ गणेश मंदिर, दत्त मंदिर, शंकर महाराज मठ, गजानन महाराज मठ, जंगली महाराज मठ, स्वामी समर्थ मंदिर, मारोती मंदिर, साई बाबा मंदिर अशा मुख्य मंदिरात भाविकांची सकाळपासून गर्दी झाली होती. भाविकांनी दिवसभर रांगेत उभे राहून गुरूंचे दर्शन घेतले. त्यात ज्येष्ठ नागरिकांच्यासह, महिला भाविकांचा समावेश होता. तसेच मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष पूजा, प्रवचन व भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मंदिरात होणारी गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोलीस व स्वयंसेवकांच्या मदतीने वाहतूक व गर्दी नियंत्रण करण्याचे काम सुरू होते. मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
 
शहरातील शाळा, महाविद्यालयामध्ये सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपापल्या गुरूंना शुभेच्छा दिल्या.   अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी व भाषणे सादर केली. काही ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. अनेकांनी समाजातील गुरूंचा म्हणजेच शिक्षक, पालक, मार्गदर्शक यांचा सन्मान करून त्यांचे आभार मानले. त्यामुळे शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
 
समाज माध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव
 
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूवारी सकाळपासून समाज माध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला होता. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर (एक्स), व्हॉट्सप अशा विविध व्यासपीठावरून गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार्‍या पोस्ट, स्टेट्स आणि फोटो-व्हिडीओंची भरपूर चलती होती. विद्यार्थ्यांपासून ते नामवंत व्यक्तींपर्यंत सर्वांनी आपल्या गुरूंना स्मरून पोस्ट केल्या आणि शुभेच्छा दिल्या.

Related Articles