गुलाब गड्डी २००, तर झेंडू १२० रूपये किलो   

दरात ४० टक्क्यांनी वाढ; गुरुपौर्णिमेनिमित्त फुलांना मागणी 

पुणे : गुरुपौर्णिमेनिमित्त विविध प्रकारच्या फुलांना मागणी वाढली आहे. २० काड्याच्या गुलाब गड्डीला बुधवारी १५० ते २०० रूपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात झेंडूचा एका किलोचा दर ८० ते १२० रूपये होता. इतर प्रकारच्या फुलांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्केटयार्डातील फुल बाजारासह, महात्मा फुले मंडईतही विविध प्रकारच्या फुले खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. 
 
गुरुपौर्णिमेनिमित्त शहर आणि उपनगरातील मंदिरात मोठ्या प्रमाणात पुष्प सजावट केली जाते. तसेच भाविकांकडून पूजेसाठी लागणार्‍या फुलांना मागणी वाढते. मार्केट यार्डातील फूल बाजारात पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी फुले विक्रीस पाठविली. फुलांना मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मागणीत, तसेच दरातही ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मार्केट यार्ड फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले व अरूण वीर यांनी दिली.
 
गुरुपौर्णिमेनिमित्त गुलाब पुष्प अर्पण करण्याची प्रथा आहे. गुलाब गड्डीसह शेवंती, गुलछडी, झेंडू या फुलांच्या मागणीत वाढ झाली. मंदिरातील सजावटीसाठी जर्बेरा, कार्नेशियन, ग्लॅडिओ, ऑर्कीड या फुलांचा वापर केला जातो. फुले खरेदीसाठी काल सकाळपासून शहर, तसेच उपनगरातील फूल विक्रेत्यांनी खरेदीसाठी मार्केट यार्डातील बाजारात गर्दी झाली होती. गेल्या आठवड्यात झेंडुचे दर ५० ते ६० रुपये किलो होते. मागणी वाढल्यााने झेंडुच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात एक किलो झेंडूचे दर प्रतवारीनुसार ८० ते १२० रुपये झाले. गुलाब गड्डीला चांगले दर मिळाले आहेत. २० काड्या असलेल्या गुलाबगड्डीला १५० ते २०० रुपये दर मिळाले आहेत. पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी, यवत, ऊरळी कांचन परिसरातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीस पाठविली, असल्याचेही भोसले आणि वीर यांनी सांगितले.
 
सुवासिक जुईचा हंगाम सुरू झाला असून, घाऊक बाजारात एक किलो जुईला प्रतवारीनुसार ५०० ते ६०० रुपये दर मिळाला आहे. जुईला चांगली मागणी आहे. सणासुदीच्या काळात फुलांच्या मागणीत वाढ होणार आहे. श्रावण, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, तसेच दिवाळीपर्यंत फुलांना मागणी कायम राहणार असल्याचेही सागर भोसले व अरूण वीर यांनी सांगितले.
 
घाऊक बाजारातील फुलांचे दर
 
गुलाब गड्डी १५० ते २०० रुपये (२० काड्या)
साधा गुलाब ३० ते ५० रुपये (१० काड्या)
शेवंती १४० ते १८० रुपये
गुलछडी २०० ते ३०० रुपये
जुई ५०० ते ६०० रुपये

Related Articles