पावसामुळे मक्याच्या कणसाला भाव   

पर्यटन स्थळे बहरली; मागणी वाढल्याने दरातही वाढ 

पुणे : पाऊस आणि भाजलेले मक्याचे कणीस हे समीकरणच आहे. त्यामुळे रिमझिम पावसात पर्यटनाचा आनंद घेत मक्याचे कणीस खाण्याचा आनंद काही औरच आहे. सद्य:स्थितीत सर्वत्र पाऊस पडत असल्याने पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. त्यामुळे मक्याच्या कणसांना मागणी वाढली आहे. परिणामी घाऊक बाजारात किलोच्या दरात ३ ते ५ रुपये, तर क्विंटलच्या दरात ३०० ते ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. अशी माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली. 
 
मागील आठवडाभरापासून मोठा पाऊस थांबला आहे. पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडत आहेत. शहर आणि परिसरातील पर्यटन स्थळी पर्यटकांची संख्या वाढली असल्याने मक्याच्या कणसाला मागणी वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारातही मक्याच्या कणसाला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक वाढत नसल्यामुळे दरात वाढ झाली आहे. आणखी काही दिवस वाढलेले दर टिकून राहणार असल्याचा अंदाजही सुपेकर यांनी व्यक्त केला. 
 
मार्केटयार्डातील घाऊक बाजारात प्रतिकिलोला १५ ते २० रुपये दर मिळत आहे. चांगल्या प्रतीचा माल असेल, तर त्यास २२ रुपयापर्यंत दर मिळत आहे. मागील वर्षी प्रतिकिलोला १२ ते १५ रुपये दर मिळाला होता. बाजारात रविवार वगळता इतर दिवशी ८०० ते १००० गोणी आवक होत आहे. रविवारी १५०० गोणींची आवक होत आहे. ही आवक बारामती, खेड, मंचर, नारायणगाव, नाशिक, अहिल्यानगर येथून होत आहे. जूनपासून मक्याच्या कणसाची आवक सुरू झाली आहे. ही आवक हिवाळ्यापर्यंत कायम असणार असल्याचेही सुपेकर यांनी नमूद केले. 
 
बाजारात दाखल होत असलेल्या मालापैकी ७० ते ८० टक्के माल पर्यटन स्थळी जात आहे. तर १० ते २० टक्के माल हा हॉटेल तसेच प्रक्रिया उद्योगाकडे जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मक्याच्या कणसाला अधिक दर मिळत आहे. पावसात वाढ झाल्यानंतर दरात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. मागणी अशीच राहिल्यास घाऊक बाजारातील किलोचा दर २२ ते २५ रुपयापर्यंत जाऊ शकतो. बाजारात मिळत असलेल्या दरावर शेतकरी समाधानी आहेत. 
 
- पांडुरंग सुपेकर, व्यापारी, मार्केटयार्ड 
 
पर्यटन स्थळी ५० रुपयाला कणीस
 
शहर व उपनगरातील उद्याने, मंदिरे तसेच विविध रस्त्यांवर भाजलेल्या कणसाचा दर ४० रुपये आहे. तर जिल्ह्यातील पर्यटन स्थळी एका कणसाचा दर ५० रुपयांवर पोहोचला आहे. घाऊक बाजारातील दरात वाढ झाल्यास पर्यटन स्थळावरील दरात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकचे पैसे मोजून मक्याच्या कणसाचा अस्वाद घ्यावा लागत आहे.

Related Articles