कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला   

पुणे : रामटेकडी-सय्यदनगर येथील पथपथावर विनापरवानगी भाजीपाला विकणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आला. भाजीविक्रेत्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना दगड आणि लोखंडी वजनाच्या मापाने मारहाण केली. यामध्ये निखील इंगळे हे कर्मचारी जखमी झाले असून, महापालिकेच्या वाहनांचेदेखील नुकसान झाले आहे.
 
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहायक अतिक्रमण निरीक्षक किरण शिंदे (वय ३१, गाडीतळ, हडपसर) यांनी याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून, पोलिसांनी सोहेल शेख, शाहीद मौलाली शेख व इतरांवर गुन्हा दाखल केला. सय्यदनगर येथील डीपी रस्ता नवीन म्हाडा क़ॉलनीजवळ सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला.
 
अतिक्रमण विभागाचे किरण शिंदे व त्यांचे सहकारी श्लोक तारु, रोहित अवचरे, दिनेश यादव, निखील इंगळे, मंगेश घाणेकर, आदित्य खुडे, यश कांबळे, चालक अब्दुल शेख यांचे पथक महापालिकेच्या वाहनातून पदपथावरील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई करत होते. सय्यदनगर येथील डीपी रस्ता नवीन म्हाडा येथे ५ ते ६ विक्रेते रस्त्यावर अडथळा निर्माण करुन, तसेच पथारीवर व हातगाडीवर फळांची व भाजीपाला विक्री करत  होते.

Related Articles