श्री ओंकारेश्वर मंदिराचा २८७ वा वर्धापन दिन उत्साहात   

पुणे : पेशवेकालीन श्री ओंकारेश्वर मंदिर शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक आहे. मंदिराचा २८७ वा वर्धापन दिन धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी आषाढ वद्य त्रयोदशी च्या दिवशी मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मंदिराला आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली. 
 
श्री ओंकारेश्वर मंदिराचे बांधकाम १७३४ ते १७३६ या कालावधीत वेदमूर्ती शिवरामभट चित्राव यांनी केले. ते पेशव्यांचे कुशल स्थापत्यतज्ञ होते. ओंकारेश्वर मंदिरासाठी लागणारा निधी त्यांना मुठा नदीकिनारी सापडलेल्या सोन्याच्या हांड्यांतून मिळाला. हा निधी त्यांनी प्रामाणिकपणे पेशव्यांच्या स्वाधीन केला आणि त्यांच्या संकल्पनेतून हे भव्य शिवमंदिर साकार झाले.
 
श्री ओंकारेश्वर देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर म्हणाले, मंदिराची जबाबदारी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी माझ्या मातोश्रींच्या कुटुंबाकडे आली. आज आषाढ वद्य त्रयोदशीला मंदिराचा २८७ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. मंदिरामध्ये नू.म.वि.वाद्य पथक आणि केशव शंखनाद पथक यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व भाविकांना देवस्थानतर्फे प्रसाद वाटप करण्यात आले. देवस्थानच्या वतीने आज पहाटे देवाला लघुरुद्र करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभार्‍यात श्री ओंकारेश्वराला वैशिष्ट्यपूर्ण पोशाख घालण्याची परंपरा आहे.

Related Articles