“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींना निवृत्तीचे संकेत देत आहे, मोहन भागवत..”   

ठाकरे गटाचा टोला

मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोरोपंत पिंगळेंची आठवण सांगत पंचहात्तरीबाबत एक विधान केले. “पंचाहत्तरीची शाल अंगावर आली की, निवृत्त व्हायचं असतं” असे मोहन भागवत यांनी पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमात म्हटले होते. मोरोपंत पिंगळे यांना निवृत्त होण्यास सांगण्यात आले तेव्हा ते निवृत्त झाले असे ही मोहन भागवत म्हणाले. मोहन भागवत यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. याबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. 

सरसंघाचालकांच्या वक्तव्यावर संजय राऊत काय म्हणाले?

मी या संदर्भात एक रोखठोक लिहिले होते. नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले होते. त्यावेळी काय चर्चा झाली त्याचा सारांशही मी लिहिला होता. ७५ वर्षे हे भाजपातले निवृत्तीचे वय आहे. नरेंद्र मोदींनी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग यांना निवृत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी लादली. आता सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पिकली आहे, त्यांच्या डोक्यावरचे केसही उडाले आहेत. जगभ्रमण करुन झाले आहे. सगळी सुखं भोगून गेलं आहे. आता जो नियम तुम्हीच केला आहे ७५ वर्षे वयाचा. मला वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना सूचित करतं आहे की तुम्हाला निवृत्त व्हावे  लागेल. त्यांना देश सुरक्षित हातांमध्ये सोपवावा लागेल. असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच अमित शाह यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत असतील तर देशासाठी हे शुभसंकेत आहेत असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.

मोदींना निवृत्त व्हायचे आहे हे मोहन भागवत त्यांना विसरु देणार नाहीत : राऊत

७५ वर्षे निवृत्तीचा नियम आहे तो सगळ्यांसाठी समान आहे. लालकृष्ण आडवाणी असोत, नरेंद्र मोदी असोत किंवा अमित शाह.त्यांना आता निवृत्त व्हावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी वचने देतात ती विसरतात. १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याचे वचन, गरीबी हटवण्याचे वचन, पाकिस्तानला धडा शिकवण्याचे  वचन हे सगळे मोदी विसरले आहेत. मात्र तुम्हाला निवृत्त व्हायचे आहे ही बाब देश मोदींना विसरु देणार नाही तसंच सरसंघचालक मोहन भागवतही विसरु देणार नाहीत.

Related Articles